मुंद्रुळकोळेसह चार गावांचा पाण्याचा प्रलंबित प्रश्‍न मार्गी

शेतकऱ्यांमधून समाधान ; आ. शंभूराज देसाई यांचे मानले आभार

सणबूर –
मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द, जानुगडेवाडी, शितपवाडी या चार गावांचा अनेक वर्षे भिजत पडलेला शेतीच्या पाण्याचा प्रश्न अखेर आ. शंभूराज देसाई यांच्यामुळे मार्गी लागला. त्यांच्या सूचनेमुळे महिंद धरणातून तातडीने पाणी सोडण्यात आले असून पाण्याने भरलेले नदीपात्र पाहून शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, अनेक वर्षांचा पाण्याचा प्रलंबित प्रश्न सुटल्याचे शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी आमदार शंभूराज देसाई यांचे आभार मानले.
पाटण तालुक्‍यातील मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द, जानुगडेवाडी, शितपवाडी ही चार गावे गेल्या अनेक वर्षापासून मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात होती. त्यामुळे त्यांना शेतीसाठी महिंद धरणातून पाणी मिळत नव्हते.

महिंद धरणातून सोडलेले पाणी बनपुरी गावापर्यंत पोहोचताच बंद केले जात होते. यामुळे अनेकदा हाता-तोंडाशी आलेली पिके वाया जात होती. याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा निवेदने देवून, छोटी-मोठी आंदोलने करुनही याला यश मिळत नव्हते. मुळात या चार गावांचा समावेश तत्कालीन अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे मराठवाडी धरण लाभक्षेत्रात केल्याने त्यांना तांत्रिकदृष्ट्या महिंद धरणातून पाणी देणे नियमबाह्य झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अखेर या चार गावाच्या ग्रामस्थांनी एकत्र येत आ. शंभूराज देसाई यांनाच साकडे घातले. आमदार देसाई यांनी झालेली चूक जलसंपदा मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत या चार गावांचा ड्रोन कॅमेऱ्याचे सहाय्याने सर्वे करण्याचा आग्रह धरला. त्याप्रमाणे जलसंपदा विभागाने ड्रोन सर्वे करुन अहवाल शासनाला सादर केला. यामध्ये सदर चार गावांचा मराठवाडी धरण लाभक्षेत्रात समावेश असला तरी या गावांना कॅनॉलने पाणी देणे शक्‍य नाही. या गावांचा मराठवाडी धरण लाभ क्षेत्रातील समावेश चुकीचा असल्याने व आमदार देसाई यांच्या रेट्यामुळे तातडीने बदल करुन या गावांचा समावेश महिंद धरण लाभक्षेत्रात करण्याचा आदेश निघाला. परंतु याची अंमलबजावणी होत नव्हती.

ही बाब जानुगडेवाडी येथील कार्यक्रमात शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून देताच क्षणाचाही विलंब न करता संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना साहेबांनी सूचना देऊन तातडीने महिंद धरणातून पाणी सोडण्यास सांगितले. याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात आली. पाण्याने भरलेले नदीपात्र पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाण्याने भरुन आले. अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न सुटल्याचे समाधान चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होते. आमदार शंभूराज देसाई यांच्यामुळे आज हा अनेक वर्ष भिजत पडलेला पाणी प्रश्न मिटल्याचे शेतकरी सांगत आहेत. या पाण्यामुळे या चारही गावातील शेतजमीनी हिरव्यागार दिसण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)