मुंबईत विमान कोसळून 5 ठार…

मुंबई – मुंबईच्या गजबजलेल्या घाटकोपरमध्ये छोटे मालवाहू विमान कोसळून झालेल्या अपघातामध्ये 5 जण ठार झाले. मृतांमध्ये विमानाचे दोन्ही पायलट आणि विमानाची देखभाल करणाऱ्या इंजिनिअरचा समावेश आहे. याशिवाय एका पादचारी व्यक्तीचाही या अपघातामध्ये मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. एक पायलट आणि एक फ्लाईट टेस्ट इंजिनिअरमात्र या विमानातून बाहेर पडण्यात यशस्वी झाल्याने बचावले.

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी विमान कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लिमिटेड कंपनीच्या सुखोई एसयु- 30 एम विमान कालच नाशिकजवळ कोसळले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

घाटकोपरच्या जागृतीनगरमध्ये दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कोसळलेले विमान पूर्वी उत्तर प्रदेश सरकारच्या मालकीचे होते आणि युवाय एव्हिएशन कंपनीला ते विकले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. “द किंग एअर सी90′ हे 12 सीटच्या विमानाने जुहू येथील धावपट्टीवरून चाचणीसाठी उड्डाण केले होते. या विमानाच्या कोसळण्यामागील कारणांची चौकशी करण्याच्या सूचना नागरी विमान वाहतुक मंत्री सुरेश प्रभू यांनी “डायरेक्‍टर जनरल सिव्हील एव्हिएशन’ला दिले आहेत. अपघातानंतर “डीजीसीए’च्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशीसाठी घटनास्थळाला भेट दिली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. “एअरक्राफ्ट ऍक्‍सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो’च्यावतीने या अपघाताची सविस्तर चौकशी केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

विमान अपघाताचे वृत्त समजताच अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी रवाना झाली. अपघातातील मृतांचे मृतदेह घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयामध्ये नेण्यात आले. विमान कोसळल्यामुळे लागलेली आग चार बंबांनी आटोक्‍यात आणली.

या विमान अपघाताबद्दल विमान वाहतुक मंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले आहे. विमान वाहतुक मंत्रालयातील अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन आवश्‍यक ते मदतकार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)