मी पणा नष्ट करणारा द्वितीयावतार एकदंत

– प्रा. दीपक कांबळे

भगवान श्री गणेशचा दुसरा अवतार एकदंत यांच्यासंबंधात एक श्‍लोक खालीलप्रमाणे आढळतो :
एकदन्तावतारौ वै देहिनां ब्रह्मधारकः।
मदासुरस्य हन्ता स आखुवाहनगः स्मृतः ।।
(श्री गणेशाचा एकदंत अवतार ब्रह्माचा धारक आहे. हा मूषकवाहन असून मदासुराचा (मद/मी-पण) वध करणारा आहे.)

श्री एकदंत : अवतार कथा 1

कार्तवीर्याचा वध करून कृतार्थ झालेला परशुराम कैलासावर आला. तिथे त्याची सर्व गणांशी आणि गणाधीश गणपतीचीही भेट झाली. शंकरांच्या दर्शनाची इच्छा परशुरामाच्या मनात होती. परंतु शिव-पार्वतीची ती विश्रांतीची वेळ होती.
परशुराम गणेशाला म्हणाला, “अरे, मी परमेश्‍वराला नमस्कार करण्यासाठी अंतःपुरात जातो आहे. प्रणाम करून मी ताबडतोब परत येईन. ज्याच्या कृपेने मी कार्तवीर्य मारला, एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली, त्या जगदगुरूला शक्‍य तितक्‍या लवकर मला भेटलेच पाहिजे.” हे ऐकताच गणेशाने सांगितले, “अरे, तू थोडा वेळ थांब.” परंतु गणेशाचे बोलणे न मानता हातातील परशू सरसावून परशुराम निर्भयतेने आत जाण्यास निघाला, तेव्हा गणेशाने उठून त्याला अडविले. प्रेमाने, नम्रतेने बाजूस सारले. तेव्हा रागाने त्याला मारण्यासाठी परशुरामाने परशू उचलला. त्या धकाधकीत गणेश खाली पडला, पण तरीही स्वतःला सावरून धर्माला साक्ष ठेवून त्याने पुन्हा परशुरामाला आत न जाण्याबद्दल बजावले. तरीही परशुराम ऐकेना. तेव्हा मात्र स्वतःची सोंड कोटी योजने वाढवून त्यात त्याला गुरफटवून सारे सप्त लोक हिंडवून आणले. त्या भ्रमणाने शुद्ध गेलेला परशुराम जेव्हा सावध झाला. तेव्हा गुरू दत्ताने दिलेले स्तोत्रकवच म्हणून त्याने गणेशावर स्वतःचा परशू टाकला. तो व्यर्थ करण्यासाठी स्वतःचा डावा दात गणेशाने पुढे केला. परशूचा वार फुकट गेला, पण तो गणेशाचा दात मात्र तुटून पडला.

सगळीकडे एकाच गोंधळ उडाला. सर्वजण जमा झाले. त्या गडबडीने शंकर-पार्वतीही बाहेर आले. सर्व समजल्यावर पार्वती परशुरामाला म्हणाली, “अरे, राम, तू ब्राह्मणवंशात जन्मलास आणि पंडितही आहेस. जमदग्नीचा पुत्र असून योगिराजांचा तू शिष्य आहेस. तुझी आई, मामा, आजोबा सारेच मोठे, मग तू कोणत्या दोषाने असा वागलास? अमोघ असा परशू घेऊन कोणीही सिंहाला मारू शकेल, तसा तू परशू या गणेशावर चालविलास. तू यासारख्या कोटी कोटी रामांना मारण्यास हा गणेश समर्थ आहे. अरे, हा गणेश कृष्णांश आहे. मोठ्या व्रताच्या प्रभावाने हा झाला आहे.

