मुख्यमंत्र्यांचा डाव हाणून पाडणार

उजनीतून मराठवाड्यास पाणी नेण्यास विरोध; लोकप्रतिनिधींह शेतकरी धरणावर उतरणार

पुणे – उजनी धरणातील पाणी मराठवाड्याला नेण्याकरिता सुरू असलेले बोगद्याचे काम पूर्ण होत आले असताना कृष्णेचे पाणी उजनीत आणण्याकरिताची योजना मात्र अद्यापही रेंगाळली आहे. हे पाणी उजनीत आले नाही तर पुणे जिल्ह्यातील धरणं रिकामी करून उजनीत येणारे पाणी मराठवाड्याला वळविण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत हा डाव हाणून पाडू, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते आणि जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रविण माने यांनी दिला आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारापत्र पाठविण्यात आले असून येत्या शनिवारी (दि.24) उजनी धरणावर पाण्यासाठीचे आंदोलन पेटणार आहे. याकरिता आमदार दत्तात्रय भरणे, सभापती प्रविण माने यांच्यासह हजारो शेतकरी उजनी धरणावर उतरणार आहेत.

याबाबत सभापती माने यांनी सांगितले की, उजनी धरण शंभर टक्के भरलेले असताना एकाच महिन्यांत 40 टक्के पाणी सोलापुरात सोडण्यात आले. धरणात 60 टक्के पाणीसाठा असताना आणखी पाण्याची मागणी आताच होवू लागली आहे. पुणे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असताना पाणी सोडता येणार नसल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले असले तरी पुढील काळात पुणे जिल्ह्यातील धरणं रिकामी करून उजनीत आलेले पाणी सोलापुरलाच नव्हे तर मराठवाड्याला बोगद्यातून नेण्याचा छुपा कार्यक्रम युती सरकारने आखला आहे.

कुंभी-कासारी-कडवी-वारणा-कृष्णा-नीरा ते भीमा असा सुमारे 200 किलोमीटरच्या नदीजोड प्रकल्पातून उजनीत पाणी आणण्याची योजना आहे. कोल्हापूर-सांगली-सातारा-पुणे-उस्मानाबाद ते सोलापूर या जिल्ह्यांतून या पाण्याचा प्रवास होणार आहे. यानुसार कृष्णेचे पाणी नीरा नदीत आणून नीरा-भीमा जोड देवून हे पाणी उजनी धरणात आणण्याचे काम सुरूवातीला होणे अपेक्षित होते. परंतु, हे काम रेंगाळले असताना नीरा आणि भिमा जोडचे काम मात्र 70 टक्के पूर्ण झाले आहे. यामुळे सोलापुरसह मराठवाड्यातून पिण्याच्या पाण्याची मागणी झाल्यास उजनी भरण्याकरिता पुणे जिल्ह्यातीलच धरणं रिकामी करावी लागणार आहेत. यातून पुणे जिल्ह्याचा मराठवाडा होण्यास वेळ लागणार नाही, याच कारणातून अगोदर कृष्णेचे पाणी आणा, याकरिताची योजना सुरवातील पूर्ण करा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, येथे फक्त नीरा-भीमाचे काम वेगाने सुरू आहे. सरकारच्या या कारभाराला संतप्त शेतकऱ्यांतून विरोध होवू लागला आहे.

गुजरात राज्यात वापरण्यात आलेल्या ग्रीड पद्धतीनुसार मराठवाड्यातील धरणावरून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. मराठवाड्यात सर्वत्र पाणीपुरवठा योजनेचे (ग्रीड) जाळे निर्माण झाल्यास येथील पिण्याचे पाण्याचे संकट कायमस्वरुपी हटण्यास मदत होईल, असा दावा केला जात असला तरी हे पाणी उजनीतून नेण्यात येणार आहे. 21 टीएमसी पाणी उजनीतून मराठवाड्यातील सर्वच आठ जिल्ह्यांना पाईपलाइनद्वारे देण्यात येणार आहे. उजनी धरणातील पाणी लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांना देण्याबरोबच जायकवाडीतून औरंगाबाद, निम्न दुधना प्रकल्पामधून जालना, येलदरी प्रकल्पातून हिंबोली, परभणी तर इसापूर व विष्णुपुरी धरणातून नांदेड जिल्ह्याला पाणी देण्याचा प्रस्ताव आहे.

चार हजार कोटी खर्च अपेक्षित…
उजनीचे पाणी मांजरा धरणात आणून पाईपलाइनच्या माध्यमातून लातूरबरोबरच उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब, शिराढोण, बीड जिल्ह्यातील धारूर, केज, अंबाजोगाई. लातूर जिल्ह्यातील मुरूडसह अन्य शहरांना व 50 गावांना देण्याची योजना आहे. या योजनेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मराठवाड्याला पाणीपुरवठा करण्याच्या चार हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या योजनेलाही मान्यता दिली आहे. हे सगळे नियोजन पाहता पश्‍चिम महाराष्ट्रसह पुणे जिल्ह्यातील पाणी पळविण्याचा डाव असल्याचे लक्षात येते. यालाच आता विरोध होऊ लागला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)