मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा घोळ सुरुच

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा घोळ सुरुच आहे. ऑनलाईन असेसमेंटच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले आहे. ऑगस्ट महिना उजाडला तरी निकाल न लागल्याने विद्यार्थी चिंतेत असताना, आता टीवायबीएससीच्या निकालाचा गोंधळ समोर आला आहे. निकाल लावण्यासाठी पेपर तपासणीचे काम जलद गतीने सुरु असल्याचं विद्यापीठाकडून सांगितलं जात आहे. मात्र विद्यापीठाने फक्त उत्तरपत्रिकांच्या पुरवणी तपासूनच विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मूळ उत्तरपत्रिका वगळून केवळ पुरवणी तपासून तेच गुण त्यांना दिल्याची तक्रार अनेक महाविद्यालयांनीच विद्यापीठाकडे केली आहे. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना केवळ 15 ते 20 गुण मिळाल्याने त्यांच्या नावापुढे नापास शेरा पडला आहे.
हुशार विद्यार्थ्यांना इतके कमी गुण कसे असा प्रश्न पडल्याने, निकाल त्यांना देण्याऐवजी महाविद्यालयांनीच विद्यापीठात धाव घेतली आहे. तर काही विद्यार्थ्यांच्या मुख्य उत्तरपत्रिकाच तपासल्याचे समोर आले.  दरम्यान, निकालाच्या 15 ऑगस्टच्या तिसऱ्या डेडलाईनला तीन दिवस शिल्लक असताना, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख यांना राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. विद्यापीठाचे सगळ्या विषयांचे निकाल मुदतीत जाहीर न केल्याने राज्यपालंनी त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)