मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचा झेंडा फडकला

कपिल पाटील यांची हॅट्रिक
कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेना-भाजपात चढाओढ

मुंबई – मुंबई, कोकण व नाशिक येथील शिक्षक व पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर पाठवून देण्यासाठी झालेल्या निवडणूकीत शिवसेनेने बाजी मारली. मुंबई पदवीधर मतदार संघात शिवसेनेने भगवा फडकवत भाजपला जोरदार धक्का दिला. शिवसेनेचे उमेदवार विलास पोतनीस यांनी सुमारे 19 हजार 354 मते मिळवीत भाजपला धुळ चारली. भाजपाचे उमेदवार ड. अमीतकुमार मेहता यांना 7 हजार 792 मते मिळाली. पोतनीस यांनी मेहता यांच्यापेक्षा दुप्पट मते घेत 11 हजार 562 मतांची आघाडी मिळवत विजय मिळवला. तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून लोकभारतीचे कपिल पाटील विजयी होत ‘हॅट्रीक’ साधली आहे. पाटील यांना 3751 मते मिळाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील चार जागांसाठी 25 जून रोजी झालेल्या मतदानात 52 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले होते. मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघातील मतमोजणीला नेरूळ येथील आग्रीकोळी भवन येथे आज सुरुवात झाली. तीन जागांपैकी मुंबई पदवीधर मतदारसंघाचा पहिला निकाल जाहिर करण्यात आला. यामध्ये विलास पोतनीस यांना विजयी घोषित करण्यात आले. पोतनीस यांनी 19 हजार 354 मते मिळवित भाजपाचा पराभव केला. भाजपाचे उमेदवार ड. अमीतकुमार मेहता यांना केवळ 7 हजार 792 मते मिळाली. या मतदारसंघात एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. पोतनीस यांना विजयी करताच आग्री कोळी भवन बाहेरील शिवसैनिकांनी एकच जल्लोष साजरा केला. गुलाल उधळत शिवसैनिकांनी ढोलताशाच्या ठेक्‍यावर ताल धरत शिवसेना झिंदाबादच्या घोषणा दिल्या.

मुंबई शिक्षक, नाशिक शिक्षक व कोकण पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. यामध्ये मुंबई शिक्षक मतदारसंघातील लोकभारतीचे उमेदवार कपिल पाटील यांचा विजय झाला. मतदार शिक्षकांनी पाटील यांच्यावर विश्वास कायम ठेवत त्यांना तिसऱ्यांदा विधानपरिषदेवर पाठवले आहे.पाटील यांनी 3751 मते मिळवत शिवसेना, भाजप उमेदवारांचा पराभव केला. शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांना 1538, भाजप पुरस्कृत अनिल देशमुख यांना 1082 मते मिळाली. तर कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेना उमेदवार संजय मोरे आणि भाजपचे निरंजन डावखरे या दोघांच्या मतमोजणीत चढाओढ होत आहे. कोकण पदवीधर व नाशिक शिक्षक मतदारसंघाची रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु होती. त्यामुळे मतांची आकडेवारी मिळू शकली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)