मुलगी झाली हो…

आरती मोने

अनन्याला दवाखान्यात नेल्यापासून मी आणि अद्वैत बाहेर अस्वस्थपणे बसलो होतो. मधून मधून फेऱ्या मारत होतो. वेळ जादा जात नव्हता. अनन्या ही माझी सून. तिची आई तिच्या बहिणीच्या म्हणजे सुकन्याच्या बाळंतपणासाठी अमेरिकेला गेलेली. म्हणजे दोघी बहिणी थोड्याफार फरकानेच आई होणार होत्या. म्हणून मीही मोठेपणाने त्यांना सांगितले होते की तुम्ही सुकन्याकडे जा तिकडे मदतीची जास्त गरज आहे. मी अनन्याचे बाळंतपण करीत. पण हे असे बाहेर अस्वस्थपणे उभे राहणे किती कठीण असते. ते मला त्या दिवशी कळले. तेवढ्यात नर्स धावत आली आणि तिने “मुलगी’ झाल्याचे सांगितले. इतका वेळ अस्वस्थ असलेला माझा लेक अद्वैत खूष झाला. मी त्याला प्रेमाने जवळ घेतले. तेवढ्यात पांढऱ्या दुपट्यात गुंडाळलेला तो चिमुकला जीव नर्सने माझ्या हातात ठेवला काय नव्हते त्या स्पर्शात. नकळत डोळ्यातून आनंदाश्रू आले. थोड्या वेळाने स्थिरस्थावर झाल्यावर आम्ही अनन्याला भेटलो. खूप थकली होती. पण आई झाल्याच्या आनंदात होती.

मग माझी धावपळ सुरू झाली. दवाखाना, घर फेऱ्या सुरू झाल्या. पण सर्वजण खूष होते. एकेदिवशी सकाळी मी डबा घेऊन गेले तर अनन्या थोडी अस्वस्थ वाटली. मी तिला विचारले पण ती काहीपटकन बोलेना. मग मी हळूहळू तिच्या कलाने तिला बोलते केले. तेव्हा थोड्यावेळाने ती एकदम रडूच लागली. मला कळेना. काय करावे. मी तिला जवळ घेतले. मला वाटले तिला आईची आठवण येत असेल. पण ती रडता रडता म्हणाली. मला आईची आठवण येतेच आहे. पण सासूबाई मी तुम्हा दोघींसारखी चांगली आई होईन का हो? हा छोटा जीव मी सांभाळू शकेल का हो? किती नरागस आहे ती. या आजच्या जगात मुलगी होणं वाईट आहे का हो? रोज अत्याचाऱ्याच्या नवीन घटना आपण वाचतो. ऐकतो आहोत. कशी सांभाळू मी हिला? ही पण मोठी होईल, शाळेत जाईल, पाळणाघरात जाईल, खेळायला जाईल, बाहेरच्या जगात वावरताना खरंच ही सुरक्षित राहील का हो?

तिची काळजी अनाठायी नव्हती तिच्या प्रश्‍नांनी मीही क्षणभर विचारात हरवले. अनन्या म्हणाली, माझे बाबा, मी लहान असतानाच गेले. घरात आजी, आई व आम्ही दोघी बहिणी. सारे बायकांचेच राज्य. पण कधी भीती वाटली नाही आम्हाला. आई ऑफीसला जायची. आजी आम्हाला सांभाळायची थोड्या मोठ्या झाल्यावर आजी कधी बाबा काकूंकडे गेली तर आम्ही दोघीच घरात राहायचो. शेजारचे वर्वे काका, आपटे काकू मदत करायच्या बिल्डिंगमधील मुलेही खेळायला असायची. पण अशी भीती वाटली नाही कधी. आई, आपल्या घरी प्रथम मी बाबा आणि अद्वैत असलेल्या घरात राहिले. तो अनुभव मला नवीन होता.

खूप मोकळेपणाने बोलत होती. मी तिला म्हणाले, अगं एवढा विचार तू आताच का करते आहेस. अजून ही बेबी खूप लहान आहे तू थकलेली आहेस. छान आराम कर. पण तिची समजूत काढताना माझे विचारचक्र थांबत नव्हते. मी अद्वैत आणि अनिशची आई होते. मुलींच्या तक्रारी मी प्रत्यक्ष ऐकल्या नव्हत्या. बोलता बोलता मी बाळाला तिच्या जवळ ठेवले आणि म्हणाले बघ किती आशेने ती तुझ्याकडे बघते आहे. अगं कदाचित ती उद्याची सिंधू किंवा साईना असेल, कल्पना चावला असेल, मिताली राज असेल, नाहीतर माधुरी दीक्षित किंवा ऐश्‍वर्या किंवा इंदिरा गांधी असेल, आनंदीबाई जोशी असेल, सुनिता विल्यम्स असेल. मला आठवत असलेल्या विविध क्षेत्रातल्या स्त्रियांची मी तिला उदाहरणे दिली. अगं, आता प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. मुलगी म्हणून ही कुठेच कमी पडणार नाही. ती उत्तम गायिका होईल, डॉक्‍टर, इंजिनिअर, पायलट, इन्स्पेक्‍टर, आयएएस ऑफीसर होईल. अगं परवा त्या स्वाती महाडिकची टी.व्ही.वर मुलाखत होती. नवरा गेल्याचं दुःख बाजूलासारून, दोन मुलांची आई लेफ्टनंट बनली आहे.
या आणि अशा किती कर्तबगार स्त्रियांबद्दल मी तुला सांगू. तू असा विचार कर मुलगी म्हणून तिची जपणूक तू नक्कीच कर पण काळजी मात्र करू नकोस.

अनन्या थोडी शांत झाली. पण माझ्या मनात प्रश्‍न उभे राहिले. रोज घडणाऱ्या या गोष्टींना कुणीच पायबंद का घालू शकत नाही. फाशीची शिक्षा करण्यापेक्षा, या घटना घडूच नयेत म्हणून समाजात कधी विचार होणार आहे का? रोज तेच तेच वाचून अक्षरशः आता कंटाळा आला आहे आणि चिडही. “बेटी बचाओ’ मोहीम चालविताना त्या जन्माला येणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेची काळजी कोण करणार आहे? मुलगी झाली हो हा आनंद साजरा करताना त्यांच्या भोवती सुरक्षिततेचं कडं समाजात उभे करायला हवं तरच तो निर्मितेचा आनंद खरा असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)