मुंबई-कोलकाता संघांना आज अखेरची संधी

आयपीएल-10 क्रिकेट स्पर्धा : क्‍वालिफायर-2 सामन्यात भवितव्य ठरणार
बंगळुरू, दि. 18 – साखळी फेरीतीच्या अखेरच्या टप्प्यात अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर एलिमिनेटर लढतीत नशिबाची साथ मिलालेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर आयपीएल-10 क्रिकेट स्पर्धेतील उद्या (शुक्रवार) होणाऱ्या क्‍वालिफायर-2 सामन्यात माजी विजेत्या मुंबई इंडियन्स संघाचे आव्हान आहे. साखळी फेरीतील विजय किंवा पराभवामुळे त्या क्षणी तरी कोणत्याच संघाला फारसा फरक पडत नव्हता. परंतु उद्याच्या सामन्यातील पराभूत संघाला घरी परतावे लागणार असून विजयी संघाला येत्या रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात धडक मारण्याची संधी मिळणार आहे. विजेतेपदासाठी त्यांच्यासमोर पुणे सुपरजायंट्‌स संघाचे आव्हान राहील. पुणे सुपरजायंट्‌स संघाने क्‍वालिफायर-1 सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभूत करून अंतिम फेरीतील स्थान याआधीच निश्‍चित केले आहे.
उद्याच्या सामन्यात कोलकाता संघाला केवळ याच मोसमातील नव्हे, तर आयपीएलच्या इतिहासातील एकूण आकडेवारीनुसार मुंबई इंडियन्स संघाविरुद्धच्या निराशाजनक कामगिरीतून पुनरागमन करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. आयपीएलच्या दहाव्या मोसमातील दोन्ही साखळी सामन्यांत मुंबईने कोलकाता संघाला पराभूत केले आहे. तर उभय संघांमधील एकूण आकडेवारीतही मुंबई संघ 15 विजय व केवळ 5 पराभव असे वर्चस्व राखून आहे. त्यामुळेच उद्याच्या लढतीतही मुंबईचेच पारडे जड आहे. कोलकाता संघाला साखळीतील अखेरच्या टप्प्यात पाचपैकी चार सामने गमवावे लागले होते. केवळ तळाच्या स्थानावरील बंगळुरूवरील एकमेव विजय त्यांच्यासाठी उत्तेजनार्थ ठरला. क्‍वालिफायर फेरीतील या दोन संघांची कामगिरी मात्र त्याच्या अगदी उलट आहे. क्‍वालिफायर-1 लढतीत मुंबई संघ पुण्याकडून पराभूत झाला, तर एलिमिनेटर लढतीत कोलकाताने हैदराबादवर मात करीत आगेकूच केली. आता पुन्हा एकदा पावसाचे सावट असलेल्या क्‍वालिफायर-2 लढतीत कोणता संघ बाजी मारणार ही क्रिकेटशौकिनांसाटी उत्सुकतेची बाब ठरेल.
मुंबई इंडियन्सचे पारडे जड
मुंबईच्या फलंदाजांची या मोसमातील कामगिरी कौतुकास्पदच झाली आहे. लेंडल सिमन्स आणि पार्थिव पटेल यांनी मुंबईला अनेकदा मजबूत पायाभरणी करून दिली आहे. तसेच कर्णधार रोहित शर्मा, अंबाती रायुडू आणि कायरॉन पोलार्ड यांनी आणीपाळीने चमकदार कामगिरी केली आहे. नितीश राणा आणि हार्दिक पांड्या यांनीही त्यांना सुरेख साथ दिली आहे. किंबहुना हार्दिक आणि कृणाल या पांड्या बंधूंनी संघाला जशी गरज लागेल, त्या अनुषंगाने कामगिरी बजावली आहे. साखळी फेरीतील 10 विजयांमुळे मुंबई संघ किती भरात आहे हे दिसून येते. पुण्याविरुद्धचे पराभव बाजूला ठेवून त्यांनी उद्याच्या निर्णायक सामन्यात सर्वस्व पणाला लावणे गरजेचे आहे. मुंबईचे आक्रमणही दर्जेदार आहे. डेथ ओव्हर्समध्ये जसप्रीत बुमराहने अफलातून कामगिरी बजावली असून मिशेल मॅकक्‍लेॅनघन व लसिथ मलिंगा यांच्या वेगवान माऱ्यावर त्यांची मदार आहे. टिम साऊदीचीही त्यांना साथ लाभू शकेल. कर्ण शर्मा व हरभजनसिंग यांच्यापैकी फिरकीची जबाबदारी कोणाकडे दिली जाते हे अखेरच्या क्षणी ठरेल. याआधीच्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर मुंबईने कोलकाताला एक गडी राखून पराभूत केले होते, तेव्हा 24 चेंडूंत 60 धावांची गरज असताना हार्दिक पांड्याने केवळ 11 चेंडूंत 29 धावा फटकावून मुंबईला विजयी केले होते. त्यानंतर ईडन गार्डनवरील सामन्यात मुंबईने 9 धावांनी निसटता विजय मिळविला होता. उद्याच्या सामन्यातही मुंबईला विजयासाठी सांघिक कामगिरीची गरज भासेल.
