मी नाही खोटं बोलणार…

      संस्कार

     अरुण गोखले

घंटा वाजली, शाळा सुटली. सर्व मुले धावपळीने आपापल्या घरी निघाली. संजूदेखील पटकन शाळेतून बाहेर पडला. आज बाईंनी वर्गात मुलांना करायला काही गणितं दिली होती. संजूची सर्वच्या सर्व गणिते बरोबर आली होती. बाईंनी त्याच्या पाटीवर “छान’ असा शेराही दिला होता. तो त्याला त्याच्या आईला दाखवायचा होता, आणि म्हणूनच तो शेरा पुसला जाऊ नये, म्हणून त्याने पाटी दप्तरात न ठेवला आपल्या हातात ठेवली होती.तो घाईघाईने घरी निघाला होता. अचानक त्याला ठेच लागली आणि तो खाली पडला. त्याबरोबर त्याच्या हातातली पाटीही खाली पडली आणि खळकन फुटली. आता आपण आईला काय दाखविणार? त्याला रडू आले.

शेजारी राहणाऱ्या राधाकाकूंनी संजूला रस्त्यात रडताना पाहिले. त्यांनी त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवित विचारले, “काय झाले संजू?’ तेव्हा डोळ्यातले पाणी पुसत तो म्हणाला “काकू मी रस्त्यात ठेच लागून पडलो. माझी पाटी फुटली आहे. आता आई मला रागवेल. तिने परवाच मला नवी पाटी आणून दिली होती.’ त्यावर राधाकाकू म्हणाल्या “अरे एवढेच ना? मग त्यात काय? आईला सांग एका दांडगट मुलाने येऊन मला धक्‍का दिला, मी खाली पडलो आणि पाटी फुटली.’ राधाकाकूंचा तो तसा सल्ला ऐकून संजू म्हणाला, “म्हणजे काय काकू मी माझ्या आईशी खोटं बोलू?’

“अरे पण तू जर खरं सांगितलंस तर आई तुला रागावेल, बोलेल, कदाचित मारसुद्धा देईल. मग काय करशील?’ राधाकाकूंनी विचारले. त्यावर काहीशा निश्‍चयानी संजू म्हणाला, “नाही काकू मी माझ्या आईशी खोट बोलणार नाही. मग काय व्हायचं ते होऊ दे. आई रागाऊ दे नाही तर मारू दे,’ असं म्हणून संजूने डोळे पुसले आणि तो घरी परतला. घरी येताच त्याने आईला झालेला सर्व प्रकार सांगितला. आई म्हणाली, “संजू जाऊ दे पाटीच फुटली ना, फुटू दे. पण तुला तर कुठे जास्त लागले नाही ना? संजू हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, नेहमी पायाखाली नीट बघून चालावं.’ “अग आई पण ती बरोबर आलेली गणितं, तो बाईंनी दिलेला शेरा ते सगळं मला तुला दाखवायच होत ना.’ संजू अगदी रडवेला होऊन म्हणाला. तेव्हा त्याला समजावीत आई म्हणाली, “अरे संजू तू सांगितलंस ना? मला मग झालं तर, त्याला पुराव्याची काय गरज आहे?’ आई म्हणाली.

त्या दोघांच हे बोलण चालू असतानाच राधाकाकू आल्या आणि संजूच्या आईला म्हणाल्या, खरचं तुमचा संजू मोठा सच्चा आहे बरं का? मी त्याची परीक्षा घेत होते. पण त्याने मात्र निक्षून हेच सांगितले की मी खोटं बोलणार नाही. तुम्ही त्याला छान वळण लावलं आहे. त्याच्यावर चांगले संस्कार केले आहेत. राधाकाकू ते तसं बोलून निघून गेल्या आणि आईने संजूला प्रेमाने आपल्या जवळ घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)