मुंबईसारखे पुण्याचे झाले तर काय? नाले, गटारे यांच्या देखभाल दुरुस्तीचा आराखडाच महापालिकेत नाही

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 31 – काही वर्षांपूर्वी ढगफुटी होऊन पुणे शहर जलमय झाले होते. दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये अशीच परिस्थिती होती. तशी परिस्थिती पुन्हा उद्‌भवली तर उपाययोजना काय, याचे उत्तर महापालिकेला देता येणार नाही. कारण शहरातील पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी पावसाळी गटारे आणि नाल्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांचा नवा आराखडाच महापालिकेकडे तयार नाही. असा आराखडा तयार करण्याची महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केलेली घोषणा पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहे.
पावसाळी गटारांची, नाल्यांची स्थिती याविषयावर गंभीर आरोप झाल्यानंतर याविषयीचा आराखडा तयार करण्यात येईल, असे महापालिका आयुक्तांनी दोन वर्षांपूर्वी जाहीर केले होते. त्यानंतर दोन पावसाळे जाऊन यंदाच्या वर्षीचा पावसाळाही निम्मा संपत आला तरी या आराखड्याची एक रेघही मारली गेली नसल्याची वस्तुस्थिती आहे. जर काही वर्षांपूर्वी पुण्यात झालेल्या ढगफुटीसारखी किंवा दोन दिवसांपूर्वी मुंबईत झाली होती तशी परिस्थिती उद्‌भवली तर प्रशासनाची “फे फे’ उडणार ही बाब नक्की झाली आहे.
पावसाळीपूर्व कामे झाल्याचे उत्तर प्रशासनाकडून अगदी आत्मविश्वासाने दिले गेले, मात्र पहिल्या पावसातच हे उत्तर किती फोल होते आणि प्रशासनाने केलेल्या कामाचा फोलपणा उजेडात आला होता. कामे तर काही झालीच नव्हती, त्याचबरोबर रस्त्यावर जमा झालेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी गटारे नादुरुस्त असल्याचे दिसून आले आहे. पहिल्याच पावसात रस्त्यांवर साठलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक ठिकाणी रस्तेच नाल्याप्रमाणे तुडुंब भरून वाहात होते.
शहरात सुमारे 350 किलोमीटरचे नाले आणि 500 किलोमीटरची गटारे आहेत. यापैकी बहुतांश नैसर्गिक ओढे-नाल्यांवर अतिक्रमणे झाल्याने आणि फायद्यासाठी ओढे-नाल्यांचे मार्ग वळवल्याने त्याचे दुष्परिणाम तेथे राहणाऱ्यांना करावे लागत आहेत. याशिवाय गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, माती साठल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अटकाव होतो. परिणामी शहरातील अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी साचते. तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी जुनी यंत्रणा अपुरी आणि नादुरुस्त असल्यानेच नव्या यंत्रणेच्या उभारणीसाठीचा आराखडा तयार करणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दोन वर्षांपूर्वी मुख्यसभेत केली होती. मात्र, आहे तीच दरवर्षीची कामे करणे प्रशासनाला शक्‍य झाले नाही तर आराखडा तयार करण्याचे काम ते कधी करणार हा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पर्यायाने पुण्याची जर मुंबई झाली तर काय करायचे हा देखील प्रश्‍न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)