“मी टू’ चळवळ केवळ सवंग प्रसिद्धीसाठी – डॉ. उपाध्ये

चिंचवड – काम आणि शृंगार यातील फरक जेव्हा लक्षात येत नाही, तेव्हा “मी टू’सारख्या चळवळी उदयास येतात. सवंग प्रसिद्धीसाठी केलेल्या अशा चळवळींना दुर्लक्षित करणे, हाच त्यावरचा उपाय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार डॉ. संजय उपाध्ये यांनी चिंचवड येथे केले.

गांधी पेठ तालीम मित्र मंडळ आणि मन करा रे प्रसन्न ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मासिक प्रवचन मालिकेंतर्गत “मिठू मिठू – मी टू’ या विषयावरील चाळिसावे प्रवचन पुष्प गुंफताना डॉ. उपाध्ये बोलत होते. पवनानगर येथील काशीधाम कार्यालयात आयोजित या प्रवचन मालिकेस अरुणा मराठे, डॉ. प्रताप कोठारी, अशोक साठे, विजय भिसे, प्रदीप गांधलीकर, मुख्य संयोजक राजाभाऊ गोलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. उपाध्ये म्हणाले की, पाश्‍चात्त्यांच्या प्रभावाने स्त्री मुक्तीच्या खुळ्या कल्पनांचा पुरस्कार करीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली “मी टू’सारख्या चळीवळी फोफावतात. निसर्ग नियमातून मुक्ती म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे. खरे म्हणजे समाजातील वैचारिक संस्कृतीविरूद्ध कृती करायची आणि त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोंडस नाव देत सवंग प्रसिद्धीची नशा अनुभवायची, हाच या चळवळीचा उद्देश आहे.

नारायण मूर्ती-सुधा मूर्ती यांचा आदर्श घेण्यापेक्षा नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्याविषयी चर्चा घडू लागतात, हे सामाजिक अधोगतीचे लक्षण आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने बुद्धिवंत होते; परंतु आजकाल निरर्थक वाद घालणाऱ्यांना बुद्धिवादी म्हटले जाते, हे दुर्दैवी आहे. स्त्री आणि पुरुष यांनी समान बौद्धिक पातळीवर येऊन उत्स्फूर्तपणे दिलेले आलिंगन आणि कामभावनेने प्रेरित होऊन मारलेली मिठी यातील फरक जेव्हा कळायला लागेल, तेव्हा मी टूसारख्या घटना उद्‌भवणार नाहीत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

गोपी बाफना, राहुल वाघोले, शेखर स्वामी, प्रवीण भोकरे, नवनाथ सरडे, महेश गावडे, ज्ञानोबा जाधव, धीरज गुप्ते, युवराज गायधनी यांनी संयोजन केले. सुहास पोफळे यांनी सूत्रसंचालन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)