मिशेलने सोनिया गांधींचे नाव घेणे हा कटाचाच भाग

मोदींमुळे देशात आणीबाणी सदृश परिस्थिती- खा. पवार

नगर – पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर मोदी सरकारला पुन्हा सत्तेत येण्याची खात्री राहिली नाही. त्यामुळे सत्तेचा गैरवापर सुरू झाला आहे. देशात पहिल्यांदा सत्तेचा अतिरेक होताना दिसत आहे. देशातील सर्वोच्च असलेल्या न्यायालय, आरबीआय, सीबीआय या संस्थांमध्ये हस्तक्षेप वाढला असून, विरोधकांना नाउमेद करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत असल्याने देशात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आज येथे केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शताब्दी महोत्सवानंतर खा. पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मिशेलने सोनिया गांधींचे नाव घेणे, हा कटाचाच भाग आहे. गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकांसह अन्य भाषणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोंदी, आता लवकरच आम्ही संरक्षण विभागातील गैरव्यवहार बाहेर काढून, त्यासंबंधित व्यक्‍तींना पकडू आणणार आहे. अर्थात गैरव्यवहारातील व्यक्‍तींना पकडणे हे चूक नाही. परंतु त्यांना पकडून आणल्यानंतर त्यांच्याकडून जे काही वदवून घेण्यात येत आहे, ते चुकीचे आहे.

आता ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात मिशेल मामा कसा बोलणार आहे. याच्यातून कसा धडा दाखविणार आहे, हे देशाला कळणार आहे. हे झाले नाही, तर मोदी माझे नाव नाही, असे ते म्हणाले होते. त्यातून काल मिशेलने सोनिया गांधीचे नाव घेतले. याचा अर्थात गेल्या काही महिन्यांपासून मोदी पुन्हा-पुन्हा सांगत होते. ते आज प्रत्यक्षात दिसले आहे. मिशेलने सोनिया गांधी यांचे नाव घेणे हा कटाचाच भाग आहे. त्याने सोनियांचे नाव घेतले, हे कोणी ऐकले आहे ? इडीच्या अधिकाऱ्याने ते ऐकले आणि त्याने सर्वांना सांगितले की मिशेलने सोनियांचे नाव घेतले. ते खरे आहे की नाही, याची कोणालाच माहिती नाही. यातून सत्तेचा वापर कसा होत आहे, हे दिसत आहे, असा आरोप खा. पवार यांनी केला.

तीन राज्यांत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर, मोदींनी ही कर्जमाफी म्हणजे लॉलीपॉप असल्याचे म्हटले आहे. उलट मोदींनी पंतप्रधान म्हणून या तीन राज्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी अर्थ सहाय देण्याची गरज होती. परंतु ते न करता चुकीचे आरोप केले आहेत. शेतकरी वर्गसाठी मदत करणाऱ्या निर्णयाला खो घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशातील सर्वाच्च संस्थांवर आता सरकारकडून हल्ला होत आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले. सीबीआयसारखी सर्वोच्च तपास संस्थाही यापासून दूर राहिली नाही. क्रमांक एकचे अधिकारी आणि क्रमांक दोनच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप आहेत. प्रकरण न्यायालयात गेले आहे. तीच गत आज भारतीय रिझर्व्ह बॅंकेची झाली आहे. रघुराम राजन यांनी राजीनामा दिला. मोदींनी गुजरातेतून ऊर्जित पटेल यांना आणले. पण त्यांच्याबरोबर यांचे जमले नाही. आरबीआयच्या पैशावर यांचा डोळा होता. त्याला पटेल यांनी विरोध केला. अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला. आताही त्यांनी त्यांचाच माणूस बसवला आहे. आपल्या संस्था डळमळीत होत आहेत. यापूर्वी असे कधीच झाले नव्हते.

देशात परिवर्तन पाहिजे. त्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. आम्ही राज्या-राज्यांमध्ये आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक राज्यात वेगळी स्थिती आहे. तेथील परिस्थितीनुसार ते-ते पक्ष तेथे क्रमांक एकवर असतील. आमचा नेता आताच सांगण्याची काहीच गरज नाही. निवडणुकीनंतर आम्ही एकत्र बसू आणि मग नेता ठरवू, असे त्यांनी स्पष्ट केले.

आ. जगताप पिता-पुत्रांवर कारवाई अटळ
महापालिकेत महापौरपदाच्या निवडीत भाजपला पाठिंबा न देण्याचे स्पष्ट आदेश प्रदेशाध्यक्षांनी देऊन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला. याची पक्षाने गंभीर दाखल घेतली असून, नगरसेवकांकडे खुलासा मागविण्यात आला आहे. अर्थात खुलास काही आला, तरी प्रदेशाध्यक्षांचा आदेश पाळणार नसाल, तर कारवाई करावी करावी लागणार आहे. त्यानुसार येत्या 4 व 5 जानेवारी रोजी होणार पक्षाच्या बैठकीत आ. अरुण जगताप व त्यांचे पुत्र आ. संग्राम जगताप यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे खा. पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)