मी काय चुकीचे बोललो

लोणी काळभोर- बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधणे गेल्या चार वर्षांत जमले नाही अन्‌ हे निघाले अयोध्येत राम मंदिर बांधायला. काय चुकीचे मी बोललो. लगेच अर्वाच्य भाषेत अग्रलेख लिहीण्यात आला. तसेच पुरंदरचे आमदार यापूर्वी दोनवेळा महानगर पालिकेची निवडणूक हरले, एका कार्यक्रमाला गेलो नाही. लगेच आमच्या विरोधात बोलायला सुरुवात करतात. अलीकडच्या काळात निष्ठेला काही महत्त्वच राहिलेले नाही. वाऱ्याची दिशा बघून लगेच लोक बदलत आहेत, अशी खंतही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्‍त केली.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्यावतीने 6 कोटी 39 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन समारंभ माजी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी पवार बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, जालिंदर कामठे, जिल्हा बॅंकेचे संचालक प्रकाश म्हस्के, ज्येष्ठ नेते माधव काळभोर, प्रताप गायकवाड, महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार काळभोर, तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, हवेली तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत काळभोर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवदास काळभोर, हवेली पं. स.च्या सभापती हेमलता काळोखे, माजी सभापती अशोक मोरे, उपसभापती सचिन घुले, पं. स. सदस्य दिनकर हरपळे, अनिल टिळेकर, कावेरी कुंजीर, हेमलता बडेकर, सरपंच वंदना काळभोर, उपसरपंच योगेश काळभोर, सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
दरम्यान, माळी मळा नळ पाणीपुरवठा योजना, रस्ते कॉंक्रिटीकरण आणि डांबरीकरण, आरओ प्लॅन्ट, भूमिगत गटार, ओढ्यावरील साकव, राहिंज वस्ती-वाघुले वस्ती नळ पाणीपुरवठा योजना, आठवडा बाजार पत्रा शेड, दलितवस्ती सुधार योजना व पेव्हिंग ब्लॉक बसवणे, अशा कामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन पार पडले.
अजित पवार म्हणाले की, सीबीआय, आयबी, सर्वोच्च न्यायालय, नीती आयोग, रिझर्व्ह बॅंक, निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थामध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे देशातील लोकशाही धोक्‍यात आली आहे. संविधान बदलण्याची भाषा या सरकार मधील मंत्री बोलत आहेत. अच्छे दिनच्या नावाखाली आपल्याला फसवण्यात आले आहे. यावेळी लोणी काळभोर सोसयटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीरंग काळभोर, उपाध्यक्ष अनिता काळभोर यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्तविक सरपंच वंदना काळभोर यांनी केले. सूत्रसंचालन भरत काळभोर यांनी, तर उपसरपंच योगेश काळभोर यांनी आभार मानले.

 • पवार म्हणतात की…
  …एकही मजबूत मंत्री नाही
  राज्याच्या मंत्रीमंडळात पश्‍चिम महाराष्ट्राचे प्रश्‍न आग्रहाने मांडणारा एकही मजबूत मंत्री नाही. या सरकारच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच शेतकरी संप झाला. शेअर बाजार ढासळला आहे. नोटाबंदीमुळे कुणाचा फायदा झाला. नक्षलवाद, भ्रष्टाचार, दहशतवाद, काळापैसा बंद होईल, असे आश्‍वासन पंतप्रधानांनी दिले होते;परंतु, यातील एकही गोष्ट झालेली नाही.
 • …त्या बदल्यात काय मिळाले?
  1960 ते 2014 या 54 वर्षांत जेवढे कर्ज राज्याने काढले नाही, तेवढे कर्ज गेल्या चार वर्षांत या सरकारने काढले आहे. वर्ष होऊन गेले तरी अजूनही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. पुणे शहर व जिल्ह्यातून भाजप शिवसेनेचे जास्त आमदार निवडून आले. परंतु, त्या बदल्यात शहर व जिल्ह्याला काय मिळाले.
 • हे आमदाराचे काम आहे का?
  भाजपचे आमदार मुली पळवून न्यायची भाषा करतात, हे आमदाराचे काम आहे का ? यासाठी निवडून आलात का ? लोकशाही धोक्‍यात असल्याचा आरोप
  सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी केला आहे. राफेल व्यवहारात 30 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. हे सरकार दारू घरपोच द्यायला निघाले आहे. आरक्षणा संदर्भात मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत या सर्वांनाच या सरकारने फसवले आहे.
 • “यशवंत’च्या आश्‍वासनाचे काय झाले?
  थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखाना शंभर दिवसांत सुरू करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते; परंतु, यातील एकही आश्‍वासन पाळले जात नाही. “खोटे बोल पण रेटून बोल’, असा एककलमी कार्यक्रम सुरू आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)