मुद्रा प्राणायाम नियमित करा

सुजाता टिकेकर

जर नियमित योगसाधना आणि प्राणायाम केला तर त्यापासून फायदाच मिळतो. त्याचप्रमाणे फार पुरातन कालापासून मुद्रा शास्त्र हे देखील चांगल्याप्रकारे विकसित झाले.या मुद्रांसमवेत प्राणायामाचे विविध प्रकार केले असता आपले विविध आजार बरे व्हायला मदत होते.म्हणून योगसाधकांनी मुद्रा प्राणायामही नियमित करावा. तो नियमित करणाऱ्या व्यक्‍तीच्या जवळ आजार अजिबात फिरकत नाही. एवढेच नव्हे तर कोणत्याही आजारातही हे मुद्रा प्राणायाम आपल्याला तो आजार बरा करायला मदतच करतात.

नीता ही नियमित मुद्रा व प्राणायाम करणारी पंचविशीची मुलगी! एकदा ती प्रवासाला निघाली असताना तिच्या गाडीला अपघात झाला. नीताला खूप लागले. रक्तस्राव होत होता. तशाही परिस्थितीत तिने विशिष्ट मुद्रा करून प्राणायाम करायला सुरूवात केली. त्यामुळे मदत मिळेपर्यंत ती शुद्धीवर राहिली व हळूहळू रक्तस्राव नियंत्रित झाला. पुढचे उपचार मिळाल्यावर इतरांपेक्षा ती लवकर बरी झाली व या अपघाताचे कुठलेही दुष्परिणाम मागे राहिले नाहीत.तसेच सर्वांना नियमित भेडसावणारी एक समस्या म्हणजे कॅल्शियमच्या कमतरतेमूळे पटकन भेडसावणारे दंतविकार अशावेळी काही मुद्रा केल्या असता दंतवेदना कमी व्हायला मदत होते. आरोग्यासाठी मुद्रा प्राणायाम शिकण्यापूर्वी प्राणायामासंबंधी सर्व आवश्‍यक व उपयुक्‍त माहिती घेणे गरजेचे आहे. मुद्रांसोबत फक्‍त विशिष्ट आकड्यात व लयीत श्‍वास घेणे व सोडणे एवढेच अपेक्षित आहे.

आरोग्यासाठी मुद्रांचा अभ्यास जेव्हा प्राचीन जाणकारांनी केला तेव्हा आपले शरीर, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्त्वांनी बनलेले आहे हा निकष मानून मुद्रा ठरवल्या गेल्या. निसर्गोपचाराचा हाच मूळ सिद्धांत आहे. निसर्गाने तयार केलेल्या शरीरात काही बिघाड झाला तर तो दुरूस्त करण्याची क्षमता व अधिकार निसर्गाने आपल्याकडे राखून ठेवला आहे. जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे. म्हणूनच मुद्रा धारण करून आपली शारीरिक मानसिक अध्यात्मिक प्रगती करता येते. निसर्ग नियम हा आजारांसाठी देखिल लागू आहे. शरीराचा आजार निसर्गच बरा करू शकतो. व त्याच्याशी संलग्न आहे मुद्राशास्त्र. आपल्या दोन्हीही हातांचा उपयोग करून विशिष्ट दाब देऊन त्या बिंदूपाशी थांबणे आवश्‍यक आहे. ज्याचा आपल्या शरीर व मनावर सकारात्मक परिणाम होतो.आधुनिक जीवनशैलीशी जुळवून घेताना जुने ते सोनेच आहे हे आपण ध्यानात ठेवावे व मुद्राशास्त्राचा दैनंदिन जीवनात योगासमवेत समावेश करावा. मुद्रा प्राणायामाचा अभ्यास जरूर करावा फक्‍त त्यासाठी योग्य तज्ञ हवा.

बुद्धीवर्धक – ज्ञान किंवा ध्यानमुद्रा
तर्जनी व अंगठा यांचे टोक ए23र्कमेकांवर हलके दाबून बाकीची बोटे थोडीशी वाकवलेली ठेवावीत. ध्यानात बसताना ही मुद्रा करतात. या मुद्रेने चंचलपणा कमी होतो. निद्रानाशाचा विकार बरा होतो. स्वभाव शांत होतो. एक तासापर्यंत या मुद्रेत बसता येते. हळूहळू कालावधी वाढवावा आणि आपल्या जीवनातील ताणतणाव कमी करावा.

मनोविकारावर करा – वायुमुद्रा
अंगठ्याजवळचे बोट वाकवून त्याचा अग्रभाग अंगठ्याच्या मुळाशी टेकवताना या मुडपलेल्या बोटाचा दाब येतो. बाकीची तीनही बोटे सरळ ठेवावी. जास्त ताठ किंवा कडक ठेवू नयेत. रागावर विजय मिळविणारी ही विजय मुद्रा आहे. अंगठा अग्नितत्व आणि तर्जनी वायूतत्व असले तरी अग्निमुळे वायु चेतविला न जाता उलट शांत होतो. जर मान लचकली असेल तेव्हा कोणताही मानसिक आजार असेल तर ही मुद्रा नियमित रोज करावी. पाय मुरगळला तरी ही मुद्रा करणे प्रभावी ठरते.

सांधेदुखीवरील नियमित उपाय – आकाशमुद्रा
अंगठ्याच्या अग्रभागी मधले बोट टेकवून हलका दाब दिला असता आकाशमुद्रा तयार होते. जी आपली अस्थिमज्जा बळकट करते. आखडलेला सांधा या मुद्रेने बरा होतो. आपल्या शरीरात असंख्य पोकळ नलिका आहेत ज्यातून रक्‍त आणि रस पुढे पुढे वहात असतो. आकाशमुद्रा जर नियमित केली तर आपली हाडे बळकट रहातात. सांधे मोकळे होतात. अशी ही आकाशमुद्रा प्रत्येकाने रोज करावी.

कानदुखीवर प्रभावी – शुन्यमुद्रा
वाढलेले आकशतत्व कमी करण्यासाठी प्रथम मधले बोट अंगठ्याच्या मुळापाशी टेकवावे. अंगठ्याने या मधल्या बोटावर हलका दाब द्यावा. इतर बोटे सरळ ठेवावीत. जर कान दुखत असेल तर ही शुन्य मुद्रा रोज नियमित करावी. हिचा कालावधी आहे अर्धा तास. रोज सकाळी आणि संध्याकाळी अर्धा तास ही मुद्रा करावी म्हणजे अकाली बहिरेपणा येत नाही.

मासिक पाळीत उपयुक्‍त – सूर्यमुद्रा
करंगळीशेजारील बोट म्हणजे अनामिका वाकवून तिचा अग्रभाग अंगठ्याच्या मुळाशी टेकवून अनामिकेवर अंगठ्याने दाब द्यावा. सूर्यमुद्रा पद्मासनात करणे इष्ट. सूर्याप्रमाणे तेजस्वी उर्जास्त्रोत शरीरात निर्माण होतो. या मुद्रेमुळे चरबी कमी व्हायला मदत होते. स्त्रीयांच्या मासिकपाळीच्या विकारात तसेच पोटदुखी, कंबरदुखीवर, मानसिक ताणावर सूर्यमुद्रा प्रभावी आहे.

उत्साह प्रदान करणारी – पृथ्वीमुद्रा
अनामिकेचा अग्रभाग आणि अंगठ्याचा अग्रभाग एकमेकांवर हलके दाबले असता पृथ्वीमुद्रा तयार होते. आपला थकवा घालवून आपल्याला उत्साह प्रदान करणारी ही पृथ्वीमुद्रा आहे. वयोमानामुळे काम होईनासे होते. अशावेळी जर नियमित पृथ्वीमुद्रा केली तर जीवनात उत्साह वाढतो थकवा कमी होतो.

पित्त, गॅसेसचा त्रास घालवणारी वरूणमुद्रा
करंगळीचा अग्रभाग अंगठ्याच्या अग्रभागावर ठेवून हलका दाब द्यावा. ज्यांना कोणाला ऍसिडीटीचा त्रास होत असेल त्यांनी जलतत्वाचे प्रतिनिधीत्व करणारी ही वरूणमुद्रा नियमित धारण करावी. त्वाचारोगही नाहीसे करते. खाज,कंड बरा करते.वाढलेले वजन कमी करते.

