मुख्यसभेतही “पाणी तापले’!

पाणी प्रश्‍नी पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर टीका


गिरीश बापट यांनी राजीनामा द्यावा : विरोधक

पुणे – पुणेकरांच्या डोक्‍यावर पाणीकपातीचे संकट कमी न झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी महापालिका मुख्यसभेत गदारोळ झाला. विरोधी पक्षातील सर्वच सदस्यांनी पालकमंत्री आणि जलसंपदामंत्री यांच्या भूमिकेवर टीका करत, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

“दोन गिरीशचे जमेना, पुणेकरांना पाणी मिळेना’ अशा शब्दांत प्रशांत जगताप यांनी टीका केली. “धरणात पाणीसाठा चांगला असताना हिवाळ्यात पुणेकरांना घाम फोडला आहे,’ असेही जगताप म्हणाले. “प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांचा आपापसात आणि राज्यसरकारशी समन्वय नाही,’ अशी टीका दिलीप बराटे यांनी केली.

“कोणतीही कल्पना न देता जलसंपदा विभाग पाणी बंद करतो, याचा मी निषेध करतो. पुणेकर आता शांत आहेत पण वेळ आल्यास पुणेकर तुम्हाला जागा दाखवतील,’ असे सुभाष जगताप म्हणाले.

“लोकसंख्या वाढली, तर साठाही वाढला पाहिजे. पाण्याचा खेळखंडोबा केला आहे,’ अशी टीका संजय भोसले यांनी केली. “आपण सर्वजण मिळून पाण्याचा प्रश्न सोडवू,’ असे गोपाळ चिंतल म्हणाले.

“पाटबंधारे खाते तुमच्याशी हुकुमशाही पद्धतीने वागते, त्याचा तुम्हाला राग येत नाही का,’ असा प्रश्‍न कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी विचारला. “उपोषणाला बसण्याचे खासदारांनी जाहीर केले. पण बसले नाहीत. या नाटकांमधून बाहेर निघा. तुम्ही सत्ताधारी आहात असे वाटते तरी का? नागरिकांचे प्रश्‍न सोडवताना तुम्ही सत्ताधारी आहात असे वाटले पाहिजे, फक्त पदे उपभोगण्यापुरतेच तुम्हाला ते वाटते,’ अशी उपरोधिक टीका शिंदे यांनी केली.

“पाणीकपात करा, असे म्हणणाऱ्या बापटांना पुणेकरांचे पाण्याचे हाल दिसत नसतील, तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत मुख्यमंत्री, गिरीश बापट आणि गिरीश महाजन यांच्या भांडणात पुणेकरांचे हाल का करत आहेत,’ असा प्रश्‍न शिंदे यांनी सभागृहात उपस्थित केला.

“ही कृत्रिम टंचाई आहे. काही लोकांच्या आग्रहाखातर पाटबंधारे खात्याचा हा कारभार सुरू आहे, असा आरोप चेतन तुपे यांनी केला. 24 तास पाणी द्या म्हणणारे सदस्य आता निदान एक तास तरी पाणी द्या, असे म्हणत आहेत. खरीच अशी परिस्थिती असेल तर शहरात टंचाई आहे असे जाहीर करा,’ अशी मागणी तुपे यांनी केली. “कोट्यवधी रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्‍या बांधल्या आहेत. पण त्यात पाणीच नाही मग त्या बांधून उपयोग काय,’ असा प्रश्‍न तुपे यांनी उपस्थित केला. “यामाध्यमातून आपण अंदाजपत्रकाच्या चिंधड्या केल्या आहेत,’ असा आरोपही तुपे यांनी केला. तर, “पाणी कपात होऊ देणार नाही,’ अशी ग्वाही सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

महापौर म्हणतात…
“पाटबंधारे खात्याच्या मनमानी कारभारावर कालवा समितीच्या बैठकीत चर्चा झाली,’ असे महापौरांनी सभागृहात सांगितले. “पुरेसे पाणी मिळावे याबाबत कोणाचे दुमत नाही. परंतु मुंढवा जॅकवेलमधून पाटबंधारे खाते पुरेसे पाणीच उचलत नाही, ही वस्तुस्थितीही समोर आली आहे. पुणेकरांना आपण आवाहन केले, तर पुणेकर पाणी काटकसरीने वापरातील हे आजपर्यंत दिसून आले आहे,’ असे महापौर म्हणाल्या. “हेच पाणी वॉशिंग सेंटर, बांधकाम आणि गाड्या धुण्यासाठी वापरले जाते. त्या वापराबाबत आयुक्त सूचना काढतीलच. परंतु आपणही जनजागृती केली पाहिजे,’ असे महापौर म्हणाल्या. “उखाळ्या-पाखाळ्या काढण्यापेक्षा प्रशासनाला पाठिंबा देऊन पुढील 6-7 महिने पुरेल एवढे पाणी आपण देऊ शकतो. येत्या दोन दिवसांत योग्य तो निर्णय जलसंपदा मंत्री घेतील, परंतु योग्य नियोजन करण्यात आपण कुठेही कमी पडू नये,’ असेही महापौरांनी नमूद केले.

आयुक्‍त म्हणतात…
“पाण्याचा अपव्यय होत असेल तर त्यावर उपाययोजना करण्यात येईल. तसेच पाइपलाइन मध्ये बिघाड झाल्यास त्वरित दुरुस्तीसाठी प्रतिसाद कसा देता येईल यावर काम सुरू आहे. लष्कर हद्दतील बंद पाइपलाइनचे काम पूर्ण झाले असून, 1 डिसेंबरला ती सुरू करण्यात येणार आहे,’ असे आयुक्तांनी मुख्यसभेत सांगितले.

“धरणांत मागच्या वर्षीपेक्षा 15 टक्के म्हणजेच 5 टीएमसी पाणी कमी आहे. पुणे जिल्ह्यातील 15 पैकी 11 तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले आहेत. आता नाही, तर पुढे पाणीवापर काटकसरीने करावाच लागणार आहे. खासगी बागा, जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर, बांधकाम यांना पाणीवापराबाबत नोटीस द्यावी लागणार आहे. पाणीवापराच्या जनजागृतीबाबत स्वयंसेवी संस्था मदत करणार आहेत,’ असेही आयुक्तांनी सभागृहात सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)