मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले श्रमदान

वाघापूर-महाराष्ट्र शासन आणि पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने पुरंदर तालुक्‍यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2017 चे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण तालुक्‍यात या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच अनेक कंपन्या आणि सामाजिक व सर्वच क्षेत्रातील व्यक्‍तींनी या स्पर्धेत महाश्रमदान करून प्रतिसाद दिला आहे. तसेच या स्पर्धेत पुणे जिल्हा परिषदेनेही सहभाग घेऊन महाश्रमदान केले.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई तसेच पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने – पाटील, तसेच ग्रामसेवक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच पुरंदर मेडिकल असोशिएशनने महाश्रमदान करून मोहिमेचा उत्साह वाढविला.
यावेळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक सुरेश सस्ते, त्याचप्रमाणे ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संदीप ठवाळ, सचिव पुंडलिक म्हस्के, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश दळवी, उपाध्यक्ष डॉ. तृप्ती भोईटे, सचिव डॉ. संदीप होले, कृषी विस्तार अधिकारी सुनील गायकवाड, नारायणपूरच्या सरपंच सुनीता बोरकर, माजी सरपंच रामभाऊ बोरकर, प्रवीण पोमण, संदीप पोमण, किसाबाई पोमण, शशिकांत पोमण, भिमराव बोरकर, ग्रामसेवक महेश म्हेत्रे, तसेच पंचायत समितीचे विविध विभागांचे विस्तार अधिकारी, कर्मचारी, गावातील ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका कुलकर्णी या सर्वांनी मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली.
गुरूवारी (दि. 18) सकाळी 7 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांचे पोखर येथे आगमन झाले. त्यानंतर सकाळी सलग तीन तास त्यांनी श्रमदान केले. यामध्ये सलग समतल चर, अनघड दगडी बांध, शेताची बांध बंदीस्ती, माती नाल्याचे पिचिंग आदी विकासकामे केली. तसेच यापूर्वी झालेल्या सर्व कामांची बारकाईने पाहणी करून समाधान व्यक्‍त केले आणि आतापर्यंत एवढ्या प्रमाणात कामे केल्याबद्दल पोखर येथील ग्रामस्थांचे कौतुक केले. पुढील मोहिमेस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी आणलेल्या जेवणाचा सर्वांबरोबर आस्वाद घेतला.

  • ग्रामसेवक संघटनेकडून पोखरला पाच हजारांची मदत
    दरम्यान पोखर येथे पाणी फाउंडेशनचे मोठ्या प्रमाणात काम सुरू असून अनेक कंपन्या आणि नागरिकांनी या मोहिमेला प्रतिसाद दिला आहे. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांनी श्रमदान करून ग्रामस्थांचा उत्साह वाढविला. या मोहिमेत पुरंदर तालुका ग्रामसेवक युनियनने ही श्रमदान करून सहभाग नोंदविला. तसेच ग्रामस्थांचा उत्साह पाहून या मोहिमेस हातभार लावण्यासाठी जेसीबी मशीनच्या डिझेल खर्चासाठी रोख स्वरूपात पाच हजारांची मदत ग्रामसेवक महेश म्हेत्रे यांच्याकडे सुपूर्द केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)