मुंबईत ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद 

विरोधकांचा बंद यशस्वी झाल्याचा दावा 
मुंबईत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले 
मुंबई  – पेट्रोल, डिझेल दरवाढीवरून भडकलेल्या महागाईच्या निषेधार्थ कॉंग्रेसने पुकारलेल्या देशव्यापी “भारत बंद’ला मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र, कॉंग्रेससह विरोधकांनी मुंबईसह महाराष्ट्र बंद यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात कॉंग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखून धरली.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी सभापती माणिकराव ठाकरे, आमदार नसीम खान आदी कार्यकर्त्यांनी अंधेरी स्थानकात रेल रोको करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांच्या धरपकडीमुळे कार्यकर्त्यांची पांगापांग झाली. विशेष म्हणजे या बंदमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंदमध्ये आक्रमक भूमिका घेत भाजप सरकारचा निषेध केला. कॉंग्रेसने पुकारलेल्या बंदमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसेसह 21 राजकीय पक्षांनी सहभाग घेतला होता. या बंदमधून शाळा, महाविद्यालये रुग्णसेवा, औषधांची दुकाने, दुधपुरवठा यांना वगळली होती. महागाईविरोधात विरोधकांचा बंद यशस्वी होईल असा दावा केला जात होता. मात्र तो फोल ठरला.

मुंबईतील शरद राव यांच्या रिक्षा युनियनने भारत बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे उपनगरात रिक्षा टॅंक्‍सी वाहतूक मुंबईत सुरळीत होती. तसेच बेस्ट आणि रेल्वे वाहतूक देखील सुरू होती. त्यामुळे चाकरमान्यांना कामावर जाता आले. दुकाने आणि हॉटेल तसेच व्यावसाईक प्रतिष्ठाने दुपारपर्यंत बंद असल्याने संमिश्र बंदचा परिणाम जाणवत होता. सकाळी 9.30 च्या सुमारास कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी सभापती माणिकराव ठाकरे, मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्वाखाली अंधेरी रेल्वे स्थानकात कार्यकर्त्यांनी रेल रोको करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व नेतेमंडळी रेल्वे ट्रॅकवर उतरली होती. परंतु, अगोदरच फिल्डिंग लावलेल्या पोलीसांनी या सर्वांची धरपकड करून त्यांना पोलीस ठाण्यात आणले.

बोरिवली, गोरेगाव, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, नवी मुंबई आदी भागात मनसेचा आंदोलनात अग्रभाग होता. डोंबिवलीत मनसे कार्यकर्त्यांनी बैलगाडीवरून मोर्चा करीत आंदोलन छेडले. ठिकठिकाणी रस्त्यांवर गाड्यांचे टायर जाळण्याचे तसेच दगडफेकीचे प्रकार घडले. दरम्यान सिध्दीविनायक मंदीराबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड करताना झटापटी झाली.

दरम्यान, भारत बंदच्या पाश्वभूमीवर आज एसटी बसेसचे होणारे नुकसान लक्षात घेता सकाळी 7 ते दुपारी 3 यावेळेत बहुतांश ठिकाणी बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. पण दुपारी तीननंतर राज्यभर बस सेवा सुरळीत करण्यात आली. त्यामुळे गणेशोत्सावासाठी कोकणात सोडण्यात जाणा-या ज्यादा गाड्या दुपारी तीननंतर सोडण्यात आल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)