मुलाच्या मदतीने सुरक्षारक्षकाचा खून करणाऱ्यास अटक

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.31 – भंगार चोरी करताना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून अल्पवयीन मुलाच्या मदतीने वडिलांनी सुरक्षारक्षकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, त्याच्या वडिलांना धानोरी येथून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ दोनचे उपायुक्त प्रविण मुंडे यांनी दिली.

शकील बाबु तांबोळी (35, सध्या रा. धानोरी. मुळ रा. शिवापुरवाडा, कोंढणपुर फाटा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे; तर त्याच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरिफ पठाण असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी शकील तांबोळी आणि मयत आरिफ पठाण हे दोघे पूर्वी रतन मोटर्स याठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. दरम्यान, शनिवारी (दि.27) आरिफ पठाण यांचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्यातील संशयित आरोपींचा तपास सुरू असताना पोलीस कर्मचारी अमोल पवार आणि कुंदन शिंदे यांना एका लहान मुलाची माहिती मिळाली. त्याच्या वर्णनानुसार कात्रज परिसरात पाहणी केली असता अल्पवयीन मुलगा आणि शकील तांबोळी याच्याबाबत पोलिसांना ठोस पुरावे मिळाले. मात्र, गुन्हा घडल्यानंतर दोघे आरोपी त्यांची राहण्याची ठिकाणे सतत बदलत होती.

अखेर आरोपी धानोरी परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते यांच्या तपास पथकातील पोलीस हवालदार फडतरे यांना मिळाली. त्यानुसार लागलीच वरिष्ठ निरीक्षक कमलाकर ताकवले, वाघचवरे, उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते, शिवदास गायकवाड, कर्मचारी चंद्रकांत फडतरे, कृष्णा निढाळकर, सचिन ढवळे, अमोल पवार, कुंदन शिंदे, प्रणव संकपाळ यांनी सापळा रचून शकील तांबोळी आणि त्याच्या मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता धक्कादायक प्रकार समोर आला. तांबोळी याने रतन टाटा येथील नोकरी सोडल्यानंतर भंगार चोरण्याचे काम करत होता. मात्र, भंगार चोरी करताना सुरक्षारक्षक असलेल्या पठाण याचा अडथळा येऊ नये यासाठी मुलाच्या मदतीने पठाण याचा खून केल्याची कबुली दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)