“मिशन’ प्लास्टिक, थर्माकोलमुक्‍त उद्योगनगरी!

पिंपरी – महाराष्ट्र राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या दिवशी प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी घातली. न्यायालयाने देखील या निर्णयास योग्य ठरवत बंदी कायम ठेवली. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पर्यावरण संवर्धन समितीने प्लास्टिक आणि थर्माकोलमुक्‍त शहराचे मिशनफ हाती घेतले आहे. या मोहिमेला 19 एप्रिलपासून सुरुवात होणार असून 21 एप्रिल दरम्यान चालणाऱ्या या मोहिमेत प्लास्टिक, थर्माकोल संकलनाबरोबरच जनजागृती करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 अन्वये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल (पॉलिस्टायरिन) व प्लास्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणाऱ्या डिस्पोजेबल वस्तू उदाहरणार्थ ताट, कप्स, ग्लास, काटे, वाटी, चमचे, भांडे इत्यादीं, हॉटेल्समध्ये अन्न पदार्थ पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक भांडे व वाटी, स्ट्रॉ, नॉन वोवन पॉलिप्रॉपीलीन बॅग्ज, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिक पाऊच/कप, अन्नपदार्थ, धान्य साठविण्यासाठी व पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक व प्लास्टिक वेष्टन या सर्व वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सजावटीसाठी देखील प्लास्टिक व थर्माकोलच्या वापरावर बंदी घातली आहे. याविरोधात प्लास्टिक उत्पादन न्यायालयात गेले. मात्र, न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवत मुदत दिली आहे.

या पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका आणि पर्यावरण संवर्धन समितीने प्रभागनिहाय मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी नऊ ते बारा दरम्यान क आणि इ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत भोसरी, मोशी, मासुळकर कॉलनी, नाशिक रोड भोसरी, दिघी रोड, लांडेवाडी बोपखेल, चऱ्होली, मोशी या ठिकाणी प्लास्टिक व थर्माकोल कचऱ्याचे संकलन केले जाणार आहे. अ, ब, क व फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शुक्रवार (दि. 20) भेळ चौक निगडी प्राधिकरण, एमआयडीसी चिंचवड, मोरवाडी कॉलनी, आनंदनगर चिंचवड, काळभोरनगर, लिंकरोड चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, चाफेकर चौक, रावेत, लोकमान्य टिळक चौक निगडी, कृष्णानगर चिखली, रुपीनगर, तळवडे येथे प्लास्टिक व थर्माकोल संकलन केले जाणार आहे. ड, ग व ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शनिवारी (दि. 21) औंध-रावेत रोड रहाटणी, रहाटणी रोड पिंपळे सौदागर, मनपा दवाखान्याजवळ पिंपळे गुरव, वाकड गावठाण, थेरगाव, डांगे चौक, काळेवाडी, कासारवाडी, संत तुकारामनगर, फुगेवाडी, दापोडी, सांगवी, नवी सांगवी येथे प्लास्टिक व थर्माकोल संकलन केले जाणार आहे.

स्वयंसेवकांना आवाहन
पर्यावरण संवर्धन समितीने शहरातील नागरिकांना या उपक्रमात स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. तसेच दि. 19 ,20 आणि 21 एप्रिल 2018 रोजी प्रत्येकाने आपल्या कडे साठवून ठेवलेले चांगले अथवा खराब प्लास्टिक एकत्रित करून आपल्या घराच्या नजदीकच्या संकलन केंद्रावर आणून द्यावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. जे व्यापारी अथवा हातगाडीवाले पर्यावरण संवर्धनाच्या विचार प्रवाहांपासून दूर आहेत त्यांना जागृत करण्याबरोबरत त्यांच्याकडील प्लास्टिक जमा करण्यासाठी स्वयंसेवक नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

प्लास्टिक वापरावर आलेली बंदी आपण आजपर्यंत केलेल्या प्लास्टिक वापराच्या अतिरेकाची परिणीती आहे. विशेषतः आपले जलसाठे व जमीन यांचे पर्यावरण प्रदूषित होत चालले आहे. हवेतील प्रदूषणही प्रचंड प्रमाणात वाढले आहे. आपल्या सवयी बदलून व शासनाने लागू केलेल्या प्लास्टिक बंदी कायद्याला अनुसरून आचरण करावे. आपल्याकडील प्लास्टिक व थर्माकोल संकलन केंद्रांवर जमा करावे. प्लास्टिक व थर्माकोलमुक्त शहरासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे.
– विकास पाटील, अध्यक्ष, पर्यावरण संवर्धन समिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)