मुंबईच्या झोपडपट्टीतील ‘चल रंगदे’

    प्रेरणा 

दत्तात्रय आंबुलकर 

-Ads-

मुंबईतील झोपड्या व झोपडपट्टी अर्थात वस्ती म्हणजे अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य, चिंचोळ्या गल्ल्या व उघड्यावरील गटारे आणि कचराकुंड्या हे ठरलेले समीकरण. मात्र, या समीकरणावर मात करत संपूर्ण झोपडपट्टीमध्ये आमूलाग्र व सकारात्मक बदल घडविण्याचे महनीय व महत्त्वपूर्ण काम मुंबईच्या घाटकोपर या उपनगरातील असल्फा व्हिलेज या झोपडपट्टीत घडून आले आहे.

झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छतेसोबतच परिसर निरोगी व आकर्षक ठेवण्याच्या उपक्रमाची सुरुवात डिसेंबर 2017 मध्ये झाली. या कामी पुढाकार घेतला तो ऑनलाईन मार्केटिंगचे काम करणाऱ्या दैदिप्य रेड्डी या उद्योजक महिलेने. आपल्या व्यावसायिक संपर्कातून रेड्डी यांनी उत्स्फूर्तपणे व स्वयंसेवी काम करणाऱ्या 15 कलाकार व 750 स्वयंसेवकांची मदत घेतली.
सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावर स्वेच्छेने मिळालेल्या या प्रतिसादाद्वारे दैदिप्य रेड्डी यांनी रंगातून झोपडपट्ट्यांमधील वातावरण व लोक-जीवन बदलविण्याचा विडा उचलला.

त्यांची मूलभूत धारणा म्हणजे रंगामुळे व्यक्‍तीच्या जीवनात सकारात्मक बदल होत असल्याने सामूहिकरीत्या व व्यापक स्तरावर रंगांची रंगसंगती साधण्यास लोकजीवनात व सामाजिक संदर्भात बदल निश्‍चितपणे घडून येतील. आपल्या याच सामाजिक जाणिवेपोटी त्यांनी “चल रंग दे’ या उपक्रमाची सुरुवात खास निवडलेल्या असल्फा व्हिलेज या झोपडपट्टीपासून केली.

याकामी “फूट बाऊल डिजिटल’ या कंपनीच्या माध्यमातून दैदिप्य रेड्डी यांनी मुंबईच्या स्नोकेम पेंटस अँड कंपनी या कंपनीचे सहकार्य घेऊन “रंग दे’ द्वारा रंगकामास सुरुवात केली. याकामी कलाकारांचे सहकार्य घेऊन त्यांना झोपडपट्ट्यांमध्ये नेऊन त्यांच्याकरवी झोपडपट्ट्यांमध्ये रंगकाम करून घेणे हे आव्हानपर काम दैदिप्य रेड्डी यांनी मोठ्या कुशलतेने केले.

“चल रंग दे’च्या पहिल्या टप्प्यात 2 ते 4 डिसेंबरच्या दरम्यान असल्फा व्हिलेज झोपडपट्टीची रंगरंगोटी करून परिसराला आकर्षक बनविण्यासाठी सुमारे 1000 जणांनी नोंदणी केली. यापैकी 400 जणांचा समावेश सुरुवातीला करण्यात आला. संस्थेतर्फे त्यांना आकर्षक रंग व कलाकृती झोपड्यांच्या भिंतीवर चितारण्यासाठी रंग, ब्रश, बादल्या इ. साहित्य देण्यात आले. स्थानिकांना या साऱ्या उपक्रमाबद्दल संशयपूर्ण उत्सुकता होती. त्यांच्याशी संवाद साधून या उपक्रमाची पार्श्‍वभूमी व संभावित फायदे वेळोवेळी समजावून सांगितल्याने त्यांचा सहभाग या कामी मिळाला व दैदिप्य रेड्डी व त्यांच्या सहकाऱ्यांना चांगला प्रतिसाद सुरुवातीपासूनच मिळू लागला.

प्रयत्नाच्या सुरुवातीलाच दोन दिवसात झोपडपट्टीतील 200 झोपड्यांना आकर्षक चित्रांसह रंग देऊन या झोपड्यांचा चेहरामोहराच बदलला गेला. परिसराचे हे पुरतेपणी बदललेले रूप पाहून स्थिनिक रहिवाशांच्या जोडीलाच “चल रंग दे’ मध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवक-कार्यकर्त्यांना मोठे समाधान लाभले व या प्रयत्नांना स्वाभाविकपणेच वेग आला.
दि. 16 व 17 डिसेंबरला “चल रंग दे’ मध्ये 15 कलाकार आवर्जून सहभागी झाले. त्यांनी मुंबापुरीचा इतिहास-संस्कृती व जनजीवनाशी संबंधित प्रेरक प्रसंग चितारले.

त्यामुळे त्या झोपडपट्टीला रंगीत व जिवंत स्वरूप प्राप्त झाले. मुख्य म्हणजे असल्फा व्हिलेजमधील स्थानिक युवा-नागरिक व कलाकारांना पण आपली कला आणि कल्पना चितारण्याची, साकारण्याची संधी लाभली व त्यांच्या प्रयत्नांना वेगळे व आकर्षक स्वरूप प्राप्त होण्याचा इतिहास अल्पावधीतच साकारला गेला. असल्फा व्हिलेज झोपडपट्टीला रंगीन स्वरूप देण्याच्या प्रयत्नांना पहिल्या टप्प्यातच लाभलेल्या यशामुळे दैदिप्य रेड्डी व त्यांच्या “चल रंग दे’ संस्थेने मुंबईच्या इतर झोपडपट्ट्यांमधील झोपड्यांना पण रंगात रंगविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)