श्रीविष्णू म्हणाले, “हे देवी पार्वती, माझे थोडे ऐक. तुला हा गजानन आणि कार्तिकेय जसा, तसाच हा परशुराम आहे. यांच्यावरील स्नेहात आणि प्रेमात काहीच भेद नाही. आजपासून तू या मुलाचे नाव एकदंतही पडले आहे.” त्याची एकूण आठ नावे आहेत- गणेश, एकदंत, हेरंब, विघ्ननायक, लंबोदर, शूर्पकर्ण, गजवक्‍त्र, गुहाग्रज ही ती नावे होत.” असे सांगून श्रीविष्णूंनी गणेशस्तोत्र कथन केले व म्हटले, “हे दुर्गे, या परशुरामावर रागावू नकोस. त्या गणेशाचे एकदंत हे एक नाव या घटनेनेच प्राप्त झाले आहे. त्या घटनेमधील पुत्रवत असलेल्या परशुरामाला अभय दे.” तेव्हापासून श्रीगणेश एकदंत झाला.

श्री एकदंत : अवतार कथा 2

श्री गणेशाचा दुसरा अवतार एकदंत आहे. मदासुर नावाचा एक शक्‍तिशाली आणि पराक्रमी दैत्य होता. तो च्यवन ऋषीचा पुत्र होता. तो एकदा आपल्या पित्याची आज्ञा घेऊन दैत्यगुरू शुक्राचार्य यांच्याजवळ गेला आणि सम्त ब्रह्मांडाचा स्वामी बनण्याची इच्छा प्रकट केली. शुक्राचार्याने मदासुराला आपले शिष्य बनविले. शक्‍तिचा एकाक्षरी मंत्राने मदासुराला दीक्षा दिली. मदासुर आपल्या गुरूकडून दीक्षा घेऊन वनात गेला आणि त्याने कित्येक वर्ष घोर तपश्‍चर्या केली. त्याच्या शरीरावर मुंग्यांनी वारूळ बनविले. वाळवीने आपले घरी बनविले. त्याच्या चारी बाजूंना झाडे उगवली. या तपश्‍चर्येने आई शक्ती प्रसन्न झाली आणि तिने निरोगी राहण्याचे आणि संपूर्ण विश्‍वाचे राज्य मिळविण्याबाबतच वर दिला.

मदासुरने सर्वप्रथम संपूर्ण पृथ्वीवर साम्राज्य स्थापन केले. मग स्वर्गावर चढाई केली. इंद्रादी देवतांवर विजय मिळवून तो स्वर्गाचा शासकदेखील बनला. त्याने परमसासुराची मुलगी सालसाशी विवाह केला. तिला त्याच्यापासून तीन मुलगे झाले. त्यांनी शुलपाणी भगवान शिवा यांनाही पराभूत केले. सर्वत्र असुरांचा निर्दयी अत्याचार सुरू झाला. पृथ्वीवरील सर्व धर्म-कर्म गायब झाले. देवता आणि तपस्वींच्या दुःखांना मर्यादा राहिली नाही. सर्वत्र हाहाकार माजला.

चिंताग्रस्त देव सनत्कुमार गेले आणि त्याने त्या असुराचा नाश होण्याचे उपाय विचारले. सनत्कुमार म्हणाले, “देवहो, तुम्ही भगवान एकादंताची भक्‍ती करा. ते प्रसन्न होऊन नक्‍कीच तुमची इच्छा पूर्ण करतील. महर्षींच्या उपदेशानुसार देवगण एकदंताची पूजा करू लागले. जेव्हा तपश्‍चर्येला शंभर वर्षे पूर्ण झाली, तेव्हा मूषक वाहनावर भगवान एकदंत प्रकट झाले. देवाला विनंती केली – प्रभु! मदासुरच्या शासनकाळात देवगण आणि मुनिगण कर्मभ्रष्ट झाले आहेत. आपण आम्हाला या दुःखातून मुक्‍त करून आपली भक्‍ती प्रदान करा.