कोलकाताला गोलंदाजांकडून आशा
कोलकाताची फलंदाजी बेभरवशी असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळेच उद्याच्या लढतीत कोलकाताला गोलंदाजांकडून विजयी कामगिरीची आशा आहे. कालही एलिमिनेटर लढतीत कोलकाताच्या गोलंदाजांनी हैदराबादला केवळ 128 धावांत रोखून आपल्या संघाचे वर्चस्व प्रस्थापित करून दिले होते. ट्रेन्ट बोल्ट, नॅथन कूल्टर नाईल ख्रिस वोक्‍स (17 बळी)व उमेश यादव (16 बळी) या वेगवान गोलंदाजांना पियुष चावला व कुलदीप यादवच्या फिरकीची साथ लाभेल. मुंबईची या मोसमात किमान तीन वेळा सपशेल घसरगुंडी झाली आहे, हे लक्षात घेता मुंबईच्या फलंदाजीचे दडपण न बाळगता त्यांना किमान धावसंख्येत रोखल्यास कोलकाताची निम्मी कामगिरी फत्ते होणार आहे. फलंदाजांपैकी सुनील नारायणला सलामीला पाठविण्याचा जुगार कोलकाता संघ मुंबईविरुद्धही खेळणार का, याचे उत्तर उद्याच मिळणार आहे. ख्रिस लिनकडून गुजरातविरुद्धच्या झंझावाती खेळीची पुनरावृत्ती अपेक्षित आहे. लिनने गुजरातविरुद्ध 21 चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. युसूफ पठाण नेहमीसारखाच बेभरवशी असल्याने त्याची भरपाई कोलकाताच्या अन्य फलंदाजांना करावी लागेल. मनीष पांडेने 396 आणि रॉबिन उथप्पाने 387 धावा केल्या असून त्यांच्या कामगिरीवर उद्याच्या सामन्याचे भवितव्य ठरेल. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत 486 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गौतम गंभीरकडून कर्णधाराला साजेशा कामगिरीची अपेक्षा आहे. रोहित शर्मा आणि पोलार्ड यांना लवकर बाद करता आल्यास कोलकाताची कामगिरी सोपी होईल.
प्रतिस्पर्धी संघ –
मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, जोस बटलर, श्रेयस गोपाल, कृष्णाप्पा गौतम, असेला गुणरत्ने, हरभजनसिंग, मिशेल जॉन्सन, गुणवंत खेजरोलिया, सिद्धेश लाड, मिशेल मॅकक्‍लॅनेघन, लसिथ मलिंगा, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, पार्थिव पटेल, कायरॉन पोलार्ड, निकोलस पूरन, दीपक पूनिया, नितिश राणा, अंबाती रायुडू, जितेश शर्मा, कर्ण शर्मा, लेंडल सिमन्स, टिम साऊदी, जगदीशा सुचिथ, सौरभ तिवारी व विनय कुमार.
कोलकाता नाईट रायडर्स – गौतम गंभीर (कर्णधार), डॅरेन ब्राव्हो, ट्रेन्ट बोल्ट, पियुष चावला, नॅथन कूल्टर नाईल, कॉलिन ग्रॅंडहोम, ऋषी धवन, सायन घोष, शकिब अल हसन, शेल्डन जॅक्‍सन, इशांक जग्गी, कुलदीप यादव, ख्रिस वोक्‍स, ख्रिस लिन, सुनील नारायण, मनीष पांडे, युसुफ पठाण, अंकित राजपूत, सूर्यकुमार यादव, रॉबिन उथप्पा व उमेश यादव.
सामन्याचे ठिकाण – बंगळुरू. सामन्याची वेळ – रात्री 8 पासून.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)