‘मुलांनो… शाळेत डीबीटी कार्ड घेऊन या’

“मंडळ’ गेले तरी “मंडळीं’ चा कारभार सुरुच: शाळेतच मिळतेय साहित्य

प्रभात विशेष

श्रध्दा कोळेकर
पुणे – मुलांनो तुम्हाला वह्या, बूट, दप्तर, स्वेटर हवे असेल तर ते तुम्हाला मिळालेले डीबीटी (डायरेक्‍ट बेनिफिट ट्रान्सफर) कार्ड शाळेतच घेऊन या.. अशा प्रकारच्या सूचना आता शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. थेट वस्तू न देता खात्यात पैसे देण्याच्या शासनाच्या निर्णयाला बनवाबनवी करुन हरताळ फासला जातोय का? असा प्रश्‍न पडल्याखेरीस रहात नाही.
राज्य शासनाने थेट खात्यामध्ये अनुदान देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पालिकेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या वस्तुंऐवजी त्यांना खात्यात पैसे देण्याचा निर्णय झाला होता. पुणे महापालिकेंतर्गत येणाऱ्या साधारण तीनशे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांसाठी यंदा शालेय साहित्याऐवजी विद्यार्थ्यांना डीबीटी कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या दुकानदारांकडून शालेय साहित्य, गणवेश घेणे अपेक्षित होते. त्यानुसार जवळपास एक लाख विद्यार्थ्यांना डीबीटी कार्डचे वाटप करण्यात आले. मात्र शाळा सुरु होऊन महिना होत आला तरी केवळ तीनच हजार विद्यार्थ्यांनी कार्ड स्वाईप केले असल्याचे सांगत दुकानदारांना थेट शाळेत कार्ड स्वाईप करायला पाठवून दिले जात आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शालेय साहित्याच्या खरेदीसाठी विद्यार्थी जात नाही म्हणून आता अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार शाळांमध्येच दुकानदार येत आहेत. विद्यार्थ्यांना कार्ड आणायला सांगितले जात आहे व कार्ड स्वाईप करुन घेत विद्यार्थ्यांना वस्तुंचे वाटप केले जात आहे. आतापर्यंत तीन हजार विद्यार्थ्यांनी या कार्डचा वापर केला असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. मात्र विद्यार्थ्यांकडून स्वाईप करुन घेतल्यानुसारच विद्यार्थ्यांना वस्तू दिल्या जात आहेत की नाही यावर मात्र सध्या तरी कोणतीच पडताळणी शिक्षण विभागाकडून केली जात नाही. बहुतांशी विद्यार्थ्यांचे पालक अशिक्षित असतात तर काहींचे व्यसनाधीन त्यामुळे त्या वस्तू पडताळून पाहिल्या जाण्याची खात्री नाही.

विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या वस्तुंमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे उघड झाल्याने शासनाकडून थेट अनुदानाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता यासाठीही पालिकेने काही ठाराविक दुकानदारांची निवड केली असून शाळेतच विक्री सुरु केली असल्याने खासगी शाळांची शालेय साहित्याची दुकानदारी आणि पालिकेने केलेल्या प्रकारात काय फरक राहिला असा प्रश्‍न आता निर्माण होतो आहे. या संदर्भात प्रभारी शिक्षण प्रमुख दिपक माळी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

”पालकांच्या सोयीसाठी आम्ही शाळांमध्ये साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. अधिकृत दुकानदारांनाच ही परवानगी दिली आहे. मात्र कार्ड स्वाईप केलेल्या पूर्णच्या पूर्ण वस्तू मिळाल्या की नाही हे पहाणे पालकांची जबाबदारी आहे त्यात अधिकारी सर्व ठिकाणी पोहचू शकणार नाही. गणवेश वाटपाचे अधिकार आम्हीच ठेकेदाराला दिले होते त्या ठेकेदाराने जुने वाटल्यानंतर नव्या गणवेशाबाबतचा निर्णय झाला आहे, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना तो गणवेश दिला असेल तो बदलून दिला जाईल.”
शीतल उगले, अतिरिक्‍त आयुक्‍त
पुणे महापालिका

 

चुकीचे गणवेश वाटून केले कार्ड स्वाईप
विश्‍वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्यंतरीच्या काळात एका ठेकेदाराने काही शाळांमध्ये जात विद्यार्थ्यांचे कार्ड स्वाईप केले व त्यांना मागील वर्षीच्या गणवेशाचे वाटप केले आहे. यंदाच्या वर्षी पालिकेच्या विद्यार्थ्यांचा गणवेश बदलला असल्याने त्या जुन्या गणवेशाचा विद्यार्थ्यांना उपयोगही होणार नाही, परंतु त्यांचे कार्ड आधीपासून स्वाईप झाल्याने त्या कार्डवर पुन्हा गणवेश घेता येणार नाही. या प्रकणात अद्याप किती विद्यार्थ्यांना जुने गणवेश दिले आहेत याची माहिती पिालकेने अद्याप घेतलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)