मुख्य आर्थिक सल्लागारांनी केली राजन यांची प्रशंसा

एनपीए समस्येवर वर्ष-दोन वर्षांत तोडगा निघेल साशंक
नवी दिल्ली – मावळते मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन्‌ यांनी आज आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची न वसूल होणाऱ्या कर्जाची (एनपीए) समस्या योग्यप्रकारे ओळखल्याबद्दल प्रशंसा केली. राजन यांचा कार्यकाळ संपताना त्यांचे मोदी सरकारशी मतभेद असल्याचे स्पष्ट झाले होते.

भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीपुढे आज सुब्रमण्यन्‌ उपस्थित राहिले. एनपीएच्या समस्येवर वर्ष-दोन वर्षांत तोडगा निघेल, असा दावा बॅंकर्सकडून केला जात आहे. मात्र, त्याबाबत सुब्रमण्यन्‌ यांनी साशंकता व्यक्त केली. त्या समस्येवर मात करण्यासाठी आणखी पाऊले उचलावी लागतील, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मोठी कर्जे देण्याच्या सार्वजनिक बॅंकांच्या निर्णयांवर प्रभाव टाकला जात असल्याचेही त्यांनी सूचित केले. मात्र, कोणाकडून आणि कसा प्रभाव टाकला जातो हे सांगण्याचे त्यांनी टाळले. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पद सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या सुब्रमण्यन्‌ यांच्याआधी संसदीय समितीने अर्थ मंत्रालयाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत आणि विशेषत: बॅंकिंग क्षेत्राबाबत माहिती घेतली. वाढते बॅंक घोटाळे हा मोठ्या चिंतेचा विषय बनला आहे. बॅंकिंग क्षेत्रापुढे एनपीए समस्येने बडे आव्हान उभे केले आहे. बॅंकांच्या एनपीएची रक्कम तब्बल 8.99 लाख कोटी रूपयांपर्यंत पोहचली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)