रिक्षाचालकाने लोकशाही दिनात व्यक्त केली भावना

मुंबई: मुख्यमंत्री साहेब, माझ्या तक्रारीची आपण दखल घेऊन मला न्याय मिळवून दिला. थेट आपल्याशी बोलायला मिळाले, आपला आभारी आहे’, अशा शब्दात उल्हासनगर येथील रिक्षाचालक अरुण खैरे यांनी आपली भावना लोकशाही दिनात आज व्यक्त केली.

आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 110 वा लोकशाही दिन झाला. यावेळी पनवेल, शहापूर, पुणे, लातूर, सांगली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, यवतमाळ, पंढरपूर, चांदूरबाजार येथील नागरिकांच्या तक्रारींवर सुनावणी करण्यात आली.

उल्हासनगर येथील अरुण खैरे रिक्षाचालक आहेत. त्यांच्या पाल्याला अंबरनाथ येथील गुरुकुल ग्रॅण्ड युनियन शाळेत शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश मिळाला असून ही शाळा आपल्या पाल्याला गणवेश, पाठ्यपुस्तक देत नसल्याबाबत तक्रार केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तक्रार ऐकून योग्य ती कार्यवाही करण्याबाबत निर्देश ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पालक श्री. खैरे व संबंधित शाळेच्या प्राचार्य उपस्थित होते. दोघांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. खैरे यांच्या पाल्याला गणवेश आणि पाठ्यपुस्तके शाळेमार्फत देण्यात येतील, अशी ग्वाही प्राचार्यांनी दिली. तक्रारीवर तोडगा निघाल्याने श्री. खैरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि मुख्यमंत्र्यांशी थेट बोलायला मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)