मुलांना हक्‍काची अंगणवाडी कधी मिळणार?

जिल्ह्यातील 1 हजार 232 अंगणवाड्यांना स्वतःची जागाच नाही

पुणे – मनमुराद खेळायचे, गाणी म्हणायची, पोटभर खाऊ खायचा आणि घरी यायचे हा दिनक्रम असल्यामुळे मुलांना गावातील अंगणवाडी शाळा आपलीशी वाटते. मात्र, जिल्ह्यात आजही 1 हजार 232 अंगणवाडी शाळेतील मुलांना बसण्यासाठी स्वत:च्या हक्काची जागा मिळाली नाही. त्यामुळे गावातील समाज मंदिर, ग्रामपंचायत इमारत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये या अंगणवाड्या भरवल्या जात असून, या मुलांना स्वत:च्या हक्काची अंगणवाडी कधी मिळणार?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शालेय शिक्षणाचे प्रवेशद्वार असलेल्या अंगणवाड्या शाळा म्हणजे लहान मुलांना आनंद देणारी आहे. मुलांना शाळेत येण्याची सवय लागावी आणि शिक्षणाची गोडी लागावी यासाठी गावांमध्ये अंगणवाड्या उभारण्यात आल्या. अंगणवाडीत येणाऱ्या मुलांना सेविका आणि मदतनीस घडवत असतात. जिल्ह्यात 4 हजार 623 अंगणवाड्या शाळा आहेत. त्यातील 3 हजार 391 शाळांना स्वत:च्या हक्काची जागा असून, त्याठिकाणी बांधण्यात आलेल्या खोलीमध्ये शाळा भरते. परंतु, आजही अंगणवाड्या शाळांना हक्काची खोली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव या मुलांना समाजमंदिर, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय किंवा एखाद्या झाडाखाली बसावे लागत आहे. मात्र, पावसाळ्यात या मुलांचे हाल होत असल्यामुळे त्यांना हक्काची अंगणवाडी असणे गरजेचे आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील काही अंगणवाड्यांकडे स्वत:ची जागा आहे. परंतु, निधी नसल्यामुळे अंगणवाडी बांधता येत नाही. तर काही गावांमध्ये अंगणवाडीसाठी जागाच मिळत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मध्यंतरी सीएसआरच्या माध्यमातून अंगणवाड्या बांधण्याचे नियोजन सुरू होते. परंतु, सीएसआरचा निधी पुरेशा नसल्यामुळे ते बारगळले. त्यामुळे या अंगणवाड्यांना हक्काचे खोली कधी मिळणार याबाबत कोणतीही ठोस चिन्ह दिसत नाही.

जिल्ह्यात काही ठिकाणी अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध नाही. तर ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहेत तेथे डीपीसीकडून अंगणवाडी बांधकामासाठी जादा निधीची मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सीएसआरच्या माध्यमातूनही अंगणवाड्या शाळा बांधण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रयत्न सुरू आहे.
-राणी शेळके, सभापती महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)