मुलाला ठार मारणाऱ्या सावत्र बापाला जन्मठेप !

कोपरगाव: मुलाला ठार मारल्याप्रकरणी वसंत रोडोबा पवार (रा. पुणतांबा, ता. कोपरगाव) याला जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे जन्मठेपेची आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. शिक्षा ठोठावलेला वसंत पवार हा ठार मारलेल्या मुलाचा सावत्र बाप आहे. जिल्हा न्यायाधीश एन. एन. श्रीमंगले यांनी हा निकाल दिला. सरकारी अभियोक्ता शरद मारुती गुजर यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला.

निर्मला वसंत पवार यांचा मुलगा दादू पवार (वय 5) याचा दोन वर्षापूर्वी विहिरीत पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुरूवातीला आकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. दादूला जीवे ठार मारले म्हणून त्याचा सावत्र बाप वसंत पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. दादूची आई निर्मला पवार यांनी फिर्याद दिली होती. दादू हा निर्मला यांचा पहिल्या पतीचा मुलगा होता. त्यामुळे वसंत पवार हा त्याचा रागराग आणि मारहाण करायचा. घटनेच्या दिवशी वंसत याने दादूला अंथरूणातून उचलले आणि घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत टाकून देत जीवे मारले होते. सहायक उपनिरीक्षक एस. व्ही. दहिफळे व व्ही. पी. वाठोरे यांनी तपास केला.

पोलिसांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी अभियोक्ता शरद गुजर यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करत या खटल्यात आठ साक्षीदार तपासले. दादुची आई निर्मला, वैद्यकीय अधिकारी आणि दोन्ही तपासी अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद लक्षात घेत दादूचा सावत्र वडील वसंत पवार याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)