मुलांच्या खेळांमध्ये संप, आंदोलन आणि भेदाभेद

भविष्यावर दूरगामी परिणाम होण्याची शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त होतेय भीती

श्रध्दा कोळेकर
पुणे, दि.12 – गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली आंदोलने, मोर्चे, भेदाभेद हे आता मुलांच्या रोजच्या खेळण्याचा एक भाग होऊ लागले आहेत. हल्ली काही ठिकाणी मुलं नेहमीच्या खेळांऐवजी संप संप, मोर्चा मोर्चा खेळताना दिसत आहे. सुरुवातीला पालक जरी हे गंमतीने घेत असले तरीही याचे त्यांच्या भविष्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतात, अशी भीती शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्‍त केली जात आहे.
गेल्या काही काळात जाती-जातींचे मोर्चे निघत आहेत. हे मोर्चे त्यांच्या त्यांच्या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरत असले तरीही मुलांकडून त्यांचे अनुकरण होताना दिसत आहे. कुठे बाईक रॅलीला पर्याय म्हणून लहान मुले सायकलवर झेंडे घेऊन फिरत आहेत. तर, हीच मुलं खेळाखेळामध्ये छोटेखानी मोर्चेही काढत आहेत. टिव्ही व वर्तमानपत्रात ज्या प्रमाणे काही आक्रमक कार्यकर्ते ओरडून बोलत आहेत त्याचेच अनुकरण करताना दिसत आहेत. संप पुकारताना आज कामाला आणि शाळांना सुटीही या छोट्यांच्या खेळात दिली जाते.
याबाबत बालमानसशास्त्र अभ्यासक व शिक्षणतज्ज्ञ श्रृती पानसे म्हणाल्या, समाजातील अस्थितरतेचे, भेदाभेदाचे, अहिंसेचे परिणाम हे केवळ काही वर्षांसाठी नाही तर पुढच्या संपूर्ण पिढीसाठी घातक ठरू शकतात. शाळेतला वर्ग ही मुलांसाठी समाजाची प्रतिकृती असते. हल्ली अनेक ठिकाणी तिथूनच भेदाभेद करायला सुरुवात झाली आहे. लहान मुलं ही मोठ्यांचे अनुकरण करत असतात. त्यामुळे मोठ्यांची जबाबदारीची भूमिका येथे गरजेची असते. मात्र, आज जी सर्वत्र अस्थिरता आहे ती पालकांच्या माध्यमातून किंवा समाजात घडणाऱ्या माध्यमातून मुलांमध्ये शिरकाव करत आहे. आपल्या मुलांनी काय पाहावे, काय ऐकावे या गोष्टी कदाचित आपल्या हाताबाहेर गेल्या असतील. परंतु, सध्या तरी आपल्या हातात या सगळ्यातून मुलांना न रागवता त्यांना या अहिंसक प्रवृत्तीतून, भेदाभेदाच्या विचारप्रक्रियेतून कसे बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कदाचित उद्या जाऊन त्या त्या जातींना, समाजांना आरक्षण मिळेलही. परंतु, कोवळ्या मुलांवर झालेले भेदाभेदा, हिंसेचे परिणाम आपण कसे थांबवू शकणार आहोत. याचा विचार प्रत्येक पालकाने करणे गरजेचे आहे. यातून मुलांना अलगद व नकळतपणे बाहेर काढत हळूहळू त्यांना स्वतंत्रपणे विचार करायला प्रवृत्त करण्याची गरज आहे.
– श्रृती पानसे, बालमानसशास्त्र अभ्यासक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)