मुजोर टोल कर्मचाऱ्यांना कोण घालणार वेसण ?

-निष्क्रिय व्यवस्थापनामुळे आनेवाडी टोलनाक्‍याला गुंडगिरीचे ग्रहण
– ट्रकचालकास मारहाण केल्याचे घटनेने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण
– व्यवस्थापनाने संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

सातारा – रिलायन्स कंपनी आणि स्थानिक व्यवस्थापनाच्या अधिपत्याखाली चालविल्या जाणाऱ्या आनेवाडी टोलनाक्‍याला सध्या गुंडगिरीचे ग्रहणच लागले आहे. वाहनधारकांना मारहाण करणे, एखाद्या वाहनभोवती घोळक्‍याने तुटून पडणे, स्थानिक वाहनधारकांशी वारंवार टोल घेण्यावरुन हुज्जत घालणे वेळप्रसंगी त्यांच्या कॉलरलाही हात घालण्याचे धाडस दिवसेंदिवस टोलनाक्‍यावरील काही उर्मट कर्मचाऱ्यांकडून वाढले असून या उद्धट कर्मचाऱ्यांना कोण वेसण घालणार की यापुढेही वाहनधारकांनी या कर्मचाऱ्यांची दादागिरी सहनच करायची असा सवाल वाहनधारकांसह स्थानिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे.

गत काही दिवसांपूर्वी जावली तालुक्‍यातील एका राजकीय पदाधिकाऱ्याला टोल घेण्यावर कर्मचाऱ्यांनी हुज्जत घालत अरेरावीची भाषा वापरत धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी वृत्तपत्रांमधूनही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. याशिवाय याआधीही टोलनाक्‍याविषयी विशेषत: काही कर्मचाऱ्यांच्या दादागिरीच्या बातम्याही वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र, व्यवस्थापनाकडून या कर्मचाऱ्यांची पाठराखणच करण्याचे काम आजवर केले आहे. त्यामुळे या “काही’ उद्धट कर्मचाऱ्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.

मंगळवारी रात्री आनेवाडी टोलनाक्‍यावरील नेहमीच्याच काही उद्धट कर्मचाऱ्यांनी एका ट्रक चालकाशी हुज्जत घालत त्याला बेदम चोप दिला. एखाद्या जनावराला ज्याप्रमाणे मारावे त्याप्रमाणे ट्रकचालकास मारहाण केली जात होती. मात्र, संबंधित ठेकेदार, रिलायन्स कंपनीचे अधिकारी याठिकाणी आले नाहीत, की या कर्मचाऱ्यांना अडविले नाही. मंगळवारी घडलेल्या या घटनेमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्यवस्थापनालाही बरं वाटतय का?
वादग्रस्त घटनांमुळे आनेवाडी टोलनाका वारंवार चर्चेत राहिला आहे. सध्या या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यापूर्वी वाहनधारकांशी वाद घालण्यापर्यंत कर्मचाऱ्यांची मजल जात होती. मात्र, सध्याच्या निष्क्रिय व्यवस्थापनामुळे याठिकाणी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये उद्धटपणा वाढला असून या उद्धट कर्मचाऱ्यांची मजल आता वाहनधारकांना मारहाण करण्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे भविष्यात याठिकाणी खुनासारख्या घटना घडण्याचीही शक्‍यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे वारंवार या ठिकाणी वादावादी, हाणामारीच्या घटना घडत असताना व्यवस्थापन मात्र “हाताची घडी आणि तोंडावर बोट’ अशी भूमिका घेत असल्यामुळे व्यवस्थापनालाही “चाललय ते बरं वाटतंय का?’ असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

पोलिसांचा कारवाईत आखडता हात
एरव्ही आनेवाडी टोलनाक्‍यावर सकाळपासून वाहतूक पोलीस वाहने अडवून त्यांच्यावर नानाविध नियमे लादून दंड वसुल करण्यात दंग असतात. रात्री उशिरापर्यंत याठिकाणी भुईंज पोलीस ठाण्याचे कर्मचारीही उपस्थित असतात. मात्र, वाहनधारकांशी कर्मचाऱ्यांचा वाद सुरु असताना या पोलिसांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. वाद सुरु आहे इतपर्यंत ठिक, परंतु वादाचे रुपांतर मारहाणीत झाले तरीदेखील हे पोलीस त्याकडे लक्ष देण्यास टाळटाळ करात. त्यामुळे पोलिसांविषयी देखील सर्वसामान्यांमधून असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे. भुईंज पोलिसांकडून नेहमीच टोल कर्मचाऱ्यांना झुकते माप देऊन वाहनधारकांना समज दिला जात असल्याबाबतही वाहनधारकांमधून तक्रारी आहेत. त्यामुळे टोल व्यवस्थापन आणि भुईंज पोलीस यांच्यात कोणत्या प्रकारचे हितसंबंध आहेत, याविषयीही चर्चा सुरु आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)