मुरली विजयला दुखापत, शिखर धवनचा समावेश

श्रीलंका दौऱ्यासाठी संघ जाहीर

नवी दिल्ली – नियमित सलामीवीर मुरली विजयने मनगटाच्या दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे या महिना अखेर सुरू होत असलेल्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघात धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनचा समावेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत मुरली विजयला झालेली ही दुखापत अद्याप बरी झाली नसून पूर्वतयारीच्या सराव सामन्यादरम्यान मनगाटत वेदना होत असल्याची तक्रार विजयने केली होती. त्यामुळे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या शिखर धवनचा संघात समावेश करण्यात आला आहे.

येत्या 26 जुलै रोजी भारतीय संघाचा श्रीलंका दौरा सुरू होत असून या दौऱ्यात भारतीय संघ तीन कसोटी सामने खेळणार असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी दिली. तसेच या दौऱ्यात भारतीय संघ पाच एकदिवसीय सामने व एकमेव टी-20 सामनाही खेळणार आहे. एकदिवसीय संघाचा नियमित सदस्य असलेल्या धवनने कसोटी क्रिकेटमध्ये 23 सामन्यांत 38.62 सरासरीने 4 शतकांसह 1464 धावा केल्या असून तो गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत आपला अखेरचा कसोटी सामना खेळला होता.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, रविचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), ईशांत शर्मा, उमेश यादव, हार्दिक पांड्या, भुवनेश्‍वर कुमार, महंमद शमी, कुलदीप यादव व अभिनव मुकुंद.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)