मुख्यमंत्री घेणार पदाधिकाऱ्यांची “शाळा’

राज्यभरातील महापालिकांच्या कामाचा स्वतंत्र आढावा
प्रभात वृतसेवा
पुणे, दि. 27 – राज्यसरकारला तीन वर्षे पुर्ण होत असल्या निमित्ताने आणि पुढील दोन वर्षात येत असलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकींच्या तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभरातील महापालिका पदाधिकाऱ्यांची शाळा घेणार आहे. या महापालिकांच्या कामकाजाचा आढावा घेण्या बरोबरच राज्यशासनाची मागील तीन वर्षातील कामगिरीचा आढावा सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मिरा-भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधीनी मध्ये प्रत्येक महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची आणि शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तीन दिवसांची कार्यशाळा घेतली जाणार आहे. या कार्यशाळेसाठी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना नुकत्याच सूचना देण्यात आल्या असून मागील सहा महिन्या केलेल्या कामांचा आढावा तयार ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
राज्यात 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकी मध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवीत राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर राज्यातील 26 महापालिकांमधील तब्बल 19 महापालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असून त्या ठिकाणी भाजपचा महापौर आहे. या महापालिकांच्या कामकाजांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: घेणार आहे. गणेशोत्सवानंतर सर्व महापालिकांच्या प्रत्येकी तीन दिवसांच्या आढावा बैठका घेतल्या जाणार आहे. यात महापालिकेत सत्तेत आल्यानंतर पक्षाकडून करण्यात आलेली कामगिरी, पक्षवाढीचा आढावा, तसेच राज्यशासनाच्या योजना अगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीपूर्वी केंद्र व राज्यसरकाच्या कामाचा प्रचार आणि प्रसार शेवटच्या घटका पर्यंत कशा प्रकारे करण्यात यावा यावर चर्चा केली जाणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रक प्रदेश पातळीवरून तयार केले जात असून लवकरच महापालिकेस ते कळविण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.
—————
पुण्यातील पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू
स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालिका पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची सलग तीन दिवस बैठक घेऊन कामाचा आढावा घेणार असल्याने पालिका पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. या कार्यशाळेची माहीती प्रदेशपातळीवरून महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांना कळविण्यात आली असली तरी, त्याच्या तारखा अद्याप कळविण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान, ही तीन दिवसांची कार्यशाळा असल्याने शहरातील सर्व पदाधिकारी तसेच नगरसेवकांना त्यासाठी जावे लागणार आहे. त्यामुळे महापालिकेला असलेल्या सलग सुटटयांच्या वेळेस ही कार्यशाळा घ्यावी अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रदेश नेत्यांकडे केली असल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
—————
विधानसभेसाठी अत्तापासून तयारी
भाजपकडून लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी अत्तापासूनच तयारी करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी शहरातील काही नगरसेवकांना आसपासच्या विधानसभांची जबाबदारी देण्यात आली असून त्यांना अत्तापासूनच त्या मतदारसंघामध्ये जाऊन कार्यक्रम घेणे, पक्षसंघटनेची बांधनी करणे याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक शनिवार आणि रविवारी हे नगरसेवक त्या त्या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन पक्षाच्या उपक्रमांना हजेरी लावत आहेत.
———

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)