मराठी संस्थाचालकांना संस्था सुरु करण्याचे आवाहन
पुणे – “मराठी संस्थाचालक मुंबईत येऊन संस्था का उभारत नाहीत? मुंबईमध्ये केवळ गुजराती, मारवाडी, सिंधी लोकांनीच संस्था बांधयच्या का? मराठी लोकांनी मुंबई ही परप्रांतीयांना आंदण दिली आहे का? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र मंडळातर्फे कै. रमेश दामले यांच्या स्मृतीनिमित्त दिला जाणारा “प्राईड ऑफ महाराष्ट्रीय मंडळ’ पुरस्कार यंदा ठाणे येथील पोलीस आयुक्त विवेक फळसणकर यांना ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी एअर मार्शल भूषण गोखले (नि.), माजी पोलीस आयुक्त श्रीकांत बापट, संस्थेचे सचिव धनंजय दामले उपस्थित होते. यावेळी “क्रीडा विज्ञान’ या विशेष पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.
ठाकरे म्हणाले, “इंच इंच विकू अशी स्थिती उद्भवलेल्या देशात आजही देशातील सर्वाधिक मोठी जागा असलेली आणि पिढ्यान पिढ्या शिक्षण क्षेत्राला वाहून घेणारी मराठी संस्था आणि तेही मराठी माणसाकडून चालविली जाणारी महाराष्ट्रीय मंडळसारखी संस्था आपल्याकडे आहे, ही अतिशय अभिमानाची बाब आहे. मात्र, मराठी संस्थाचालक मुंबईत येऊन आपल्या संस्था का उभ्या करत नाहीत? असा सवाल उपस्थित करतच त्यांनी मराठी भाषिक संस्थाचालकांना मुंबईत येऊन संस्था सुरू करण्याचे आवाहन केले.
सत्काराला उत्तर देताना फणसाळकर म्हणाले, “माझे शालेय शिक्षण याच शाळेत झाले आहे. “महाराष्ट्र मंडळ’ या संस्थेशी माझा लहानपणापासूनच स्नेहाचे बंधन आहे. एखाद्या खेळात यशस्वी झाल्यानंतर कौतुक करण्यासाठी हजारो लोक सरसावतात, मात्र मैदानात उतरण्यापूर्वी त्या खेळाडूच्या पाठीवर हात ठेवून लढण्यासाठी प्रवृत्त करणारी ही संस्था आहे. त्यामुळेच आज हा पुरस्कार स्वीकारताना माझ्या घरच्यांकडून कौतुक होत असल्याची भावना मला वाटत आहे.
पोलीस खात्यामुळेच आपण सुरक्षित
राज ठाकरे यांनी 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांना अभिवादन केले. त्यानंतर बोलतांना ते म्हणाले, परराज्यातून येणाऱ्या लोकांबाबत कोणतीच माहिती आपल्याकडे नसते. मात्र, असे असूनही राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम आहे. याचे श्रेय केवळ पोलीस खात्यालाच जाते. पोलीस खाते काम करते म्हणूनच आपण सुरक्षित जीवन जगत आहोत’ अशा शब्दांत ठाकरे यांनी राज्याच्या पोलीस दलाचे कौतुक केले. ते म्हणाले, “अनेकदा पोलिसांच्या कारवाईला सामोरे गेल्याने पोलिसांशी जवळचा संबंध आला. त्यातून पोलिसांचे काम किती महत्त्वाचे आहे हे कळाले. आपण पोलिसांवर ते पैसे खातात म्हणून आरोप करतो. त्यांची टिंगल उडवतो. मात्र आज ते आहेत म्हणूनच आपण सुरक्षित आहोत हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे.
पोलिसांच्या, कोर्टाच्या नोटिसा कळत नाही
माझ्या कामांमुळे मला नेहमीच पोलिसांकडून, कोर्टाकडून नोटिसा पाठविल्या जातात. परंतु, आजही मला त्या कळत नाहीत. आपली मराठी भाषा इतकी चांगली असताना, ही कोणती शासकीय भाषा कामकाजात वापरली जाते? हेच मला कळत नाही. या नोटिसांची भाषा इतकी किचकट असते की, मला सोडले आहे की नाही का अजून काही कारवाई केलीये हे समजून घेण्यासाठी मला वकिलाला बोलवावे लागते. शासकीय भाषेतील मराठी सर्वसामान्यांना वाचता येईल अशी असावी, असे ठाकरे यांनी सांगितले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा