सॉरी ‘आयान’.. आम्हाला माफ कर !

कुठे आदर्श शिक्षक अन् कुठे मारकुटे मास्तर; शिक्षकांनी बदलत्या मानसिकतेचा विचार करायला हवा

प्रशांत जाधव, सातारा
मुलांच्या शिक्षणाला वळण लावून त्यातून नवनिर्मीतीचे असंख्य कोंब निर्माण करणारे मॅगेसेस पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांच्यासह जिल्ह्यातील विविध शाळेत चोख काम करून शाळेला एका वेगळ्या उंचीवर पोहचवणार्‍या शिक्षकांचा आदर्श मारकुट्या शिक्षकांनी घ्यावा का? हा प्रश्न पडण्याचे कारण तसे गंभीरच आहे. सातार्‍यातील एका तेरा वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षकाने अपमान केला म्हणून आत्महत्या केली. सातार्‍याच्या शिक्षण क्षेत्राला अशा घटना नव्या नसल्या तरी आत्महत्येच्या घटनेने काही शिक्षकांच्या बौध्दिक दिवाळखोरीचा नवा अध्याय समोर आला आहे. त्यामुळे सातार्‍यातील जावेद मास्तर (जावेद मास्तर ही व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे) आता तरी बोध घेणार का? या प्रश्नाने सुज्ञ सातारकारांची डोकी सध्या थंडावली आहेत. त्यामुळे “ सॉरी आयान आम्हाला माफ कर” ही अपराधी भावना सातारकरांच्या मनात निर्माण झाली आहे.

सातार्‍यातील गुरुवार पेठेत राहणार्‍या आयान इम्रान शेख (वय 13) या सातवीत शिकणार्‍या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल झाला. शनिवारी आयान याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शाळेत कॉपी पकडल्यानंतर त्याला शाळेत मुख्याध्यापकाने अपमानास्पद वागणूक दिल्यानेच त्याने आत्महत्या केल्याची तक्रार आयानच्या पालकांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली. तक्रारीनंतर पोलिस त्यांचे काम करतील, केसचा लागायचा तो निकाल लागेल.

पण आयानचा गेलेला जीव नक्कीच परत येणार नाही. पोटचा गोळा गेला म्हणून हळहळणार्‍या आईच्या वेदना, शाळेतून परत येणार्‍या आयानची वाट पाहत खोलवर गेलेले डोळे, कायद्याच्या परिघात येतील की नाही हे माहित नाही पण समाजाच्या न्यायालयात मात्र कायम त्या मास्तरलाच दोषी ठरवतील यात शंका नाही.

मृत आयान इयत्ता सातवीमध्ये शिकत होता. शुक्रवारी शाळेची परीक्षा सुरू होती. परीक्षेदरम्यान त्याने कॉपी केली होती. कॉपी पकडल्यानंतर शिक्षकांनी त्याला मुख्याध्यापकासमोर उभे केले. त्यावेळी मुख्याध्यापकाने आयान याला सर्व वर्गात फिरवत क्षमा मागण्यास सांगा असे, एका शिक्षकाला सांगितले. जावेद मास्तरने शिक्षा करताना कॉपी प्रकरणासाठी शिक्षा दिली त्यातुन आयानने धडा घ्यावा हा हेतु होता मात्र त्या शिक्षेचे सगळ्या वर्गातून सार्वजनिकीकरण झाल्याने आयान मनातून दुखावला गेला.

मुद्दा फक्त जावेद मास्तरचा नाही तर या प्रवृत्ती जिल्ह्यातील ग्रामीण भागात व शहरी भागात वाढल्या आहेत. त्यामुळे शाळेत गेलेला मुलगा परत येताना त्याची मनस्थिती काय असेल? या विचाराने पालकांची पुरतीच दमछाक होताना दिसते.

आचार्य विनोबाजी म्हणत असत की, मुलांचा चांगला विकास व्हायचा असेल तर घर शाळेत आणि शाळा घरी आली पाहिजे. त्याचा अर्थ फार मार्मिक आहे. मुलाला शाळेत घरासारखं प्रेम मिळायला हवं आणि शाळेतली शिस्त घरातही असायला हवी.

पालकत्वाच्या दृष्टीने शिक्षक आणि पालक या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. जोपर्यंत शाळेतल्या शिक्षकांना समोरच्या विद्यार्थ्यांबद्दल प्रेम, आस्था वाटत नाही तोपर्यंत विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात संवाद वाढणार नाही. काही वेळा शिक्षकही शिस्तीचा अतिरेक करतात.

प्रत्येक मुलं वेगळं, त्याची आकलनक्षमता वेगळी. त्यामुळे सर्वांसाठी एकच मोजपट्टी लावून चालत नाही. विध्यार्थ्यांचा आवाका लक्षात घेऊन शिकवणे ही शिक्षकाची जबाबदारी ठरते. लहानपणी आपण काय करत आहोत? त्याचे परिणाम काय होणार? हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून जे सहज वर्तन घडतं त्याचे निरीक्षण शिक्षकाने केले पाहिजे.

मुलांच्या स्वभावातील कोडगेपणा, उद्धटपणा, क्रौर्य या भावनांचा उगमही काही वेळा शिक्षेच्या अतिरेकात असतो. यामुळेच शिक्षकी पेशात असणार्‍या सर्वानीच शिक्षा या मुद्दयाकडे अधिक गंभीरपणे, सजगपणे पाहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शिक्षा करण्याचा विचार मनात आला की शिक्षकाने चुकीचे गांभीर्य पाहून परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा. विद्यार्थ्याची एखादी चूक व त्यासाठीची शिक्षा यात समानता व एकवाक्यता असली पाहिजे व ती मुलांना दिसलीही पाहिजे.

मुले जसजशी मोठी होतात, तशी त्यांची स्वप्रतिमा, स्वाभिमानाची व्याख्या अधिकाधिक स्पष्ट होते. शिक्षा विघातक नको, विधायक हवी, तनाला नको मनाला हवी- हा मुलमंत्र शाळेतल्या गुरूजींनी जपायला हवा. एखादी गोष्ट मुलाला येत नाही, हा मुलाचा दोष होऊच शकत नाही. एखाद्या मुलाने कॉपी केली म्हणून गंभीर किवा सार्वजनिक शिक्षा करणे हे गुलाम मानसिकतेचे लक्षण आहे. त्यामुळे शिक्षण विभागासह लोकप्रतिनीधींनी लक्ष घालत मुलांच्या बदलत्या मानसिकतेचा विचार कसा करावा याचे प्रशिक्षण शिक्षकांना द्यायला हवे.

शिक्षा करताना याचा विचार कराच
– मुलाचा गुन्हा तेवढा गंभीर आहे का?
– मुलाच्या वयाला ही शिक्षा योग्य आहे का?
– त्याच्या कोणत्या चुकीसाठी ही शिक्षा आहे, याची त्याला जाणीव होणार आहे का?
– शिक्षा देताना पूर्वआकस, स्वत:ची मन:स्थिती याचे प्रतिबिंब शिक्षेत पडते आहे का?
– शिक्षेतून वर्तन-बदलाची शक्यता आहे का?
– शिक्षेचा हेतू चुक सुधारणे हा आहे, की त्याच्यावर व इतर मुलांवर दहशत बसावी हा आहे?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
34 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
6 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)