मुख्यमंत्री म्हणतात मोहिते पाटील “आपले’?

  • खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची राजकीय बदलाची हवा

अकलुज – आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात काहीतरी वेगळे चित्र पहायला मिळण्याचे संकेत मिळू लागले आहेत. आतापर्यंत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. पण, आता यापुढे जाऊन माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनाही कमळाची भुरळ पडल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातारा दौऱ्यात राष्ट्रवादीचे माढा मतदारसंघातील खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची पूर्णवेळ उपस्थिती लक्षवेधी ठरतानाच त्यांच्या राजकीय बदलाची हवा जोरात वाहत आहे. या दौऱ्यात भाजपच्या डॉ. दिलीप येळगावकर यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मोहिते पाटील यांना जाहीरपणे “आपले’ म्हटल्याने नव्या समीकरणांची चर्चा ठळक झाली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस हे दोन दिवस साताऱ्यात होते. या दौऱ्यात गुरुवारी (दि.18) सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्‌घाटन झाले. या उद्‌घाटन कार्यक्रमास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. उद्‌घाटनानंतर मुख्यमंत्री कार्यालयाची पाहणी करीत असताना सहपालकमंत्री सदाभाऊ खोत आणि विजयसिंह मोहिते पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात चर्चा करीत नियोजन भवनाकडे गेले. बैठक संपल्यावर मुख्यमंत्री शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी चहापानासाठी गेले. पण, त्यांचे हे चहापान प्रेमाचे की राजकीय, याची सध्या चर्चा रंगली आहे. शुक्रवारी (दि.19) सकाळी मुख्यमंत्री कोरेगाव, खटाव आणि माण तालुक्‍यातील जलयुक्तच्या कामांच्या पाहणीसाठी गेले. त्यावेळी संपूर्ण दौऱ्यात विजयसिंह मोहिते-पाटील यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
माणमधील सीसीटीची पाहणी करताना किरकसालचे राष्ट्रवादीचे सरपंच अमोल काटकर यांची विजयसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी ओळख करून दिली. त्यावेळी ते आमचे कार्यकर्ते आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले, त्यावर डॉ. दिलीप येळगावकरांनी आमचे नव्हे आता आपले म्हणाकी, असा चिमटा काढला. हा चिमटा अनेकांच्या भुवया वर करून गेला. आगामी काळात केवळ साताऱ्यातच नव्हेत तर माढ्यातही कमळाची पेरणी होण्याचे संकेत मिळत आहेत. मागील आठवड्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी माण, खटावचा दौरा केला. या दौऱ्यात मात्र, विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित नव्हते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)