मुद्रांक शुल्क विभागाचे टार्गेट “दृष्टीपथात’

9 हजार कोटींचा महसूल जमा : एकूण उद्दिष्टाच्या 44 टक्‍के वसूल

प्रभात वृत्तसेवा

पुणे – राज्य शासनाने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला 2017-18 या आर्थिक वर्षात 21 हजार कोटींचा वसूल जमा करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. दस्तनोंदणीतून मुद्रांक विभागाकडे 9 हजार 101 कोटींचा महसूल जमा झाला असून एकूण उद्दिष्टाच्या सुमारे 44 टक्‍के महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला आहे.

राज्याला महसूल देणाऱ्यामध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे या विभागाकडे जमा होणाऱ्या महसुलाकडे सर्वांचे लक्ष असते. राज्याच्या तिजोरीत जमा होणाऱ्या महसुलाच्या आधारेच पुढील विकासकामांना निधी वितरीत करण्याचे आराखडे तयार होत असतात. वर्षभरात दस्त नोंदणीतून मिळलेले मुद्रांक शुल्काच्या आधारे शासन नोंदणी विभागाला मुद्रांक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट देते. 2017-18 या आर्थिक वर्षात शासनाने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला 21 हजार कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे.

सदनिका, जमीन आणि दुकाने यांच्या खरेदी – विक्रीच्या व्यवहारातून नोंदणी विभागाकडे मुद्रांक शुल्क जमा होते. त्याचबरोबर विविध प्रकारच्या करारनामे दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविले जातात. यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागते. या दस्तांच्या नोंदणीतून नोंदणी विभागाकडे महसूल जमा होतो. 1 एप्रिल ते 22 ऑगस्ट 2017 पर्यंत नोंदणी विभागाकडे 9 हजार 101 कोटींचा महसूल जमा झाला आहे. एप्रिल महिन्यात 1 लाख 95 हजार 631 दस्त नोंदविले गेले असून त्यामधून 1 हजार 603 कोटींचा महसूल शासनाला मिळाला आहे. मे महिन्यात 1 लाख 92 हजार 890 दस्त नोंदविण्यात आले असून 1 हजार 776 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. जून महिन्यात 2 लाख 20 हजर 794 दस्त नोंदणीतून 2 हजार 612 कोटींचा महसूल तर जुलै महिन्यात 1 लाख 96 हजार 105 दस्त नोंदविले गेले आहेत. 1 हजार 838 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. तर ऑगस्ट महिन्यात 1 हजार 270 कोटींचा महसूल जमा झाला आहे.

2016 – 17 या आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2016 ते 31 ऑगस्ट 2016 या पाच महिन्यांच्या काळात नोंदणी विभागाकडे 9 लाख 64 हजार 915 दस्त नोंदविले गेले तर 8 हजार 347 कोटींचा महसूल जमा झाला होता. गतवर्षाच्या तुलनेत या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यात नोंदणी विभागाकडे सुमारे 754 कोटी रुपये अधिक जमा झाला आहे. तसेच 21 हजार कोटींच्या उद्दिष्टांपैकी सुमारे 44 टक्‍के महसूल जमा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)