देहुरोड – राज्यातील वारकरी सांप्रदयाची श्रद्धास्थानातील स्थानिक नागरिकांचे महत्त्वाचे प्रश्‍न आणि विविध विकासकामांची पाहणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव श्रीकांत भारती यांनी देहूनगरीला भेट देऊन पाहणी केली.

या वेळी श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज्यातील संत ज्ञानेश्‍वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्‍ताबाई, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या कर्मभूमीत नेमक्‍या कोणत्या समस्या आहेत. याची पाहणी करून त्या जाणून घेण्यासाठी आलो असून, भविष्यात या समस्या सोडविण्याचे प्रयत्न करण्यासाठी भेट दिली असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी देहूच्या नागरिकांकडून समस्या जाणून घेतल्या व विकास आराखड्यातील अपुऱ्या कामांची माहिती घेतली.

यामध्ये प्रामुख्याने देहू-आळंदी रस्त्याचे भूसंपादन व रस्ता करणे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, सांडपाणी व्यवस्थापन आणि इंद्रायणी नदीवर बोडकेवाडी येथील बंधारा, मुख्यमंदिराच्या मागे इंद्रायणी नदीमध्ये छोटा बंधारा आणि इंद्रायणी व सुधा नदीच्या संगमावरील वसंत बंधारा नव्याने बांधणे या संदर्भात प्रामुख्याने चर्चा केली. यानुसार येणाऱ्या विविध समस्यांवर त्यांनी चर्चा केली. यानंतर संस्थान व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे मत जाणून घेतले. आपल्या समस्या लिखीत स्वरूपात देण्यासंदर्भात सूचना दिल्या.

या वेळी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, विश्‍वस्त अशोक निवृत्ती मोरे, सुनील दामोदर मोरे, अभिजित मोरे, विठ्‌ठल मोरे, माजी विश्‍वस्त नितीन मोरे, सरपंच उषा चव्हाण, माजी सरपंच हेमा मोरे, ग्रामपंचायत सदस्या दिपाली जंबुकर, संजय जंबुकर, संभाजी टिळेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)