मुलांवर लक्ष द्या ना वं!

  • पिंपरी-चिंचवड वर्तमान
    – शर्मिला पवार

पिंपरी-चिंचवड शहरात मुलांचे अपहरण ही बाब शहरवासियांसाठी नवीन राहिली नाही. नोव्हेंबर महिन्यात वाकड, चिंचवड येथील अपहरण आणि वाकड व पिंपरीतून बेपत्ता झालेली मुले या घटना पाहता आई-वडिलांचे खरंच पाल्यांवर लक्ष आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

वाकड येथून एका पाच वर्षीय मुलाचे अपहरण झाले होते. त्यानंतर चिंचवड येथून माही जैन या मुलीच्या अपहरणाने संपूर्ण शहर हादरले होते. बारा वर्षीय माही तिच्या घरासमोरूनच भर दिवसा गायब झाली होती. दुकानदाराच्या डोळ्या समोर तिला गाडीत घालून आरोपींना पळून जाताना पाहिले होते. पोलिसांनी अवघ्या काही तासात तिची सुखरुप सुटका केली. मात्र या दोन घटनांमधून तरी पालकांनी बोध घेणे अपेक्षित होते. मात्र या घटना घडून गेल्यानंतर आठच दिवसांत वाकड येथून तीन शाळकरी मुली पालकांच्या कटकटीला कंटाळून बेपत्ता झाल्या होत्या. पोलिसांनी वेळेत त्या मुलींना लोणावळा येथून ताब्यात घेतले अन्यथा त्या तिनही मुली मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसून मुंबईला जाणार होत्या. त्या मुंबईला गेल्या असत्या तर पालकांना त्यांना शोधणे आणखी कठीण होऊन बसले असते. यावेळीही दैव बलवत्तर म्हणून मुली सुखरुप घरी परतल्या. तर शनिवारी घडलेल्या प्रकारातही तीन व पाच वर्षाची मुले घरासमोरून बेपत्ता झाल्याने पोलीस व पालकांचे धाबे दणाणले होते. मात्र, सहा तासांनी दोन्ही मुले शहरातील दोन वेगवेगळ्या भागात सापडली आणि सगळ्यांचा जीव भांड्‌यात पडला. या घटनेत घरात आई-वडील व इतर मंडळी असताना देखील अंगणात खेळणारी मुले घर सोडून भरकटत शहरात दूरपर्यंत जातात. त्यासाठी पोलीस शहर पिंजूण काढतात. मुले ही रेल्वे रुळ व महामार्गावरही खेळत-खेळत आली असती यावेळीही नशिबाने साथ देत दोन्ही मुले सुखरूप घरी पोहचली. मात्र प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच असे नाही.

लहान मुलांचे अपहरण करण्यासाठी एक चॉकलेट देखील पुरेसे असते. पिंपरी येथे घडलेल्या एका प्रकरणात शेजारी राहणाऱ्याच एका असमाने सात वर्षीय मुलीचे अपहरण करुन तिची गळा दाबून हत्या केली. मृतदेह एच. ए. मैदानावर टाकून दिला. हा आरोपीही अजून पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. त्यासाठी पोलिसांचे पथक दक्षिण भारतातील त्याच्या मूळगावी 21 दिवस राहून आले. मात्र त्याचा थांग पत्ता लागला नाही. कासारसाई प्रकरणात तर देव दर्शनासाठी गेलेल्या दोन 12 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला. ज्यात एका पीडितेला जीव गमवावा लागला.

-Ads-

या साऱ्या घटना एकाच शहरात अगदी काही दिवसाच्या फरकाने घडल्या आहेत. त्यामुळे नोकरी, रोजची पळापळ यामध्ये पालकांचे पाल्यांकडे दुर्लक्ष होत आहे. मुलांना काय हवं, काय नको, त्यांचा मित्र परिवार, दिनक्रम आदींची माहिती पालकांनी ठेवलीच पाहिजे. कारण अशा घटनांना पोलीसच प्रत्येकवेळी निर्बंध घालू शकतील, असे नाही. सर्व घटनांचा विचार केला असता केवळ पैशासाठी नव्हे तर जुने वाद, मानसिक विकृती अशा घटनांमधून अपहरण घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनीही भर पत्रकार परिषदेत पालक व सोसायटीधारकांना खडेबोल सुनावले होते. परिसरात सीसीटिव्ही बसवा, सुरक्षा रक्षकांना नेमताना काळजी घ्या, स्कूल बस तसेच शाळांमध्येही आपली मुले सुरक्षीत आहेत, का याची खात्री करा अशा सुचना देखील केल्या होत्या. एखादी घटना घडल्यानंतर केवळ दोन दिवसच घटनेची चर्चा होते, गांभीर्य राखले जाते. मात्र, पुन्हा “जैसे थे’ स्थिती असते. मुलांचे अपहरण, गुन्हेगारीसाठी केला जाणारा लहान मुलांचा वापर, बाल अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर पालकांनी आपल्या पाल्याबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. नोकरी व प्रगतीच्या महत्त्वाकांक्षेमध्ये मुलांच्या सुरक्षेची “नाळ’ तुटू देवू नये!

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)