मी टू मोहिमेचा जबरदस्त परिणाम

सध्या स्विडीश मिडिया आणि वर्तमानपत्रे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नोबेल पारितोषिक विजेत्यांची नावं जाहीर करत आहे. परंतु साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मात्र या वर्षी रद्द केले जाणार अशी सनसनाटी बातमी पण बाहेर आली आहे. तेंव्हा असे का झाले हे माहित करून घेण्यासाठी सर्व जगाचे डोळे स्वीडन देशाकडे वळले. जवळून पाहिलं तर दिसून येतं की यामागे मी टू मोहिमेचा प्रभाव आहे. आता त्याचा मी टू शी संबध काय हा प्रश्‍न उद्भवणे साहजिक आहे.

साहित्यिक क्षेत्रातला एक उत्तम लेखक किंवा कवी शोधून काढण्याचं काम स्विडीश अकॅडमी करते आणि त्या व्यक्तीला नोबेल पारितोषिक दिले जाते. हे काम स्विडीश अकॅडमीचे सभासद वर्षभर करत असतात. परंतु मागच्या वर्षी स्विडीश अकॅडमीला हे काम कारण अवघड होऊन बसलं. त्याचं कारण म्हणजे, त्यांच्या बरोबर काम करणारा एक सहकारी स्त्रियांबरोबर अनुचित वागत असतो अश्‍या तक्रारी येऊ लागल्या. त्यामुळे अकॅडमीचे काम थंड पडले. हा सहकारी स्विडीश अकॅडमीबरोबर गेली कित्येक वर्षे काम करत आहे. परंतु मागच्या वर्षी म्हणजे 2017 मध्ये 18 स्त्रियांनी या व्यक्तीवर विनयभंगाचा आणि लैंगिक शोषणाचा आरोप करून फिर्याद लावली. या कारणाने स्विडीश अकॅडमीमधल्या बहुतांशी सभासदांनी ठरवले की जोपर्यंत ही व्यक्ती आपल्याबरोबर काम करते तोपर्यंत आम्हीं पुढे काम करायला तयार नाही. त्यामुळे साहित्य क्षेत्रातला नोबेल पारितोषिक मिळवणारा उमेदवार शोधून काढण्याचं काम स्थगित झाले. काही सभासदांनी राजीनामा देऊन अकॅडमीचे काम सोडून दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोर्टाने कायदेशीर तपासणी केली आणि पुरावे सापडल्यामुळे या अनुचित वागणाऱ्या व्यक्तीला दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. हा पुरुष गेली कित्येक वर्ष स्त्रियांचे लैंगिक शोषण केल्याशिवाय त्यांचे काम पुढे जाऊ देत नसे. परंतु मी टू या मोहिमेमुळे स्त्रिया धीटपणे पुढे येऊ शकल्या आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध करू शकल्या.

स्वीडन, हा देश आज लिंग समानतेच्या बाबतीत जगात पुढारलेला मानला जातो. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे तिथल्याही स्त्रीया पुढे येऊन त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचे अनुभव फेसबुकवर जाहीर करू लागल्या आहेत. असेही म्हणता येईल की आत्तापर्यंत झालेल्या स्त्रियांच्या मुस्कटदाबीला आता तोंड फुटले. त्यांचे शब्द वेगवान धबधब्यासारखे बाहेर वाहू लागले आहेत आणि समाज्याला आतून लागलेली कीड आता बाहेर पडू दिसू आहे. ही काही एखाद दुसऱ्या स्त्रीची समस्या नसून एक मोठी जागतिक आणि सामाजिक समस्या आहे.

मी टूची मोहीम 15 ऑक्‍टोबर 2017 मध्ये एका अमेरीकन अलिसा मिलानो नावाच्या अभिनेत्रीने सोशल मिडियावर सुरु केली. ही मोहीम इतकी गाजली ती फक्त अमेरिकेतच मर्यादित राहिली नसून वणव्यासारखी जगभर पसरली. ह्या मोहिमेच्या पुराची लाट आज ट्‌वीटर, फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल मिडिया वर दुथडी भरून वाहते आहे. इथे फक्त अभिनेत्रीच नव्हे तर स्त्री वार्ताहर, स्त्री कलाकार आणि मुख्यतः सामान्य स्त्रिया त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारावर उघडपणे बोलू देऊ लागल्या आहेत.

मी टूची लाट आता भारतात जोरात पसरायला लागली आहे.पण जेंव्हा व्ह़टस अॅपवर त्यावरचे विनोद दिसतात तेंव्हा काही वेळा वाटते की भारतीयांना अजून या चळवळीची गंभीरता कळलेली नाही. याबद्दल नक्कीच खेद वाटतो. खर तर काही वर्षांपूर्वी जेंव्हा दिल्लीत निर्भायावर अत्याचार घडले तेंव्हापासूनच भारतात अत्याचाराविरुध्द्ध स्त्रियांची आंदोलन चालू आहेत. मी टूची लाट त्याला पूरक ठरेल.

भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवी मानलं जातं. हे प्रत्यक्षात यावं हीच नवरात्रीच्या निमित्ताने केलेली प्रार्थना. स्त्रियांनी किती काळ या अन्यायाला तोंड द्यावं? या अन्यायाविरुध्द काम करण फक्त स्त्रियांचाच नसून पुरुषांचं पण काम आहे. जेंव्हा पुरुष स्वतः स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध उभे राहतील तेंव्हाच समाजातली ही कीड दूर होण्याची आशा बाळगता येईल.

– उज्ज्वला अॅण्डरसन (चाफळकर), स्वीडन 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)