किडनी विकारांवर उपयुक्‍त – जलोदरनाशक मुद्रा
करंगळी अंगठ्याच्या मुळाशी टेकवावी आणि अंगठ्याने करंगळीवर दाब द्यावा. बाकीची तीन बोटे सरळ ठेवावी. दुखापत होईल इतपत दाब देऊ नये. ही मुद्रा करताना सावधगिरी बाळगावी. जर ही जास्त वेळ करत राहिले तर शरीरामध्ये कोरडेपणा निर्माण होतो. काहीवेळी पाणी साठून पोटाचा आकार वाढलेला असतो. तसेच हत्तीरोग होतो. किडनीवर ताण येऊन ती सूजते. अशावेळी शरीरातील विषारी द्रव्यांचे प्रमाणही वाढलेले असते. पण न घाबरता जर नियमित जलोदरनाशक मुद्रा धारण केली तर त्याचा फायदाच होतो.

नवचैतन्य देणारी – प्राणमुद्रा
करंगळी आणि त्याच्या शेजारचे बोट यांच्यावर अंगठ्याच्या अग्रभाग हलकेच ठेवावा. बाकीची दोन्ही बोटे तर्जनी आणि मधले बोट सरळ ठेवावे. ही मुद्रा नियमित केल्यामुळे प्रतिकारशक्‍ती वाढते. शरीर बलवान होते, आळस, कंटाळा, निरूत्साह जातो. कार्यशक्‍ती वाढते. रक्‍तप्रवाह सुरळीत होतो. जलतत्व आणि पृथ्वीतत्व एकत्र येऊन आपल्याला जगायला टॉनिक मिळते. याला ग्रासमुद्रासुद्धा म्हणतात. ज्यामध्ये अपान, व्यान, उदान, समान, व ब्रह्म अशा मुद्रा येतात.

हृदयविकारग्रस्तांसाठी – अपानमुद्रा
मधले बोट आणि त्याच्या शेजारचे बोट एकत्र जुळवून त्यावर अंगठ्याचा अग्रभाग टेकवावा. करंगळीआणि तर्जनी सरळ ठेवावी. रोज अशापद्धतीने पानवायुमुद्रा केल्यास हृदयाला बळकटी येते. युरिनरी इन्फेक्‍शन कमी होते. मुळव्याधीचा त्रास कमी होतो. याच्या जोडीला प्राणायाम केला असता शरीराला योग्य परिणाम होतो म्हणून मधुमेहींनीसुद्धा ही अपानमुद्रा रोज करावी.

शर्करा समतोल राखणारी- शंखमुद्रा
डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताच्या तळहातावर ठेवावा. उजव्या हाताची अंगठा सोडून चार बोटे डाव्या हाताच्या अंगठ्यावर ठेवून मूठ बांधावी. डाव्या हाताची तर्जनी व उजव्या हाताचा अंगठा त्याचे अग्रभाग एकमेकांना जोडावेत. बाकीच्या तीन बोटांनी बंद मुठीवर हलका दाब द्यावा. दोन्ही हाताची आलटूनपालटून रोज शंखमुद्रा बांधावी. कंबरेच्या खालच्या सर्व अवयवांवर शंखमुद्रेचा परिणाम होतो. नाभीचक्र, पोटातील लहान व मोठे आतडे, यांचे कार्य सुधारते. तसेच थायरॉईड ग्रंथींचे कार्य सुधारते. गायकांनी व सतत बोलणाऱ्यांनी आपला आवाज राखण्यासाठी ही मुद्रा रोज करावी.

शौच तक्रारीवर – सहजशंख मुद्रा
मुलबंध बांधताना जी शंखमुद्रा केली जाते तीच सहजशंखमुद्रा होय. शक्‍यतो वज्रासनात करतात. यामुळे गुदद्वाराचे स्नायू बळकट होतात. षड्रिपूंवर विजय मिळविणारी मुद्रा होय.

