मी मनोहर कुलकर्णी नाही, तर संभाजी भिडेच

न्यायालयात संभाजी भिडे यांनी वकिलामार्फत केले म्हणणे सादर 

पुणे – कोरेगाव-भीमा दंगल झाल्याप्रकरणी सांगली येथील शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्याविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर न्यायालयात आरोप-प्रत्यारोप झाले होते. याप्रकरणी म्हणणे दाखल करताना “माझे नाव मनोहर विनायक कुलकर्णी नसून माझे नाव संभाजी भिडेच आहे,’ असे म्हणणे त्यांच्या वकिलांनी बुधवारी न्यायालयात मांडले. दरम्यान, त्यांच्या वकिलांना याप्रकरणी म्हणणे मांडण्यासाठी सर्व कागदपत्रे पुरविण्याचे आदेश विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी दिले आहेत.

या घटनेत संजय भालेराव यांची इनोव्हा कार जळाल्याने त्यांनीही न्यायालयात धाव घेत “भिडे यांची ब्रेनमॅपिंग, पॉलिग्राफ चाचणी करण्यात यावी’ अशी मागणी वकिलांमार्फत केली होती. याप्रकरणी भिडे यांची बाजू मांडण्यात यावी, अशी सूचना न्यायालयाने केली. त्यानंतर त्याना मनोहर विनायक कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे या नावाने नोटीसही न्यायालयाने काढली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर बुधवारी प्रथमच संभाजी भिडे यांच्या वतीने वतीने ऍड. पुष्कर दुर्गे न्यायालयात हजर झाले. त्यांनी पहिल्याच मुद्याचे खंडन करताना “माझे नाव मनोहर विनायक कुलकर्णी नसून संभाजी भिडेच आहे’ असल्याचे न्यायालयात सांगितले.

ऍड. दुर्गे यांनी तक्रारदार संजय भालेराव यांनी भिडे यांच्याविरोधात तक्रार दाखल करताना मनोहर विनायक कुलकर्णी (वय-59) असे सांगितले आहे. मात्र, हे नाव चुकीचे असून संभाजी भिडे (वय-81) असे असून ते दुरुस्त करण्यात यावे, असे सूचविले आहे. तसेच तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केल्यानुसार माझ्या विरोधातील व्हिडिओ फुटेज, व्हॉटस्‌ ऍप चॅटिंग, कोरेगाव-भीमा संर्दभातील पत्रके, फोटो, तक्रार यांची प्रत देण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. त्यानुसार न्यायालयाने सदर मागणी मान्य करत तक्रारदार यांनी त्यांचेकडील माहिती भिडे यांच्या वकिलांना द्यावी, असा आदेश दिला आहे. याप्रकरणी अनिता सावळे यांनी तक्रार दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)