मुख्यसभेत “वाजले ढोल’

विकासकामे ठप्प : मनसेने सत्ताधाऱ्यांचे वेधले लक्ष

– शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचा खर्च तपशील सादर करण्याची मागणी

पुणे – गेल्या चार महिन्यांपासून शहरातील विकासकामे रखडली आहेत. अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता; ते दुर्लक्ष करतात. परिणामी, त्याचा त्रास पुणेकांना सहन करावा लागत आहे. या प्रकाराकडे भाजपचे लक्ष वेधण्यासाठी तसेच त्यांचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे गटनेते वसंत मोरे यांनी सोमवारी मुख्यसभेतच ढोल वाजविला. शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेशोत्सवासाठी करण्यात येणाऱ्या खर्चाचा तपशीलही मुख्यसभेत सादर करावा, अशी मागणी यावेळी मोरे यांनी केली.

सोमवारी मुख्यसभा सुरू होताच; मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि त्यांच्या समवेत विरोधीपक्षांचे काही नगरसेवक सभागृहात ढोल घेऊन येत होते. त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी मोरे यांना अडविण्याचा प्रयत्न करत त्यांना सभागृहात जाण्यास मज्जाव केला. या वेळी सुरक्षा रक्षकांबरोबरच भाजप नगरसेवकांनीही सभागृहाचे दार अडवून धरले. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मोरे यांच्यासह शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपचा विरोध मोडून काढत ढोलसह सभागृहात प्रवेश केला. त्यामुळे काही काळ सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या अडवाअडवीत काही नगरसेवकांना किरकोळ जखमाही झाल्या. मात्र, भाजपचा विरोध मोडीत काढून सभागृहात आल्यानंतर मनसे आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त कुणाल कुमार यांच्या समोरच ढोल वाजवत सत्ताधारी भाजपच्या कार्यपध्दतीचा निषेध केला. तसेच विकास कामे का होत नाहीत? अधिकारी काम सोडून भाजपच्या कार्यक्रमाची जबाबदारी का घेतात? असा सवाल करत खुलासा करण्याची मागणी यावेळी विरोधीपक्षांच्या नगरसेवकांनी केली.

मागील चार महिन्यांपासून शहरात कोणत्याही प्रकारची कामे केली जात नाहीत. प्रशासन आणि सत्ताधारी मिळून केवळ जाहिरातबाजी गुंतल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र त्यातही ते अपयशी ठरत असून सर्व सामान्यांच्या पैशांवर डल्ला मारण्याचे काम त्यांनी केले आहे. शहरातील विकास कामे मार्गी लागली पाहिजेत आणि शतकोत्तर रौप्य महोत्सवाबाबत खुलासा करण्यात यावा.
– वसंत मोरे, गटनेते, मनसे.

महापालिकेत नियोजनशून्य कारभार सुरू आहे. याचा नाहक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. याबाबत कोणीही भूमिका जाहीर करीत नाही. ही निषेधार्थ बाब आहे. सर्व सामान्य नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी आम्ही करू देणार नाही. सद्यस्थितीला प्रशासन आणि सताधारी पक्षाची कार्यपद्धती निषेधार्ह आहे.
– संजय भोसले, गटनेते, शिवसेना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)