मिष्टेक…

– हिमांशू

हॉस्पिटल कुणाला हवंसं वाटते हो! स्वतःसाठी किंवा कुटुंबीयांसाठी हॉस्पिटलमध्ये मुक्‍काम ठोकायची वेळ येणं म्हणजे एक मोठ्ठं संकटच की! हॉस्पिटलचा मुक्‍काम फक्‍त गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या राजकीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आवडतो. कारण तो तुरुंगातल्या मुक्‍कामापेक्षा सुसह्य असतो. एक तर गुन्ह्यात नाव आलं की वजनदार नेतेमंडळी अटक टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. अगदीच नाइलाज झाला, तर अटक करवून घेतात आणि मग त्यांच्या छातीत दुखू लागतं. पोलीस अधिकारी नेत्यांची रवानगी हॉस्पिटलात करतात आणि मग जामीन मिळेपर्यंत नेतेमंडळी तिथंच तळ ठोकतात. त्यांना नेमकं काय झालंय, हे डॉक्‍टरनाही शेवटपर्यंत कळत नसतं. पण औषधपाणी सुरू असतं.

हे सन्माननीय अपवाद सोडले तर हॉस्पिटलमध्ये जायला कुणी उत्सुक नसतो. काही हॉस्पिटलांमध्ये तर अशी अवस्था असते की, आपल्या पेशंटवर कोणते डॉक्‍टर उपचार करतायत, हेच पेशंटच्या नातेवाईकांना लवकर कळत नाही. आपल्या पेशंटला नक्की काय झालंय, हे डॉक्‍टरांना समजलंय की नाही, या शंकेनं नातेवाईक गांगरून जातात आणि प्रश्‍नचिन्हांनी भरलेला चेहरा घेऊन कुठल्यातरी कोपऱ्यात अंग चोरून बसून राहतात. पेशंटला घरी कधी सोडणार, हे बहुतेक हॉस्पिटलमध्ये सहसा सांगितलं जात नाही. 24 तास बघू… 48 तास लक्ष ठेवू अशी उत्तरं मिळतात. गणित दिवसांवरून तासांवर आल्याचं पाहून नातेवाइकांनाही जरा सैल वाटतं. पण पेशंटवर योग्य उपचार होतात की नाही, ही धाकधूक असतेच.

नेमक्‍या अशा वेळी पेशंटला पाहायला येणारे लोक एखाद्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घडलेला किस्सा सांगून नातेवाईकांना घाबरवून सोडतात. हॉस्पिटलमध्ये चुका कशा होतात आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो, हा त्यामागील उदात्त हेतू असतो, जेणेकरून आपण सतत दक्ष राहिलं पाहिजे, असं नातेवाईकांना कायम वाटत राहतं. अशा वेळी झोप उडणं चांगलंच! कारण अपरात्री पेशंटला त्रास झाला तर नातेवाईक जागा असतो. पण अशा प्रकारे धास्तीमुळं झोप उडणं वाईट. अशीच झोप उडवणारा एक प्रसंग दिल्लीच्या एका ट्रॉमा सेंटरमध्ये नुकताच घडला. डोक्‍याला झालेल्या जखमेमुळं भरती झालेल्या एका रुग्णाच्या चक्‍क पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्‍टरांना डोकं आणि पाय यातला फरक समजला नाही, असं नाही. दोन पेशंटच्या नावामध्ये बरंच साम्य होतं आणि त्यामुळं हा गोंधळ झाल्याचं समजतंय. विजयेंद्र आणि वीरेंद्र अशी या दोन पेशंटची नावं. विजयेंद्रच्या डोक्‍याला दुखापत झाली होती. त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं आणि तो वीरेंद्र आहे, असं समजून त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळं खळबळ उडालीय.

वस्तुतः पेशंटचं नाव, बेड नंबर, वॉर्ड नंबर, त्याची फाईल एवढं सगळं शस्त्रक्रियेपूर्वी तपासलं जातं. किमान तसं अपेक्षित असतं. पण तरीही काय घडलं कुणास ठाऊक! पेशंटला भूल दिल्यानंतर डॉक्‍टरांनी सराईतपणे पाय खोलला, तेव्हा कळलं की पायाला काहीच झालेलं नाही. मग डोक्‍याकडे लक्ष गेलं तेव्हा समजलं की हा पेशंट वेगळाच! डॉक्‍टर मंडळी फार बिझी असतात, एक शस्त्रक्रिया करून लगेच दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी धावावं लागतं, हे सगळं मान्य… पण सिस्टिमचं काय? तीही नातेवाईकांनी सांभाळायची का?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)