मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 30 हजार कि.मी.चे रस्ते बांधणार

संग्रहित छायाचित्र

मुख्यमंत्र्यांचे निर्देश 

मुंबई : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून राज्यात 30 हजार कि.मी.लांबीच्या रस्त्यांचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ते डिसेंबर 2019 पूर्वी पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. तसेच हायब्रिड ऍन्युईटी रस्त्यांच्या कामांसाठी तातडीने कार्यारंभ आदेश देऊन पावसाळ्यापूर्वी कामे सुरु करावीत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

हायब्रिड ऍन्युईटी रस्त्यांच्या कामांचा आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात घेतला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, या योजनेअंतर्गत 30 हजार कि.मी. लांबीच्या रस्त्यांने उद्दिष्ट असून 14 हजार 844 कि.मी. लांबीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापूर्वी 4452 कि.मी. लांबींच्या रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहेत. 6756 कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे काम पूढील महिन्यात सुरु होणार असून उर्वरित रस्त्यांच्या कामांना सप्टेंबर पर्यंत कार्यारंभ आदेश देऊन ऑक्‍टोबर पासून कामांना सुरुवात करावी. ग्रामीण महाराष्ट्रात विकासाला गती देण्यासाठी हे रस्ते महत्वाची भूमिका बजावणार असून डिसेंबर 2019 पूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

हायब्रिड ऍन्युईटी अंतर्गत 195 रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार असून नागपूर विभागात 33 कामांच्या माध्यमातून 1358 कि.मी.लांबीचे रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. अमरावती विभागात 32 कामांच्या माध्यमातून 1527 कि.मी.लांबीचे रस्त्यांचे काम केले जाणार आहे. औरंगाबाद विभागात 32 कामांच्या माध्यमातून 1920 कि.मी., नाशिक विभागात 31 कामांच्या माध्यमातून 1257 कि.मी, पुणे विभागात 25 कामांच्या माध्यमातून 1775 किं.मी., मुंबई विभागात 42 कामांच्या माध्यमातून 1402 कि.मी. असे एकूण 195 कामांच्या माध्यमातून 9238 कि.मी. लांबीचे रस्ते केले जाणार आहे. मार्च 2018 मध्ये नव्याने 21 कामांना मंजुरी देण्यात आली असून त्या माध्यमातून 1001 कि.मी. लांबीचे रस्ते तयार होणार आहेत. या कामांसाठी 44 निविदा मंजुर करण्यात आल्या असून त्याचे कार्यारंभ आदेश तातडीने द्यावेत व पावसाळ्यापूर्वी कामे सुरु करावीत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)