मुद्दा: मराठी जनतेची माफक अपेक्षा

जयेश राणे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत मुंबईतील कांदिवली येथे उत्तर प्रदेश महापंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सभेत उत्तर प्रदेश, बिहार येथील मंडळींच्या महाराष्ट्राशी संबंधित विविध गोष्टींवर भाष्य केले. व्यक्‍त करण्यात आलेले विचार नेहमीच ऐकण्यात येत असले तरी असे विचार मांडले पाहिजे असे मनातून अनेकांना वाटत असते. पण त्याला काही मर्यादा येतात. मुळात या गोष्टीच्या राजकीय भागात अजिबात पडायचे नाही, हे सुस्पष्ट करू इच्छितो. नेमक्‍या कोणत्या गोष्टी महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात कायम घुटमळत असतात?

शासकीय सेवेत उच्चपदावर उत्तर प्रदेश, बिहार येथील मंडळी सर्वाधिक आहेत, हे सर्वश्रुत आहे. मुंबईत दीर्घकाळ वास्तव्यास असलेल्या एका उत्तर प्रदेशच्या इस्त्रीवाल्याने सांगितले की, “हमारे राज्य मे हर घर में एक सरकारी कर्मचारी मिलेगा.’ हे प्रमाण नक्‍कीच चक्रावणारे आहे. देशातील कोणत्याही राज्यापेक्षा या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रमाण किती असेल? हे यावरून लक्षात येते. “सरकारी नोकरी मिळाली, तर चांगलेच आहे; अन्यथा महाराष्ट्र आहेच,’ अशी कुठेतरी धारणा मनामध्ये रुजल्याप्रमाणे वाटते.

महाराष्ट्रातील काही शिक्षणसंस्था त्या राज्यांत जाऊन तेथील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी महाराष्ट्रात येण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्याप्रमाणे काही विद्यार्थी येथे प्रवेशही घेतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथे ते नोकरी करतात. सर्वाधिक नोकरीच्या संधी महाराष्ट्रात उपलब्ध होत आल्याने, घरही येथेच खरेदी करतात. त्या मागोमाग विवाह आणि पर्यायाने तयार होणारे कुटुंबही येथेच वास्तव्य करू लागते. अपवाद स्वरूपात काहींचे कुटुंब त्या राज्यांत असते. जन्म त्या राज्यांत होतो. मात्र सर्वतोपरी “आवश्‍यक पालनपोषण’ महाराष्ट्रात होते. हे येथे ठळकपणे अधोरेखित होते. उत्तर प्रदेश हे देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. पण त्या तुलनेत विकासाचे काय? जी विविध सरकारे सत्तेवर आली त्यांनी काय केले? असा प्रश्न विशेषत: महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला आहे. त्या राज्यांतील अनेकांनी महाराष्ट्र काय आहे, हे प्रत्यक्ष अनुभवले आहे, अनुभवत आहेत; पुढेही अनुभवत राहतील.

यापैकी शेवटच्या टप्प्यात किती मंडळी असतील, याविषयी काही सांगता येत नाही. पण त्या राज्यांनी आपल्या विकासाच्या कक्षा अधिक रुंदावाल्यास, ती राज्ये ते महाराष्ट्र अशा वारंवार होणाऱ्या खेपा कमी होतील आणि कित्येकांना स्वराज्यात, स्वगृहाजवळच नोकरी-व्यवसाय उपलब्ध होईल.

विशेषत: उत्तर प्रदेशमध्ये हिंदूधर्मातील अनेक महत्त्वपूर्ण तीर्थस्थळे आहेत. त्या ठिकाणी जाण्याच्या निमित्ताने त्या राज्यात जाणे होते. तीर्थस्थळांना जाण्याचा भाग सर्वांनाच शारीरिक, आर्थिकदृष्ट्‌या परवडत नाही. त्यामुळे जे या दोन्ही गोष्टींत सक्षम आहेत, तेच बहुतांशपणे तीर्थयात्रा करत असतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतील मंडळी पोहोचली आहेत. मात्र अन्य राज्यांसह महाराष्ट्रातील मंडळी ही तेथील ठराविक ठिकाणीच पोहोचली आहेत.

