कल्याण : मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीच्या रस्त्यांवर पडणारे खड्डे नवीन नाहीत. मात्र पावसात हे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. आज कल्याणमधील आणखी एकाचा खड्याने बळी घेतला आहे. गेल्या काही दिवसांतील हा पाचवा बळी आहे.
कल्याण पश्चिमेकडील गांधारी पुल परिसरातील खड्डेमय रस्त्यांनी कल्पेश जाधव या तरुणाचा मृत्यू झाला आहे. गेल्या 13 दिवसांतील खड्यांमुळे हा पाचवा मृत्यू झाला आहे. पहाटे सव्वाचारच्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून घटनेनंतर पसार झालेल्या कंटेनरचालकाचा शोध सुरु असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम यांनी दिली.
कल्पेश हा पहाटे आपल्या दुचाकीवरुन जात असताना खड्यांमुळे त्याची गाडी स्लीप झाली आणि तो खाली कोसळला. यावेळी मागून भरधाव वेगात आलेला कंटेनर त्याच्यावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. भिवंडी तालुक्यातील नांदकर येथील रहिवासी असलेला कल्पेश याचा मटेरियल सप्लायरचा व्यवसाय होता.
कल्याण नजीकच्या द्वारली परिसरात खड्डयामुळे अण्णा नामक पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना काल गुरुवारी घडली होती. तर याआधी शिवाजी चौकात रस्त्याच्या असमतोलपणामुळे आरोह आतराळे आणि मनीषा भोईर या दोघांचा बळी गेल्याची घटना अनुक्रमे २ जून आणि ७ जुलैला घडली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा