मुंबईतील व्यापाऱ्याचे लोणावळ्यातून अपहरण

  • तपास युद्धपातळीवर : तीन-चार अनोळखी व्यक्‍तींनी पळविल्याची माहिती

लोणावळा  – जमिनीचे खरेदीखत करण्यासाठी लोणावळ्यात आलेला मुंबई येथील व्यापारी दिनेशकुमार रामेश्‍वर शर्मा (वय 55) यांचे त्यांच्या मित्राच्या बंगल्याच्या समोरून अपहरण करण्यात आल्याची घटना घडली. यासंदर्भात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी रामगुलाम छत्री शर्मा (वय 62, रा. मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेशकुमार शर्मा हा फिर्यादी रामगुलाम शर्मा यांचा मित्र आहेत. ते दोघे मावळ तालुक्‍यातील मळवंडी ठुले या ठिकाणी खरेदी केलेल्या जागेचे खरेदीखत करण्यासाठी शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास लोणावळ्यात आले होते. रामगुलाम शर्मा यांच्या लोणावळ्यातील “शकुंतला’ या बंगल्यावर आल्यावर हे दोघेही त्यांचे मित्र रवी पोटफोडे यांना भेटण्यासाठी त्यांच्या हॉटेलवर गेले. त्याठिकाणी चहापान झाल्यावर दिनेशकुमार शर्मा हे त्यांना भेटण्यासाठी एक मित्र येणार असल्याचे सांगून रामगुलाम शर्मा यांची होंडा सिटी मोटार घेऊन पुन्हा शकुंतला बंगल्याकडे गेले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रामगुलाम शर्मा हेही आपल्या बंगल्याकडे परतले असता त्यांना बंगल्याच्या गेटवर त्यांची मोटार आणि मोटारीमध्ये दिनेशकुमार शर्मा यांचा मोबाईल मिळाला, पण दिनेशकुमार शर्मा कोठेही दिसून आले नाही.

त्यानंतर आजूबाजूला तसेच बंगल्यात शोध घेतल्यावरही दिनेशकुमार मिळून न आल्याने रामगुलाम शर्मा यांनी तेथून जवळच असलेल्या चौकातील रिक्षा चालकांकडे चौकशी केली असता 3 ते 4 अनोळखी व्यक्तींनी एका गोल्डन रंगाच्या होंडा सिटी गाडीतून दिनेशकुमार शर्मा यांना जबरदस्ती पळवून नेल्याचे त्या रिक्षावाल्यांनी सांगितले. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोलीस उपनिरीक्षक शिवाजी दरेकर तपास करीत आहेत.

मुंबईतील व्यापारी शर्मा यांच्या अपहरणाच्या गुन्ह्यानंतर पोलीस तपास युद्धपातळीवर सुरू आहे. पुणे-मुंबई महामार्ग आणि एक्‍सप्रेस वेवरील टोलनाक्‍यांचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले जात आहेत. अन्य तांत्रिकबाबी पडताळून पाहून लवकरच अपहरणकर्त्यांचा माग घेतला जाईल.
– शिवाजी दरेकर, पोलीस उपनिरीक्षक, लोणावळा शहर पोलीस ठाणे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)