मुंबईकडे जाणारे सर्व मार्ग ‘होल्ड’वर

मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे, एस.टी.च्या फेऱ्याही रद्द ; हवाई वाहतुकही बंद

* नाशिक, गोवा मार्गे मुंबईत येणारी वाहतुकही थांबवली
* प्रवाशांना महामार्ग सुरू होण्याची पहावी लागणार वाट

पुणे – मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा फटका वाहतूक व्यवस्थेलाही बसला असून सातारा, पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक होल्डवर ठेवण्यात आली आहे. सायंकाळी उर्से, कुसगाव आणि खालापूर येथे पोलीस बंदोबस्त लावून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांकडून विनंती करून पुन्हा माघारी जाण्यास सांगण्यात येत आहे. तसेच
वाहनचालकांनी सहकार्य करावे असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मागील पाच दिवसांपासून मुंबई, कोकण-गोवासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस पडत आहे. दरम्यान आज दिवसभर पावसाचा जोर असल्यामुळे शाळा, महाविद्यालय यांना सुट्टी देण्यात आली. तर बहुतांश कार्यालयांना दुपारीच सुट्टी देण्यात आली. गुडघाभर साचलेले पाणी, रेल्वे वाहतुक बंद, वाहतुक कोंडी यामुळे इच्छितस्थळी जायचे कसे असा प्रश्‍न नागरिकांसमोर पडला आहे. त्यातच अन्य शहरातून मुंबईत आलेली अनेक वाहने या पावसात अडकली आहेत.
दरम्यान, मुंबई शहरातील परिस्थिती पाहता सातारा, पुण्याकडून येणाऱ्या वाहनांमुळे कोंडीत आणखी भर पडू नये यासाठी सर्व वाहने थांबवण्यात यावे असा सूचना मुंबई प्रशासनाकडून महामार्ग पोलिसांना देण्यात आल्या. त्यानुसार सायंकाळी मुंबईच्या दिशेने जाणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. सायंकाळी सहानंतर उर्से, कुसगाव आणि खालापूर टोल नाक्‍यावर महामार्ग पोलिसांकडून बंदोबस्त लावून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना परत माघारी जाण्याबाबत पोलिसांकडून आवाहन केले जात आहे. यावेळी काही वाहनचालकांनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला मात्र तेथील परिस्थितीची माहिती दिल्यावर प्रवाशांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला.

मावळ तालुक्‍यातील वलवान, वडिवले ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्याची वेळ आल्यास जून्या मुंबई-पुणे मार्गावर इंद्रायणी चे पानी येउ शकते. तसेच मुंबईत मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने दर्शवली आहे. यामुळे मुंबई कडे जाणारी वाहतूक थांबविण्याच्या सूचना प्राप्त झाल्या असल्याने नागरिकांनी मुंबईकडे जाणे टाळावे, असे आवाहन पुणे जिल्हा प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, मुंबईकडे जाणाऱ्या सर्व विमानांची उड्डाणे अनिश्‍चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे. पुढील सूचना मिळाल्यानंतर सेवा पुर्ववत होईल असे विमान प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.

मुंबई प्रशासनाकडून आलेल्या सुचनानुसार पुणे, साताऱ्याकडून मुंबईला जाणाऱ्या वाहनांना उर्से, कुसगाव आणि खालापूर टोल नाक्‍यावर थांबवण्यात येत आहे. नवीन आणि जुना हे दोन्ही महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. त्यामुळे ज्या प्रवाशांनी मुंबईकडे जाण्याचे नियोजन केले आहे त्यांनी ते रद्द करावे. मुंबई प्रशासनाकडून पुढील सुचना आल्यानंतर महामार्गावरील वाहतुक सुरू करण्यात येईल.अमोल तांबेपोलीस अधिक्षक, पुणे महामार्ग पोलीस

पुण्याकडून मुंबईला जाणाऱ्या रेल्वे रद्द
मुंबईत सुरू असलेला धुव्वाधार पाऊस आणि आसनगाव येथे पहाटे दुरांतो एक्‍प्रेसचे काही डबे घसल्यामुळे रेल्वे सेवेचा बोजवारा उडाला आहे. पावसामुळे पुण्यातून मुंबई आणि अन्य मार्गावरील रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. मुंबईतून सोडण्यात येणाऱ्या तब्बल 12 गाड्या मंगळवारी रद्द करण्यात आल्या. सिंहगड एक्‍सप्रेस (11009), डेक्कन क्वीन (12123), प्रगती एक्‍स्प्रेस (12125) या गाड्या रद्द करण्यात आल्या. तर बुधवारी मुंबईवरून सोडण्यात येणाऱ्या डेक्कन क्वीन (11007), इंद्रायनी एस्क्‍प्रेस (22105), इंटरसीट एस्क्‍प्रेस (12127), तपोवन एस्क्‍प्रेस (17617), महालक्ष्मी एस्क्‍प्रेस (17411) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पुणे दरम्यान धावण्याऱ्या महालक्ष्मी एस्क्‍प्रेस, सिंहगड एस्क्‍प्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एस्क्‍प्रेस या दोन्ही बाजूच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. हावरा गितांजली एस्क्‍प्रेस, नांदेड तपोवन एस्क्‍प्रेस, भागलपूर एस्क्‍प्रेस, लखनौव पुष्पक एस्क्‍प्रेस, गोरखपूर एस्क्‍प्रेस, दरबंगा एस्क्‍प्रेस, टाटानगर अंतोदय एस्क्‍प्रेस या गाड्यांचा मार्ग बदलून त्या कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि मनमाड मार्गे सोडण्यात आल्या. तर भूसावळ पुणे गाडी दौंडपर्यंतच चालविण्यात आली. तसेच अलहाबाद तुलसी एस्क्‍प्रेस टिटवाळावरून पुण्यामार्गे सोडण्यात आली. फिरोजपूर पंजाब मेल देखील इगतपुरीच्या ऐवजी मनमाड-दौंड-पुणे-कर्जत-कल्याण मार्गे सोडण्यात आली.

नियोजीत एस.टी.च्या फेऱ्याही रद्द
सायंकाळनंतर स्वारगेट, पुणे स्टेशन, पिंपरी-चिंचवड या एस.टी. स्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. सध्या गौरी-गणपतीचे दिवस असल्यामुळे एस.टी., खाजगी बस, रेल्वे यांना प्रवाशांची गर्दी आहे. अशा परिस्थितीत मुंबईकडे जाणारी वाहतुक बंद झाल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. वाहतुक
कधी सुरू होईल याची खात्रीशीर माहिती उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना पुण्यातच मुक्काम करावा लागला. दरम्यान, खाजगी ट्रव्हल्स आणि पुणे-मुंबई चालणाऱ्या टुरीस्ट गाड्याही आज सोडण्यात आल्या नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)