मुक्‍त”संचार’ला लगाम (अग्रलेख)

केंद्रातल्या आयटी मंत्रालयाची नुकतीच एक महत्त्वाची बैठक झाली. गुगल, फेसबुक, व्हॉटस अप, ट्‌विटर आदी समाज माध्यमे तसेच माहितीची ऑनलाईन सेवा देणाऱ्या माध्यमांच्या अधिकाऱ्यांचा या बैठकीत सहभाग होता. सध्या सोशल मीडियाचा जो जोरकसपणे दुरूपयोग केला जातोय, त्याला आळा घालण्यासाठी काय करता येईल, याबाबत यावेळी चर्चा झाली. सोशल मीडियावरून बेकायदेशीरपणे आणि बेलगामपणे सामग्री प्रसारीत केली जात आहे. त्याला कसे रोखता येईल, गेला बाजार त्याच्यावर काही अंशी नियंत्रण कसे ठेवता येईल, यादृष्टीने जगभरातील सरकारांना चिंताग्रस्त केले आहे. मात्र तोडगा काही अद्याप कोणाच्या हाती लागलेला नाही. त्यावर भारतात आता विचारमंथन सुरू झाले असून कायद्यात दुरुस्ती करण्यापर्यंतच्या निष्कर्षाप्रत आता सरकार आले आहे.

घटनेने प्रत्येक नागरिकाला आपले विचार मांडण्याचे वा ते व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. जेव्हा काही व्यक्त करायचे असते, तेव्हा त्याकरता एक माध्यम आवश्‍यक असते. त्या दृष्टीने पारंपरिक माध्यमे उपयुक्‍त आहेतच. मात्र गेला दीड-दोन दशकांचा काळ पाहता, माध्यम क्षेत्रात ज्याला चमत्कारच म्हणता येईल, अशी महाक्रांती झाली आहे. या क्रांतीने प्रत्येकाला घरबसल्या आपल्या विचारांची खिरापत वाटता येण्याची सोय करून दिली आहे. “सोशल मीडिया’ असे त्याला संबोधले जाते. हा सोशल मीडिया केवळ एकच वस्तू अथवा व्यक्ती नाही. त्याचे सहस्त्र बाहु आहेत. तो एकाच वेळी हजार ठिकाणी, हजार स्वरूपात कार्यरत असतो. बरे त्याला स्थानबध्दतेचा शापही नाही आणि सीमांचे बंधनही नाही. कोणी चांगले-वाईट असे वर्गीकरण करत चाळण लावावी अशी मर्यादा घालणारी यंत्रणाही नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रवास करताना महामार्गांवर एक बोर्ड हमखास दिसतो. त्यावर लिहीले असते की “मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक’. बेफाम वाहन दामटणाऱ्या वाहनचालकाला भानावर आणण्यासाठी ही एक ओळ उपयुक्त व पुरेशी असल्याचे बऱ्याचदा दिसून येते. याचा अर्थ कुठे आणि केव्हा व किती वेगाने जायचे व कधी थांबायचे हेच गणित आयुष्यात महत्वाचे असते. ते ज्याला जमते तो यशस्वी होतो. बहुतेकांची मनाचा ब्रेक न पाळल्यामुळे होरपळच होते. सोशल मीडियाला हा सिध्दांत मात्र अत्यंत तंतोतंत लागू होतो. या माध्यमाचा वापर करणारा प्रत्येक जण हा आपल्या मर्जीचा मालक असतो. त्याच्यावर कोणाचे बंधन नसते. त्याचे स्वत:चेही नाही.

इतकेच काय सेवा देणाऱ्या कंपन्या व सरकारचेही नसते. सेवा देणारे बहुतेक परदेशात दुकाने थाटून बसलेले. त्यामुळे कारवाईचीही बोंब. याचा व्हायचा तो अनर्थ गेल्या काही काळात घडू लागला आहे. माध्यमाचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी कमी आणि विकृतीसाठीच जास्त केला जातोय. जंगलातली आग सगळ्यांत वेगाने पसरते असे म्हणतात. त्या वेगाची बरोबरी आजपर्यंत कोणाला करता आली नाही. मात्र या वेगालाही समाजमाध्यमांवरून पसरणाऱ्या अफवांनी मात दिली जातेय. त्यातून गोहत्या झाल्याच्या संशयातून कुठे जमावाच्या मारहाणीत एखादा विशिष्ट समुदायाचा माणूस आपल्याला कशासाठी हा जमाव मारतो आहे, याची किंचितही कल्पना नसताना मारला जातो.

धुळ्यासारख्या फारशा प्रगत नसलेल्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुले पळवणाऱ्यांची टोळी आल्याची अफवा अचानक पसरते व जे त्या गावचेच नाही, अशा एका नव्हे, तर चार-पाच जणांची जमावाकडून निर्घृण हत्या केली जाते व त्यांचीच बिचाऱ्यांची मुले पोरकी होतात. ही या बेलगाम माध्यमाची अनियंत्रित शक्ती. या माध्यमाच्या शक्तीने सरकारेही कोसळू लागली आहेत व क्षणार्धात लाखो लोक बेधुंद होऊन रस्त्यावरही उतरू लागली आहेत. महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत याचाच वापर करून घोळ करण्यात आल्याच्या चर्चाही ताज्या आहेत. गेल्याच महिन्यात एका अशाच अफवेवरून एका पोलीस अधिकाऱ्याची उत्तर प्रदेशात हत्या झाली. रोज घडणाऱ्या या घटनांना कुठेतरी रोखणे आवश्‍यक असून त्याकरता जर सरकारने कायद्यात दुरुस्ती करण्याचा पुढाकार घेतला असेल तर त्याचे स्वागत करायला हवे. चेहरा नसलेली गर्दी या घटनांना कारणीभूत असली तरी तिला चिथावणारा विचार व त्यामागचे डोके या माध्यमात लपलेले असते व ते आपले विष ओकून कुठेतरी अलिप्तच राहते.

हे थोपवायचे असेल तर मानवतेच्या, जग जवळ आणण्याच्या गप्पा मारणाऱ्या सोशल माध्यमांचीही यात तितकीच महत्त्वाची भूमिका असायला हवी. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिक्षेप होता कामा नये, पण त्याचवेळी कोणाच्या कथित अभिव्यक्‍तीमुळे द्वेष, हिंसाचार, अराजक निर्माण होत असेल तर तेही अक्षम्य. याकरता या माध्यमांनाही स्वत:त बदल घडवून आणावा लागणार आहे. या टप्प्याला सरकारची त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे. आपल्या सेवेचा जर कोट्यवधी लोक वापर करत असतील तर आपण परदेशात बसून जबाबदारी झटकू शकत नाही, याची त्यांनी जाण ठेवावी. त्या दृष्टीने त्यांचे देशात कार्यालय हवेच व ही एक दुरुस्तीही त्यांना त्यांच्या जबाबदारीचे गांभीर्य जाणवून देण्यास मोलाची ठरेल. त्यामुळे द्वेषाचा “मुक्‍त प्रसार’ करणाऱ्या माध्यमांचा व त्यांच्या वापरकर्त्यांचा मुक्‍त “संचार’ थांबेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)