मुख्यमंत्रीसाहेब, सातारकरांचे काय ?

सातारा शहर परिसराच्या विकासाचा प्रश्‍न अनेक वर्षे अनुत्तरीत

सिटीझन वॉच/संजय कोल्हटकर,ज्येष्ठ पत्रकार

सातारा – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 23 डिसेंबर रोजी सहा महत्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्यासह सातारच्या सैनिक स्कूल मैदानावर करणार असल्याचे वृत्त झळकले आहे. या सहा प्रकल्पांसाठी एकूण 10 हजार कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. यामुळे कोणाही सातारकराला कितीही समाधान वाटले तरी प्रत्यक्षात कधीकाळी मराठी राज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा शहर आणि परिसराच्या विकासाचे काय? हा प्रश्‍न गेली अनेक वर्षे अनुत्तरीत या सदरात मांडला गेला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इतिहासात मराठी राज्याची राजधानी म्हणून कितीही उच्चरवात आम्ही गदारोळ करत असलो तरी प्रत्यक्षात हे शहर कधीकाळी या शहराची वर्षांपूर्वी जी ओसाड स्थिती होती त्या दिशेनेच वाटचाल करत आहे काय..असा प्रश्‍न आजचे सातारा शहर आणि परिसराचे वास्तव पाहिल्यावर कोणाच्याही समोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण जिल्हयात विकासाच्या आणि विविध योजनांच्या कितीही खैराती होत असल्या तरी प्रत्यक्ष सातारा शहर आणि औद्योगिक वसाहती यांच्या विकासाच्याबाबत मात्र कोणतीही सकारात्मक पावले गेल्या अनेक वर्षात उचलली गेली नाहीत हे कितीही नाकारले तरी वास्तव आहे.

कधीकाळी खेडमार्गे ठोसेघर, सज्जनगड, सातारामार्गे हमदाबादपर्यंत जाणाऱ्या रस्त्याची मोजणीही झाली होती. पण जाणीवपूर्वक हा रस्ता सातारमार्गे नेण्याऐवजी चिपळून कराडमार्गे नेण्याची मागील सरकारने बदलून तो रस्ता चिपळूण कराडमध्ये परावर्तीत केला. हा रस्ता सातारमार्गे आला असता तर कोकणची बाजारपेठ ही सातारामार्गे वितरीत झाली असती आणि याचा फायदा सातारचे व्यावसायिक आणि इच्छकु तरुणाईला निश्‍चितपणे झाला असता पण हे सारे प्रकरणच बासनात गुंडाळले गेले. कास तलावाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव 1990 सालीच मांडला गेला होता. पण पाणी वाया गेले तरी चालेल पण ते सातारा परिसराला सहजपणे मिळता कामा नये या मानसिकतेने पछाडलेल्या आमच्या नेतृत्वाने 2013 सालापर्यंत फक्त दुर्लक्षच केले आता या तलावाची उंची वाढविण्याचे काम सुरु झाले आहे ही त्यातल्या त्यात समाधानी गोष्ट असली तरी इतका उशिर का झाला हा प्रश्‍न निश्‍चितपणे नाकारता येणार नाही.

सातारा शहरातून कदमबागेतून जाणारा रेल्वेमार्ग हा जाणीवपूर्वक जरंडेश्‍वरमार्गे माहूलीकडे वळवला गेला आणि सातारच्या विकासाला जाणीवपूर्वक खिळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला हे कितीही नाकारले तरी वास्तव आहे. सातारच्या आय.टी.आय.च्या इमारतीत मंजूर झालेले इंजिनिअरिंग कॉलेज हे रातोरात कराडकडे रवाना झाले आणि या अतिशय सुसज्ज इमारतीत हिचे करायचे काय या कल्पनेतून आय.टी.आय.मध्ये रुपांतर झाले ही गोष्ट आपण अनुभवतो आहोत. तोच प्रकार एस.टी.बसस्थानकासमोर असलेल्या धंदेशिक्षण शाळेच्या बाबतीतही अवलंबला गेला. सातारची औद्योगिक वसाहतीला तर जवळपास ओसाड ही अवस्था प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र स्कूटरसारख्या बजाज ग्रुपचा नामांकित प्रकल्प निव्वळ सरकार आणि बजाज यांच्यामधील शेअरच्या टक्केवारीवरुन वाद निर्माण झाल्याने आज जवळपास बंद या स्थितीत गेला आहे.

औद्योगिक वसाहतीतील गुंडगिरी आणि तिची प्रत्ययास येणारी उदाहरणे यामुळे नव्या उद्योजकांनी सर्व सुविधा उपलब्ध असलेले शहर म्हणून ओळखल्या जणाऱ्या सातारा शहर आणि औद्योगिक वसाहतीवर कायमची फुली मारली ही बाब नाकारता येणार नाही. उदाहरणे द्यायची झाली तर फतेजा, ऍरिस्टोक्रॅट, महाराष्ट्र स्कूटर या आणि अशा अनेक कंपन्यांची देता येतील. याचबरोबर फलटण, बारामतीच्या प्रभावी नेतृत्वानेही सातारला येवू घातलेले मोठे व्यावसाय हे आपल्या भागात नेवून बसविले आणि सातारची अवस्था मात्र एक भकास आणि उपजिविकेचे कोणतेही साधन सहजपणे उपलब्ध होणार नाही असे ठिकाण म्हणून उपलब्ध केले. दहा हजार कोटी रुपयांचे प्रकल्प साताऱ्यात होत आहेत ही कितीही आनंदाची बाब असली तरी कधीकाळी मराठी साम्राज्याच्या राजधानीला परत एकदा पेन्शनर सिटीचे रुप येवू घातले आहे आणि हे बदलण्यासाठी कायदा व सुव्यवस्था यांचे हत्यार हातात घेवून या औद्योगिक वसाहत आणि शहराचा विकास करण्याची मानसिकताच आमच्या राज्यकर्त्यांत नाही. हा वर्षानुवर्षे असलेला अनुभव आजही तसाच आहे.

 वैद्यकिय महाविद्यालयाची घोषणा होवूनही काही वर्षे उलटून गेली असली तरी त्यासंदर्भात कोणतीही सकारात्मक पावले उचलले जात आहेत असे चित्र आजतरी दिसत नाही. हे असेच चालू राहिले तर कधीकाळी या शहराला आणि परिसराला ओसाड नगरीचे रुप प्राप्त होईल. इथली तरुणाई पोटापाण्यासाठी कुठेतरी वाटचाल करतील आणि मराठी राज्याची कधीकाळची राजधानी ही ओसाडनगरी म्हणून ओळखली जाईल हे सारे टाळायचे असेल तर आमच्या नेतृत्वाने दुजाभाव न दाखवता आमच्या नेतृत्वाने सातारा शहर आणि सर्वांगिण विकासासाठी जाणीवपूर्वक पावले उचलली पाहिजेत ही अपेक्षा फारशी चुकीची मानता येणार नाही. मा. मुख्यमंत्र्यांनी सातारा जिल्ह्यातील प्रकल्पांची उद्घाटने करताना साताऱ्यातही असे प्रकल्प आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत एवढीच इच्छा आणि विनंती आज सातारकर करु शकतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)