मुख्यमंत्री फडणवीसांना सांगलीत दाखवले काळे झेंडे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक
सांगली (प्रतिनिधी) – राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास टाळाटाळ केल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त भेदत काळे झेंडे दाखवून निदर्शन केले. दोन दिवसांपूर्वीच संघटनेचे अध्यक्ष विकास देशमुख यांनी तसा इशारा दिला होता. आंदोलक कार्यकर्ते महावीर पाटील, संजय बेले, अभिजित पाटील, वैभव चौगुले यांना अटक करण्यात आली.
भोसे (ता. मिरज) येथे संघटना पदाधिकारी व शेतकऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्यात निदर्शने करण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर पाळत ठेवत नाकेबंदी केली होती. मात्र, आज सकाळीच या कार्यकर्त्यांनी प्रशासकीय इमारतीच्या आवारात प्रवेश केला होता. चौफेर बंदोबस्त असूनही हे कार्यकर्ते पोलिसांना ओळखता आले नाहीत. मुख्यमंत्री उद्धाटन करून बाहेर पडत असताना प्रवेशद्वारावरच अचानकपणे कार्यकर्ते प्रगट झाले. काळे झेंडे दाखवत त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणा दिल्या. कर्जमाफीस नकार देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. नियोजित वेळेआधीच अर्धा तास मुख्यमंत्री आले होते. अवघ्या पंधरा मिनिटांचाच हा कार्यक्रम होता. घोषणा सामोरे जातच मुख्यमंत्री दौऱ्यातील अन्य कार्यक्रमासंसाठी रवाना झाले.
मुख्यमंत्र्यांची गाडी अडवून रस्त्यावरच जाब विचारू, इतर मंत्र्यांच्या गाड्या फोडल्या जातील, निवडणुकीपूर्वी या नेत्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची ग्वाही दिली. आता शेतमालाला भावही नीट नाहीत, कर्जमाफी लांबचा विषय आहे. उत्पादन खर्चाच्या 50 टक्के नफा देण्याचे काय झाले? भाजपला बळीराजाने भरभरून मते दिली, यांनी थट्टा मांडली आहे. हीच मंडळी आता शेतकऱ्यांना शिव्याही देत आहे, असा उद्वेग कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. पोलिसांनी तत्काळ कार्यकर्त्यांना अटक केलर. घोषणा देतच कार्यकर्ते पोलिस गाडीमध्ये जाऊन बसले. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी शिवसेनेने कृषी परिषद घेतली असून या परिषदेसाठी सरकारला सातत्याने लक्ष्य करणारे शेट्टी निमंत्रित वक्ते आहेत. शेट्टींनी भाजप कोट्यातून आमदार व मंत्री झालेल्या सहकारी सदाभाऊ खोत यांना सातत्याने धारेवर धरताना शिवसेनेशी सलगी वाढवली आहे. आज मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांनी हा रोख कायम ठेवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)