खेळाडूंना प्रिय अशी – लिंगमुद्रा
दोन्ही हाताची बोटे एकमेकांत गुुंफावी. डाव्या व उजव्या हाताचा अंगठा ताठ ठेवावा. दोन्ही हाताची मूठ आवळून घ्यावी. ही मुद्रा उभे राहून करावी किंवा पद्मासनात बसून करावी. यामुळे प्रत्येक पेशींपर्यंत प्राणवायु जातो. तसेच पाठीच्या कण्याचे विकार होत नाही.

एकटेपणात करावयाची मुद्रा – कमलमुद्रा
डाव्या हाताने पृथ्वीमुद्रा व उजव्या हाताने ध्यानमुद्रा करून निराशा व एकटेपणावर मात करता येते. पाच वेळा दीर्घश्‍वसन करावे. पाचही बोटे व तळहाताचा खालचा भाग एकमेकांना चिकटवून कमळाचा आकार करावा. तर्जनी, मध्यमा, अनामिका ही बोटे उघडून बाहेरच्या बाजूला ताणून धरावी.

अध्यात्मिक प्रगतीसाठी – नागमुद्रा
डाव्या हाताची बोटे उभी ठेवून उजव्या हाताच्या बोटांनी ती बोटे क्रॉस धरावीत व अंगठ्याने अंगठा दाबावा. ही मुद्रा केल्यामुळे मुलाधार व स्वादिष्ठान चक्रामध्ये ज्ञानाग्नि प्रज्वलित होतो.

हाडांच्या विकारावर – सुरभीमुद्रा
डावी मध्यमा आणि उजवी तर्जनी आणि डावी करंगळी आणि उजवी अनामिका एकमेकांना स्पर्श करून अंगठे ताणावेत. असे दररोज पंधरा मिनिटे करावे.

शांत, उत्तम वर्तणुकीसाठी – कल्लेश्‍वर मुद्रा
दोन्ही मध्यमेची टोके एकमेकांना टेकवून अंगठे एकमेकांवर टेकवावे. छातीसमोर धरावे अनामिका आणि करांगुली आत वळवावी. दोन्ही तर्जनी पहिल्या दोन सांध्यांना एकमेकांवर टेकवावी.

दैवीहृदयस्थ शक्‍तीसाठी – आंतर्चैतन्यमुद्रा
दोन्ही हाताच्या तर्जनी, मध्यमा, अनामिका, करांगुली या चारही बोटांची टोके जुळवावी. अंगठे एकमेकांना जुळवावेत. बोटांची टोके जिथे जुळतात तिथे लहान पोकळी निर्माण होते त्याकडे आज्ञाचक्रसमोर धरून एकटक पहावे.

सायुज्जता प्राप्तीची – अंजलीमुद्रा
दोन्ही हातांची ओंजळ करून अ आ ई पासून ह ळ क्ष पर्यंत एकावन्न मातृकांचा उच्चार कमीत कमी दोनवेळा करावा.

पाठदुखीवर उपयुक्‍त -पृष्ठमुद्रा
उजव्या हाताने मध्यमा आणि करांगुली यांच्या टोकाला अंगठ्याच्या अग्रभागाने हलका दाब. तर्जनी आणि अनामिका सरळ ठेवावी. तर डाव्या हाताने तर्जनीच्या नखावर अंगठ्याचा पहिला साधा किंचित्‌ जोर देऊन ठेवावा. सहजासनात 15 मिनिटे अनुलोम-विलोम करत बसावे.

अपचनावर – गोकर्णमुद्रा
हाताचा पंजा खोलगट करून गाईच्या कानाचा आकाराने तळहाताच्या खोलगट भागत अग्नितीर्थ प्राशन केले जाते. मनगटाकडील बाजूवरील पाणी प्राशन केल्यास आत्मतीर्थ. करंगळीच्या खालील भागाकडून जल अर्पण केल्यास ऋषीतीर्थ. अंगठा आणि तर्जनीच्या मधल्याभागातून जे जल सोडतात ते पितृतीर्थ, आणि संकल्प पूजेच्या वेळी किंवा मंत्रपोथी पठणाच्यावेळी मधल्या बोटावरून सोडतात त्या जलास देव तिर्थ म्हणतात.
अशाप्रकारे आपल्याला प्राणायामाबरोबर धार्मिक आणि आरोग्यदायी मुद्राही करणे आवश्‍यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)