देशात मुंबईचे आकर्षण सर्वांनाच आहे. खरं तर या शहराची क्षमता (निवास, नोकरी-व्यवसाय) केव्हाच संपली आहे. येथील लोकसंख्येत भर पडत असल्याने पायाभूत सुविधांवर येणारा ताण प्रवासाच्या वेळेस अनुभवण्यास मिळतो. त्यामुळे साहजिकच चीडचीड होते. नागरिकांच्या सेवेत पायाभूत सुविधा द्याव्यात तेवढ्या अल्प आहेत, अशी स्थिती आहे. आपले वास्तव्य बैठ्या खोल्यांत असले तरी “स्वच्छता’ ही अत्यावश्‍यक आहे. कारण रोगराई पसरण्यास ती गोष्ट कारणीभूत असते. सार्वजनिक व्यवस्था स्वच्छ्तेचे कार्य त्यांच्या कार्यकक्षेपर्यंत करत असते. त्यापुढील कार्य कोणी करायला पाहिजे? हे न सांगता कळायला हवे. त्यासाठी सुशिक्षितच असले पाहिजे असे नाही! पण या गोष्टीमुळे खरोखरच त्रास होतो, हे वास्तव आहे.

कसे वागावे, बोलावे या गोष्टींवर एक वेगळा विषय होऊ शकतो. एखादी गोष्ट अति होते तेव्हा तिच्याविषयी चर्चा, संघर्ष यांना तोंड फुटते. हे सर्व का होते, याचा अभ्यासपूर्ण विचार ज्यांनी करायला पाहिजे त्यांच्याकडून तो होत नाही. केवळ आमच्याकडेच बोट दाखवले जाते, असेही वर म्हटले जाते. जो चुकतो त्याकडे चुकतो म्हणूनच बोट दाखवणार? अर्थातच हे कोणासाठी आहे याविषयी वेगळा उल्लेख करण्याची आवश्‍यकता नाही. नाहीतर प्रभू श्रीरामाची सीता कोण? याप्रमाणे विचारणा करण्यासारखे व्हायचे.

भारतातील बहुसंख्य लोक विशेषत: अमेरिका, आखाती देश आदी ठिकाणी वास्तव्य करत आहेत. मात्र भारतीयांच्या वागणुकीपासून आम्हाला त्रास होत आहे, असा नाराजीचा सूर त्या देशातील मूळ जनतेकडून कधीच ऐकू आला नाही. हे सूत्र विचार करण्याजोगे आहे. हा आदर्श घेतच अन्य राज्यांतही वाटचाल करता येईल.

उत्तर प्रदेश, बिहारमध्ये औद्योगिक क्षेत्र नाही का? महाराष्ट्रापेक्षा दिल्ली, कोलकाता ही दोन महानगरे युपी-बिहारपासून जवळ आहेत. पैकी एकतर देशाची राजधानी आहे. तरीही महाराष्ट्रातच येणे का होते’, असे प्रश्‍न बिहारींना विचारले तर ते म्हणतात की, “आमच्या राज्यात महाराष्ट्राप्रमाणे नोकरी-व्यवसायाच्या संधी नाहीत. अंधाधुंदपणा अधिक आहे. दिल्ली-कोलकातापेक्षा मुंबई आणि महाराष्ट्र अधिक चांगला वाटतो.’ आता या राज्यांचा विकास व्हायचा असेल, तर तेथील नेत्यांनी महाराष्ट्रासारखी संधी नागरिकांना त्याच राज्यांत देणे आवश्‍यक आहे.

भारतातील कोणत्याही राज्यात जाऊन कोणीही नोकरी-व्यवसाय करू शकतो, हे मान्यच आहे. आपल्याकडे एखादी गोष्ट नसल्यास ती शेजाऱ्यांकडून मागून घेऊन अपवादात्मक प्रसंगी आपण अडलेले कार्य पूर्ण करत असतो. शेजाऱ्यांनी अडलेल्या काळात साहाय्य केले म्हणून वारंवार त्यांच्याकडे तगादा लावत नाही. सहाय्याची आवश्‍यकता सर्वांनाच भासत असते; मात्र सर्व गोष्टी तारतम्य बाळगून केल्या जात असतात. या सूत्राचा विचार उत्तरप्रदेश, बिहार येथील मंडळींनी अगत्याने केला पाहिजे.

युपी-बिहार या राज्यांना विकासाच्या अनुषंगाने कृतीशील होण्यास पुष्कळ वाव आहे. कारण नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने त्या दोन्ही राज्यांतील बहुतांश मंडळी महाराष्ट्रातच डेरेदाखल होत आली आहेत, होत आहेत. वेगवान “विकास’ ही त्या राज्यांची खरी आवश्‍यकता आहे. त्या राज्यांचा विकास झपाट्याने झाल्यास देशाच्या प्रगतीचा वेग वाढणार आहे. हे का लक्षात घेतले जात नाही ? संख्याबळाने सर्वाधिक खासदार उत्तर प्रदेशमधून निवडून लोकसभेवर जातात; पण त्यांचे कार्य त्या राज्यात ठळकपणे दिसले पाहिजे. शेजारधर्म कसा असावा याविषयी महाराष्ट्राने देशातील सर्वच राज्यांतील मंडळींना उत्तमप्रकारे साहाय्य केले आहे. असा व्यापकपणा सर्वांत यावा हीच महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)