मुख्यमंत्री पुण्यात; पदाधिकारी परदेशात

पुणे – महापालिकेत सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पहिले दिड वर्षे स्मार्ट सिटीच्या कारभारावर नाराज असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याकडे पाठ फिरविली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच मुख्यमंत्री फडणवीस पुण्यासाठी वेळ काढत असले तरी, त्यांच्या हस्ते उद्या होणाऱ्या महापालिकेच्या कर्वे रस्त्यावरील दुमजली उड्डाणपुलाचे भूमिपूजन महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत होणार आहे. महापौरांसह, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि काही विषय समित्यांचे अध्यक्ष परदेश दौऱ्यावर असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. तर आयुक्त सौरभ राव हे देखील परदेश दौऱ्यावर असल्याने ते सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित राहणार नाहीत.

महापालिका आणि मेट्रोकडून कर्वे रस्त्यावर दुहेरी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने हे भूमिपूजन रखडले होते. त्यानंतर त्यांनी वेळ दिली असून हा कार्यक्रम पालिकेकडून आयोजित केला आहे. तसेच त्याच्या निमंत्रण पत्रिकाही पालिकेने तयार केल्या असून त्याचे वाटप केले आहे. मात्र, या पत्रिकेत नाव असलेले सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी या सर्व कार्यक्रमाची जबाबदारी स्विकारली असून त्यांच्याकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच हा कार्यक्रम सत्ताधारी पदाधिकारी नसल्याने उपमहापौर आणि विषय समिती अध्यक्षांच्या उपस्थित होणार आहे.

चर्चांना उधान
भारतीय जनता पक्ष 2017 मध्ये महापालिकेत सत्तेत आल्यानंतर पहिले वर्षभर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे शहराकडे पाठ फिरविली होती. भाजप सत्तेत आल्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडून स्मार्ट सिटीच्या कामाबाबत तक्रारी असल्याने तसेच योजनेचे कामही रेंगाळलेले असल्याने मुख्यमंत्री नाराज होते. त्यामुळे पालिकेच्या कार्यक्रमांनाही त्यांच्याकडून वेळ दिला जात नव्हता. पहिल्या वर्षात त्यांनी केवळ महापालिकेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाला हजेरी लावली होती. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकांमुळे मुख्यमंत्री पुण्यातील उद्‌घाटने आणि कार्यक्रमांसाठी वेळ देत असतानाच महापालिकेच्याच कार्यक्रमास पदाधिकारी परदेश दौऱ्यावर असल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)