मुख्यमंत्री, प्रशासकीय यंत्रणांमधील संवादाची चौकशी करा – अॅड. प्रकाश आंबेडकर

पुणे – कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या घटनेनंतर कोणी, किती वाजता मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि फोनवर नक्की काय संवाद झाला. हे समोर यायला हवे. तसेच काही मंत्र्यांनी फोन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिले. मुख्यमंत्र्यांनी जर आदेश दिले असतील तर संबंधित अधिकाऱ्यांनी ते अंमलात आणले की नाही, या गोष्टी स्पष्ट होण्यासाठी कोरेगाव भीमा हिंसाचारानंतर मुख्यमंत्री, मंत्री आणि प्रशासकीय यंत्रणांमध्ये झालेल्या संवादाची चौकशी करावी, अशी मागणी भारीप बहूजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे केली.

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या उच्चस्तरीय न्यायालयीन समितीची दुसऱ्या टप्प्यातील साक्ष नोंदविण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी अॅड. आंबेडकर यांनी प्रा. म. ना. कांबळे यांच्या वतीने आपली बाजू चौकशी आयोगाचे अध्यक्ष जे. एन. पटेल आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांच्यापुढे मांडली.

-Ads-

अॅड. आंबेडकर म्हणाले, सरकारी यंत्रणांची चुक कुठे झाली, हे शोधणे आयोगाचे काम आहे. यामध्ये जो काही संवाद झाला आहे, तो सर्व आयोगासमोर यायला हवा. हिंसाचाराचा घटनाक्रम पाहता दि. 20 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2017 पर्यंत काय घडले आणि एक जानेवारीला काय घडले तसेच एल्गार परिषद म्हणजे काय, हे आयोगाने समजावून घ्यायला हवे. त्यासाठी ग्रामपंचायत, शहर, ग्रामीण पोलिस, गृहविभाग, गुप्तचर संघटना यांसह संबंधीत मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा जबाब नोंदवायला हवा. संबंधित गावातील ग्रामसेवक आणि इतर अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे काही पुरावे दिले आहेत, असे आंबेडकरांनी सुनावणीदरम्यान सांगितले. त्याबाबत विचारले असता, हे सर्व पुरावे आयोगाकडे आहेत. यावर बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामीण पोलिस आणि शहरी पोलिसांनी वेगवेगळे निष्कर्ष काढले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या सर्व प्रकारणात स्थानिक शिरुर पोलिस स्टेशनने कोणती कारवाई केली. कारवाई केली नसेल तर का नाही केली, याचीही चौकशी व्हावी, असे त्यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)