मुलाखतीचे चित्रीकरण करणे बंधनकारक

शिक्षणमंत्री : निवडणुकांपूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण

पुणे – राज्यात शिक्षक भरती “पवित्र’ पोर्टलमार्फत खासगी शिक्षण संस्थामध्ये रिक्‍त असलेल्या एका जागेसाठी 5 उमेदवारांची शिफारस केली जाणार आहे. या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्यापैकी एकाची निवड संस्थाचालकांना करावे लागेल. मात्र, या मुलाखतींचे व्हिडिओ चित्रीकरण करणे संस्थांना बंधनकारक असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे दिली. त्यामुळे गुणवंत उमेदवारांना शिक्षक होण्याची संधी मिळण्याची चिन्हे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्य मुक्‍त विद्यालय मंडळाच्या प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ विनोद तावडे यांच्या हस्ते गुरुवारी झाला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील शिक्षक व प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे ते म्हणाले. प्राध्यापक भरती तातडीने व्हावी यासाठी विद्यापीठ स्तरावरून पाठवली जाणारे 300 पॅनल तयार ठेवण्याच्या सूचनाही विद्यापीठांना देण्यात आल्याचे तावडे म्हणाले.

शिक्षक भरती होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून लाखो रुपयांचे डोनेशन घेतले जात आहे. याला अटकाव करण्यासाठी अभियोग्यता परीक्षा घेऊन त्यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला. त्यासाठी “पवित्र’ हे पोर्टल सुरू करण्यात आले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच अनुदानित खाजगी शाळा शिक्षकांच्या 20 हजार शिक्षकांच्या जागा याद्वारे भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या अभियोग्यता व बुद्धीमापन चाचणीत उत्तीर्ण झालेल्या 1 लाख, 21 हजार, 615 उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी केली आहे. उर्वरित परीक्षा दिलेल्या 50 हजार विद्यार्थ्यांनी पोर्टलवर माहिती भरलेली नाही. यातील 13 हजार विद्यार्थ्यांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने 1 लाख, 8 हजार उमेदवार शिक्षक भरतीसाठी पात्र ठरले आहेत.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यापूर्वी शिक्षक भरती सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार बिंदूनामावली अद्ययावत करणे, एसईबीसी प्रवर्गाचा त्यामध्ये समावेश करणे, अतिरिक्‍त शिक्षकांचे समायोजन करणे, शाळांच्या रिक्‍त जागांची माहिती पवित्र पोर्टलवर भरणे आदी तांत्रिक बाबी वेगाने पूर्ण करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्राध्यापक भरती आचारसंहितेपूर्वी
राज्यातील प्राध्यापक भरतीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार महाविद्यालयांकडून रोस्टरची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, नव्याने एसईबीसी प्रवर्गाचा समावेश करावा लागणार आहे. त्यामुळे पुन्हा रोस्टर प्रक्रिया करावी लागेल. ही सर्व प्रक्रिया लवकर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी म्हणजेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्राध्यापक भरती करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले.

उद्‌घाटनास सांस्कृतिक मंत्री, समारोपास मुख्यमंत्री
यवतमाळ येथे 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनास दि. 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मात्र, सध्या साहित्य संमेलन विविध कारणाने चर्चेत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे म्हणाले, संमेलनाच्या उद्‌घाटनास स्वत: मी, तर समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)