इकडे देवर्षींनी मदुाराला सूचित केले की एकदंताने देवतांना वरदान दिले आहे. आता ते तुमचे प्राण हरण करण्यासाठी तुमच्याशी लढा देऊ इच्छितात. मदासुर अत्यंत रागावला आणि तो आपल्या मोठ्या सैन्याबरोबर एकदंताशी लढायला निघाला. भगवान एकदंत त्याच्या वाटेवरच प्रकट झाले. राक्षसांनी बघितले की एकदंत समोरून येत आहेत. ते मूषकावर स्वार आहेत. त्यांचे रूप अत्यंत भयंकर आहे. त्यांच्या हातात परशू, पाश अशी शस्त्रे आहेत. त्यांनी राक्षसांना सांगितले की, तुम्ही आपल्या मालकाला सांगा की, जिवंत राहायचे असल्यास त्याने देवांशी द्वेष करणे सोडून द्यावे. त्यांचे राज्य त्यांना परत द्या. जर त्याने तसे केले नाही, तर मी त्याला निश्‍चितच ठार करीन. महाक्रूर मदासुर युद्धास तयार झाला. त्याने आपल्या धनुष्यास बाण लावताच भगवान एकदंताचा तीव्र परशू त्याला लागला आणि तो बेशुद्ध होऊन खाली पडला.

मदासुराला जाग आल्यावर कळले की एकदंत हे सर्वसमर्थ देव आहेत. त्याने आपले हात जोडून कथन केले की, “प्रभु! तू मला क्षमा कर आणि मला तू या भक्‍तीची संधी दे. एकदंत प्रसन्न होऊन म्हणाले की, माझी जेथे पूजा केली जाते. तिथे तू जाऊ नकोस. आजपासून तू पाताळात राहशील. हे पाहताच सर्व देवतांनी एकदांताची प्रशंसा केली आणि सर्व लोक निघून गेले.

ब) अष्टविनायक दर्शन
अष्टविनायक क्षेत्र श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या, परंतु दगडावर कोरीवकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे “स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे संबोधले जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी “अष्टविनायक स्थाने’ आहेत. या गणपतींपैकी महडचा व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे डाव्या सोंडेचे. अष्टविनायक क्षेत्रे : 1) मोरगाव, 2) थेऊर, 3) सिद्धटेक, 4) रांजणगाव, 5) ओझर, 6) लेण्याद्री, 7) महड, 8) पाली. (क्रमशः)

क) मानाचे गणपती : स्वरूप
कसबा गणपती
कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत. कसबा गणपती म्हणजे पुण्याच्या कसबा पेठेत असलेल्या देवळातला गणपती. कर्नाटकातील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने कसबा गणपतीची स्थापना केली. शिवाजी महाराजांच्या मातुःश्री जिजाबाई यांनी हे देऊळ बांधले. ही मूर्ती स्वयंभू आहे. ती एका दगडी गाभाऱ्यात असून, तांदळा स्वरूपात आहे. तांदळा म्हणजे हात-पाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती. राजमाता जिजाबाई आणि गणेशभक्‍त ठकार यांना झालेल्या दृष्टान्तानुसार जमीन खणल्यावर ही मूर्ती सापडली, अशी आख्यायिका आहे. गणपतीच्या या मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्थानी माणिक बसवलेले आहेत. शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत. म्हणून या गणपतीला “जयति गणपति’ असे म्हणतात. या गणपतीला पुण्यात प्रथम पूजेचा व ग्रामदैवताचा मान आहे. विसर्जन मिरवणुकीत या गणपतीला पहिले स्थान असते. पुण्याच्या महापौरांच्या हस्ते पालखीतल्या या गणपतीची पूजा झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो. जेव्हा 1893 लोकमान्य टिळकांनी सार्वजिनक गणेशोत्सवाची सुरवात केली त्याच वर्षी कसबा गणपती सार्वजिनक मंडाळाची स्थापना करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)